अगोदर हैदराबाद संस्थानात आणि नंतर मराठवाडय़ात अनुक्रमे आ. कृ. वाघमारे आणि अनंतराव भालेराव यांनी ध्येयवादी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सुधाकर डोईफोडे हे यानंतरच्या पिढीचे प्रतिनिधी. डोईफोडे यांना अनंतरावांसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही तरी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांनी नांदेड येथील ‘प्रजावाणी’ हे आपले दैनिक नावारूपास आणले. मराठवाडय़ात भूमिपत्र म्हणून ज्या दोन वृत्तपत्रांना समाजमान्यता मिळाली त्यात एक होते ‘मराठवाडा’ आणि दुसरे ‘प्रजावाणी’.
‘दीन-पीडितांना अंतर देऊ नये, जुलमी मदांधांची गय करू नये’ हे ब्रीदवाक्य या दैनिकाने सर्वार्थाने अंगीकारले. इतिहास, परराष्ट्रसंबंध, संरक्षण, भौगोलिक परिस्थिती हे डोईफोडे यांचे आवडीचे विषय. यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले. आणीबाणीच्या काळात ‘प्रजावाणी’चे तीन अग्रलेख सरकारजमा झाले होते. याच काळात त्यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे १५ दिवसांचा कारावासही त्यांना भोगावा लागला. ‘लोकसत्ता’चे नांदेड येथील वार्ताहर म्हणूनही त्यांनी बरीच वर्षे काम केले.  हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, कच्छ बचाओ आंदोलनात त्यांचा सहभाग होता. गेली अनेक वर्षे ते मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी झटत होते. प्रत्येक रेल्वेमंत्र्याला भेटून मराठवाडय़ातील प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधत. गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून डोईफोडे यांचेच नाव घ्यावे लागेल. वृत्तपत्रीय तसेच विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले. ‘शब्दबाण’ या त्यांच्या अग्रलेखांच्या संग्रहास शासनाचा पुरस्कार लाभला. मुक्तिलढय़ावर आधारित ‘परवड’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘नांदेडभूषण’सह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.
 पत्रकारिता करतानाच त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. नांदेडचे माजी खासदार व माजी नगराध्यक्ष व्यंकटराव तरोडेकर या दिग्गज उमेदवाराचा त्यांनी १९६७ च्या पालिका निवडणुकीत पराभव केला. नंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते पुन्हा पालिकेवर निवडून गेले व शिक्षण मंडळाचे सभापती झाले. त्यांनी पालिकेचे लोहिया वाचनालय उत्तमोत्तम ग्रंथांनी समृद्ध करण्यात पुढाकार घेतला. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या नावाने पालिकेतर्फे व्याख्यानमाला सुरू करण्यातही त्यांचे योगदान मोठे होते. ७७ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर त्यांनी बुधवारी या जगाचा निरोप घेतला. तरुणपणी पुण्यात तीन वर्षे राहून एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या डोईफोडे यांनी लौकिकार्थाने काळा कोट घालून कधी वकिली केली नाही; पण ५० हून अधिक वर्षे जनतेची मात्र ‘वकिली’ केली.. नि:शुल्क आणि नि:स्वार्थीपणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh sudhakarrao doiphode
First published on: 23-01-2014 at 02:08 IST