आशियाई प्रश्नांचा सखोल वेध घेत त्यांना विश्वपरिमाण देण्यामध्ये ‘डॉक्युमेण्टरी’ – या चित्रपट-प्रकाराने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी मजल मारलेली दिसते. ते ‘माहितीपट’ किंवा ‘अनुबोधपट’ न राहाता, ‘वास्तवपट’ झालेले दिसतात. ऑस्कर गाजवणाऱ्या ‘स्माइल पिंकी’, ‘सेव्हिंग फेस’ असो किंवा ‘बॉर्न इनटू ब्रॉथेल्स’ ते आनंद पटवर्धन यांच्या ‘फादर, सन अॅण्ड होली वॉर’पर्यंत कुठलेही वास्तवपट, या डॉक्युमेण्टरींनी प्रखर सत्यदर्शनाचा अनुभव प्रेक्षकांना दिला. यंदाच्या ऑस्करमध्ये इंडोनेशियाच्या ‘अॅक्ट ऑफ किलिंग’ या डॉक्युमेण्टरीचे वर्चस्व निश्चित असताना आणखी एक आशियाई नाव डॉक्युमेण्टरी पटलावर उदयास आले आहे. कमर अहमद सायमन या बांगलादेशी तरुणाच्या ‘आर यू लिसनिंग’ या वास्तवपटाने परवाच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेण्टरी, शॉर्ट अॅण्ड अॅनिमेशन फिल्म्स’ अर्थात ‘मिफ्फ’मध्ये मानाचा सर्वोच्च पुरस्कार (सुवर्णशंख) पटकावत बांगलादेशकडे जगाचे लक्ष पुन्हा वेधून घेतले आहे. गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, अस्थिर राजकीय वातावरण आणि चित्रपट संस्कृतीच्या वाढीस प्रतिकूल परिस्थिती आदी संकटोत्कट स्थितीमध्ये पाठबळाशिवाय चित्रपटनिर्मितीची कल्पनाही अशक्य असलेल्या या देशातून पर्यावरणीय बदलांच्या परिणामांचा सूक्ष्मदर्शी अभ्यास दाखविणारा ९० मिनिटांचा पट कमर यांनी बनवला आहे. ज्या समाजवास्तवातून त्या डॉक्युमेण्टरीचा जन्म झाला, ते भीषण व दाहक असले तरी सत्याचा अंतिम आग्रह धरणारे आहे. ‘आर यू लिसनिंग’ हा माहितीपटही याच जातकुळीत मोडणारा. जुन्या ढाक्यातील प्रतिगामी वातावरणात वाढलेल्या आणि बंदिस्त सामाजिक चौकटीत घुसमटलेल्या कमर यांनी मुक्तीसाठी आधार घेतला जागतिक सिनेमांचा. बांगलादेशात कुठलेही फिल्म्स स्कूल नसणाऱ्या या देशात दुसऱ्या करिअर मार्गाची निवड करणे कमर यांना भाग पडले. मात्र पदवी मिळविल्यानंतर जाहिरात क्षेत्रात शिरकाव करून या क्षेत्राशी त्यांनी संबंध कायम ठेवला. पुढे तारेक मसूद या दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी मिळताच जाहिरात क्षेत्रातील आर्थिक प्रलोभन सोडण्याचे धाडस त्यांनी दाखविले. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्तुळामध्ये निमंत्रण मिळालेल्या बांगलादेशी चित्रपटांमध्ये ‘आर यू लिसनिंग’ हा पहिला माहितीपट असून त्याने प्रतिष्ठेच्या बर्लिन चित्रपट महोत्सवातही बाजी मारली आहे. चित्रपट संस्कृतीस पोषक नसलेल्या बांगलादेशात ‘फिल्मी बहस’ नामक ई-मेल चर्चासत्रांची चळवळ घडविणारा, सिनेमावेडाचा प्रसार, प्रचार करणारा हा दिग्दर्शक आरंभनिर्मितीतच जग जिंकण्यासाठी निघाला आहे. पर्यावरण बदलाच्या तडाख्यात एका कुटुंबाची जगण्याची लढाई दाखविणाऱ्या ‘आर यू लिसनिंग’नंतर तो पुढे दर्शकांपुढे सत्याचे कोणते रूप दाखवितो, याची उत्सुकता जागतिक सिनेवर्तुळाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
कामर अहमद सायमन
आशियाई प्रश्नांचा सखोल वेध घेत त्यांना विश्वपरिमाण देण्यामध्ये ‘डॉक्युमेण्टरी’ - या चित्रपट-प्रकाराने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी मजल मारलेली दिसते.
First published on: 11-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh kamar ahmad simon