पुणे शहराला कोणी मोठे म्हणावे यात नवल ते काय? एकदा पुणे म्हटले, की त्यात हे मोठेपण, मान, पुरस्कार हे आपोआपच आले. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात अवघ्या भारतवर्षांत या पुण्यनगरीची पताका अग्रभागी फडकत असल्याच्या सुवार्तेनेही आमच्यासारखा जातिवंत पुणेकर विचलित झालेला नाही. का व्हावा? शनवारातल्या नवहिंदुराष्ट्र तालिम मंडळाचा पुण्यनगरी पुरस्कार मिळविणाऱ्याने कोठल्याशा पद्म वगैरे पुरस्काराने का हुरळून जायचे असते? वस्तुत अशा अनेक गोष्टीत, खरं तर सगळ्यातच, पुणे नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे. जगाला भले ग्रांप्री वगैरे स्पर्धाचे नवल असेल. पुण्यातल्या गल्लोगल्ली रोज अशा ग्रांप्री झडतात. स्मार्ट शहर योजनेचे मोठे गोडवे गातात लोक. परंतु लेको, पुणे हे पुणवडी होते तेव्हापासून स्मार्टच राहिलेले आहे. मुळा आणि मुठेच्या जलपर्णीमय पाण्यातच हे स्मार्टपणाचे अंश आहेत. त्यामुळे तो जे करतो ते स्मार्ट हटकेपणानेच. चौकांतील सिग्नल हे इंधनाचा खर्च वाढावा म्हणून सरकारने रचलेले षडय़ंत्र आहे हे त्याला केव्हाच समजलेले आहे. कचरा वाहतुकीसाठी घंटागाडय़ांची आवश्यकता नसते. तो आपण फक्त इकडून तिकडे लोटून द्यायचा. आपोआपच तो पुढेपुढे वाहात राहतो, हे तंत्र पुणेकरांनी केव्हाच जाणलेले आहे. साधी बसथांब्यांची बाब पाहा. थांब्यावर थांबला तो मागेच सांडला, हे जीवनतत्त्व पुणेकरांनी एवढे बाणविलेले आहे की ते थांब्यावर नव्हे, रस्त्याच्या मधोमध येऊन बसची वाट पाहात असतात. तर अशी नागरी संस्कृती असलेल्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था का स्मार्ट होण्यावाचून राहते? इथले  नगरसेवक /अधिकारी हेही त्याच संस्कृतीचे पाईक. म्हणूनच सवरेत्कृष्ट प्रशासित शहराचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ‘हँ, त्यात काय एवढें’ अशी एक प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. दुसरी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ती, हे प्रमाणपत्र प्रशासनामुळे नव्हे, तर पुणेकरांच्या प्रवृत्तीमुळेच मिळणे शक्य झाले आहे. म्हणजे पाहा- दिवसभर पाण्यात न्हाणाऱ्या मोटारींना एक दिवस स्नान घडले नाही, की पालिकेत फोनचा धडाका सुरू होतो. नशिब पुण्याच्या पालिकेचे, की चहाचे आधण ऊतू गेले म्हणून कोणी अग्निशमन दलाला पाचारण करीत नाही. पण पालिकेवर कामाचा दबाव हा या ना त्या पद्धतीने ठेवलाच जातो. पण एक खरे, की पुण्यात सगळेच एकाच पद्धतीने विचार करीत नसतात. ती मेंढरवृत्ती मुंबईची. पुण्यातील काही मंडळी फारच वेगळा विचार करू शकतात. काही मंडळी म्हणजे उदा.- स्वयंसेवी कार्यकर्ते. त्यातील एकाला फारच मूलभूत प्रश्न पडला आहे की, आपल्या लाडक्या पुण्याला जर असा पहिला क्रमांक मिळाला असेल, तर देशातील अन्य शहरांचा कारभार किती बकाल असेल? नवमेट्रो संस्कृतीकरीता येथील सांस्कृतिक विरासतींना ओंकारेश्वरी नेऊ पाहणाऱ्या पालिकेला उत्कृष्ट कारभाराचे प्रमाणपत्र मिळत असेल, तर अन्य शहरांतील पालिका तेथील संस्कृतीचे काय भजे करीत असतील? बकालपणात पुण्यापेक्षा देशातील शहरे इतकी मागे असतील, तर आपण स्वर्गात तर राहात नाही ना, असेही त्यांना वाटत आहे. वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण असताना वासरात पांगळी गाय शहाणी कशी काय झाली? या प्रश्नाने ते हैराणच झाले आहेत. की,असे विविध प्रश्नांनी हैराण असणे हेही पेन्शनरी पुणेरीपणाचेच एक लक्षण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Pune is the best governed city in the country
First published on: 16-03-2018 at 03:19 IST