पुण्यनगरीच्या फर्ग्युसनात प्राचार्याच्या दालनाबाहेरच्या त्या सूचना फलकाला दोनचार दिवसांपूर्वी जोरदार प्रसिद्धी मिळाली. तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याची ती नम्र सूचना पार देशांतरापर्यंत पोहोचली, तेव्हा याच महाविद्यालयातून शिकून सातासमुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या तमाम माजी विद्यार्थ्यांचा ऊर परंपरा पालनाच्या अभिमानास्पद कामगिरीने नक्कीच भरून आला असेल. दरवर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची महापूजा घालून आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भावनांविषयी कमालीचा आदर राखणाऱ्या या महाविद्यालयाने सत्यनारायण महापूजेची परंपरा सुरू केली, त्याला आता बराच मोठा काळ लोटला आहे. तसेही, परमेश्वर तर ठायीठायी आहे. कधी तो फर्ग्युसन महाविद्यालयात उपप्राचार्याच्या दालनात श्रावणी सत्यनारायणाच्या रूपाने अवतरतो, तर दुसऱ्या एखाद्या सरकारी कार्यालयात चक्क मंगळागौरीच्या रूपाने प्रकटतो. मंत्रालयासारख्या सरकारी मुख्यालयात तर तो प्रतिमा, देव्हारे आणि मूर्तीच्या रूपाने दालनादालनात वास करताना दिसत असतो.  रेल्वे स्थानकांबाहेरच्या एखाद्या जुनाट झाडाच्या वठलेल्या खोडातील खाचेसमोर ठेवलेल्या दानपेटीमागे टांगलेल्या तसबिरीत तो कधी आढळतो.  स्वातंत्र्य दिनासारख्या सरकारी सुमुहूर्तावर गल्लोगल्ली साजऱ्या होणाऱ्या सत्यनारायणाच्या महापूजा हा त्याच्या अस्तित्वाचाच, आधुनिक आध्यात्मिक असा अनधिकृत सरकारी आविष्कार असल्याने, कितीही सरकारे आली आणि गेली तरी अशा महापूजांची प्रथा थोपविणे शक्य नाही, हे वास्तव आता सरकारांनी आणि समाजानेही निमूटपणे स्वीकारले असावे. सरकारी कार्यालयांमध्ये देवाच्या प्रतिमा, मूर्ती लावणे, पूजा, महापूजा करणे किंवा धार्मिक सण-सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यास कागदोपत्री मान्य नसले, तरी तसे करण्यास मज्जाव करण्याचा फतवा काढण्यापलीकडे कोणी फारसे काही करू शकत नाही, हे त्या देवास चांगलेच ठाऊक आहे. या शक्तीच्या आशीर्वादामुळेच सरकारी कार्यालयांतील टेबलाखालच्या कागदांना वजन प्राप्त होते, अशी अनेकांची श्रद्धा असते. म्हणूनच, कामाला सुरुवात करण्याआधी जे कोणी चप्पल बाजूला काढून संगणक सुरू करतात आणि पडद्यावरच्या लक्ष्मीच्या प्रतिमेस मनोभावे नमस्कार करतात, त्यांच्या चेहऱ्यावरच्या अपार भक्तिभावातच, कामकाजाचा दिवस चांगला जाणार याची खात्री डोकावताना दिसते. धावतपळत रेल्वे पकडण्याआधी स्थानकाबाहेरच्या झाडाखालच्या परमेश्वरासमोरच्या दानपेटीत खिशातली चिल्लर ओतून नमस्कार केला, की गर्दीत कोंबून घेण्याचे मनोबल वाढते. फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावण महिन्यात अवतरणारा सत्यनारायण हादेखील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देत असला पाहिजे. स्वायत्तता असलेल्या कोणत्याही संस्थेत, वरिष्ठांच्या मर्जीपासून परमेश्वराच्या कृपेसाठी जे जे जमेल ते ते सारे केल्याने नोकरीची क्षमता वाढते अशी एक अंधश्रद्धा बळावलेली असते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा सरकारी बडगा समोर असतानाही महापूजेचे सोहळे साजरे करण्याचे धाडसही त्यातूनच येत असेल, तर फर्ग्युसन हा काही अपवाद नव्हे!