माहिती तंत्रज्ञानाचे युग आलं आणि नवीन तांत्रिक अवजारे, संकल्पना आपण आनंदाने स्वीकारल्या. कारण अद्ययावत राहावंच लागतं. भाषा असो वा समाज, परिवर्तनशीलता हा दोघांचाही विशेष गुणधर्म आहे. टेलिफोन आला तेव्हा दूरध्वनी, टीव्ही आला त्याला दूरचित्रवाणी, कॉम्प्युटरला संगणक, कॅल्क्युलेटरला परिगणक वा गणकयंत्र हे शब्द बऱ्यापैकी रुळले. मोबाइलला चलभाष, भ्रमणध्वनी, भाषाट, चलध्वनी, सहध्वनी असे पर्यायी शब्द सुचविले गेले, मात्र ‘भ्रमणध्वनी’ हा शब्द समाजाने स्वीकारलेला दिसतो. कोणते शब्द स्वीकारायचे, ठेवायचे या बाबतीत भाषा यादृच्छिक असते म्हणजे त्या त्या समाजाच्या इच्छेनुसार शब्द स्वीकारले वा विसर्जित केले जातात. यापुढे संगणकविषयक काही शब्द थेट मराठीतून लिहिणार आहे. त्याचे इंग्रजी पर्यायी शब्द तुमच्या मनात आपोआप उमटतील. परंतु यानंतर परत वापरताना हे शब्द पर्याय म्हणून उपयोगी येतील. संकेतस्थळांवरून अनेक पुस्तके विनामूल्य उतरवून घेता येतात. आपले ई-टपालाचे/ई-पत्रासाठी ई-पत्ते देता येऊ शकतात. संगणकात धारिका जोडता येते, दुवा पाठवता येतो, संगणकावर मराठीत लिहिणे वाचणे शक्य करणारे अनेक टंक बाजारात उपलब्ध आहेत. हुडक्यांचा वापर करून माहिती हुडकणे सहज शक्य असते. विविध संकेतस्थळे पाहता येतात. कळपाटावरील कळा दाबून आपल्याला हव्या त्या लिपिखुणा आपण पडद्यावर उमटवू शकतो. आपण धारिका, सारणी किंवा सादरीकरण तयार करू शकतो. महाजालावर गप्पागोष्टी, अनुदिनी, संकेतस्थळे या सोयी सहज वापरता येतात. अनेक संकेत प्रणाल्या या संगणकाच्या कार्यकारी प्रणालीबरोबरच विनामूल्य मिळतात. संगणकातील खुणांवर टिकटिकवता येते. अनेकदा जी चौकट उघडते त्यावर बाण सरकविता येतो. काही कार्यकारी प्रणालीच्या आवृत्त्यांच्या चकत्या वापराव्या लागतात. या चकतीच्या खणात घालून हवा तो मजकूर उतरून घेता येतो. छोटी धारिका असेल तर चकतीऐवजी संवाहकाद्वारे उतरून घेता येते. संवाहकातील धारिका संगणकावर चढावताही येते. युनिकोड प्रणाली घेतली की आज-काल तळपट्टीवर उजवीकडे भाषांच्या खुणा येतात त्यातील  टअ अशी खूण येते ती निवडली की पडद्यावर मराठी अक्षरे उमटू लागतात. भाषा मराठी आणि लिपी रोमन या वापराऐवजी देवनागरीची गंमत वेगळीच आहे. हे वापरून बघाच! – डॉ. निधी पटवर्धन

                       nidheepatwardhan@gmail.com

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन