जगातील वैज्ञानिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन येथील रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे नोबेल विजेते वैज्ञानिक व्यंकटरमण रामकृष्णन यांची निवड झाली आहे. रॉयल सोसायटीची स्थापना १६६० मध्ये झाली. रामकृष्णन हे सध्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष असलेले जनुकीय वैज्ञानिक सर पॉल नर्स यांची जागा घेतील.
अमेरिकेतून ब्रिटनला परतल्यानंतर १६ वर्षांत त्यांना हा सन्मान मिळाला आहे. सध्या ते ब्रिटिश वैद्यकीय संशोधन मंडळाच्या केंब्रिज येथील प्रयोगशाळेचे उपसंचालक व रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. त्यांना वेंकी नावाने ओळखले जाते. या बहुमानाने ते भारावून गेले असल्यास नवल नाही, कारण हे पद  या आधी आयझ्ॉक न्यूटन, ख्रिस्तोफर रेन, सॅम्युअल पेपीस, जोसेफ बँकस, हंफ्रे डेव्ही व अर्नेस्ट रुदरफोर्ड  आदींनी भूषवलेले आहे. या पदावर निवडले गेलेले व जन्माने भारतीय असलेले ते पहिले वैज्ञानिक आहेत. रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून गणितज्ञ रामानुजन, जगदीशचंद्र बोस, सी.व्ही. रमण व मेघनाद साहा यांची निवड झाली होती. विज्ञान क्षेत्रातील एक फार मोठा टप्पा रामकृष्णन यांच्या रूपाने भारतीय वंशाच्या व्यक्तीने ओलांडला आहे. वेंकी यांना २००९ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले होते. रायबोझोमची रचना उलगडून त्यांनी पेशींमध्ये प्रथिनांचे संश्लेषण कसे होते व प्रतिजैविकांचे (अँटिबायोटिक्स) कार्य कसे चालते यावर प्रकाश टाकला होता. वेंकी यांचा जन्म तामिळनाडूतील चिदंबरम येथे १९५२ मध्ये झाला. त्यांचे भौतिकशास्त्रातील शिक्षण बडोदा विद्यापीठात झाले व नंतर ते अमेरिकेला गेले. तेथे ओहिओ विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी घेतली. २००३ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले व २०१२ मध्ये त्यांना ब्रिटनच्या राणीचा सर हा किताब मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण दिले. आपण सायकलवर फिरत होतो तेव्हा आपल्याला कुणी काही विचारले नाही व नोबेल पारितोषिक मिळाल्यावर मात्र मेल बॉक्स भरून वाहू लागला. ज्यांना त्यातले काही कळत नाही त्यांनीही अभिनंदन केले, असे थोडेसे खडे बोल सुनावणारे उद्गार त्यांनी त्या वेळी काढले होते. आधी ‘ब्रेन ड्रेन’ होऊ द्यायचे व मग भारतीय वंशाचे वैज्ञानिक असा नामोल्लेख होताच ते आमचेच आहेत असा दावा करण्याची आपली प्रथा आहे, त्यावर त्यांनी कदाचित नोबेलच्या वेळी कडू मात्रा दिली असेल. आताही आपण पाठ थोपटून घेणार आहोत यात शंका नाही, पण परदेशात गेल्यावरच वैज्ञानिक कसे चमकतात याचे आत्मपरीक्षण आपल्याला केव्हा तरी करायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkatraman ramakrishnan
First published on: 21-03-2015 at 12:37 IST