अमेरिकेतील क्लिंटन प्रशासनाने भारताला महासंगणक  देण्यास नकार दिला त्यावेळी माहिती तंत्रज्ञानात आपली पीछेहाट होणार अशी चिन्हे असताना डॉ. विजय भटकर यांच्या प्रयत्नांमुळे ‘परम’ महासंगणक तयार झाला. नंतर भारताने हा महासंगणक रशिया, सिंगापूर, जर्मनी व कॅनडा यासारख्या प्रगत देशांना निर्यातही केला, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली. नुकताच भटकर यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सीताराम जिंदाल फाऊंडेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भटकर यांनी १९९०च्या दशकात सी-डॅक या संस्थेतर्फे ‘परम’ तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले परम ८००० व परम १०००० असे दोन प्रगत महासंगणक त्यांच्या प्रयत्नातून साकार झाले. आज आपण बहुभाषिक संगणक हवे आहेत असे म्हणतो, पण ‘सी-डॅक’च्या  ‘जिस्ट’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा लिप्यांमधील १६ प्रमुख भाषा संगणकावर आणून ज्ञानकोषीय तूट भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढली होती. सी-डॅकच्या माध्यमातून त्यांनी पाच हजाराहून अधिक सॉफ्टवेअर व्यावसायिक घडवले. आय स्क्वेअर आयटी, एमकेसीएल या संस्थांच्या पायाभरणीतही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. भारतातील सर्वोत्तम मानले जाणारे केरळ इन्फोटेक पार्क (त्रिवेंद्रम) उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘एज्युकेशन टू होम’ हा कार्यक्रमही त्यांनी प्रभावीपणे राबवला. गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आकार दिला त्यात डॉ. भटकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विचारवंत, नेतृत्वगुण असलेला वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक, धोरणकर्ते म्हणून ते देशाला परिचित आहेत. भटकर यांचा जन्म अकोल्यातील मुरांबा या गावी ११ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतली. दिल्ली आयआयटी या संस्थेचे ते डॉक्टरेट आहेत.  संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर त्यांची अनेक पुस्तके व शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, प्रियदर्शिनी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना लाभले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaktivedh
First published on: 21-11-2012 at 10:56 IST