अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

विनोबांना, एकदा कुणी तरी विचारले, ‘तुमचा आवडता साहित्यिक कोण?’ उत्तर मिळाले, ‘युक्लिड’. विचारणाऱ्याने आणखी एकदा विचारले असते तर इसापचेही नाव ऐकायला मिळाले असते.

ऋषी, मुनी, भक्त, संत या सर्व परंपरा विनोबांच्या जीवनाचा हिस्सा होत्या. यातून सवड मिळाली आणि मनोरंजन करून घ्यायचे तर ते गणिताकडे किंवा इसापच्या गोष्टींकडे वळले असते हे नक्की. गणिताला तर ते सर्वश्रेष्ठ शास्त्र मानायचे. परमेश्वरानंतर कोण? तर गणित. त्यांची भूमिका इतकी स्वच्छ होती.

तर युक्लिडचा विषय निघाला कारण विनोबांचे जीवनचरित्र सहा सूत्रांमध्ये सांगता येते.

१. ब्रह्मजिज्ञासा.

२. अपार विद्याकांक्षा

३. स्वातंत्र्याचा ध्यास.

हे तीन विशेष आणखी नेमकेपणाने विनोबांनीच सांगितले आहेत. त्याला ते ‘अवस्था’ म्हणत.

१. ज्ञानसंग्रह.

२. व्रतसंग्रह.

३. प्रेमसंग्रह.

आचार्य भागवत यांनी विनोबांवर लिहिलेल्या ‘गांधीजी आणि विनोबा’ या लेखात, हा संदर्भ मिळतो.

ज्ञान आणि विद्या, या दोहोंचीही प्राप्ती करण्याची विनोबांना ओढ होती. वैराग्य हा त्यांचा अनोखा विशेष होता. साऱ्या सृष्टीची प्रेमपूर्वक जोडणी, हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यामुळे विनोबांच्या जीवनाचे हे सहा टप्पे मानणे उचित ठरते. हे टप्पे म्हणजे सहा बिंदू आहेत आणि ते ‘षट्कोन’ म्हणून जोडायचे ठरवले तर युक्लिडचा संदर्भ योग्य होईल.

दुसरीकडे आदिशंकराचार्याचा विनोबांवरील प्रभाव पाहता या टप्प्यांचा ‘षट्पदी’ म्हणूनही विचार करता येईल. षट्पदी म्हणजे सहा श्लोकांचे स्तोत्र आणि सातवा श्लोक उपसंहाराचा. आचार्याची ‘अविनयमपनयविष्णो..’ ही षट्पदी फार प्रसिद्ध आहे.

आदिशंकराचार्याच्या विचारांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, याची विनोबांना सतत जाणीव असे. आचार्याच्या वाङ्मयाचे विनोबांनी ‘गुरुबोध’ असे संपादन केले; त्यात ही षट्पदी आहे. ती ज्यांनी पाहिली असेल त्यांना विनोबांचे चरित्र आणि ही षट्पदी यांचा संबंध नक्की जाणवेल.

विनोबांच्या वैराग्याचा विचार करता, आपल्या घरात वैराग्यसंपन्न महापुरुष जन्म घेणार आहे, असा दृष्टांत विनोबांच्या आजोबांना, म्हणजे शंभुराव भावे, यांना झाला होता. त्यानंतर विनोबांचा जन्म झाल्याने हाच तो महापुरुष अशी शंभुराव भावे यांची खात्री झाली.

अर्थात असा दृष्टांत झाला नसता तरी विनोबा वैराग्यशील बनणार ही जवळपास अटळ बाब होती. याला कारण त्यांची आई रुक्मिणीबाई. विनोबांना आईचा सहवास कमी मिळाला, पण जो मिळाला त्यात वैराग्याचा संस्कार सर्वात ठळक होता. आईने हर प्रयत्नाने विनोबांच्या मनावर विरक्तीचे आणि भक्तीचे संस्कार केले. संन्यस्त जीवनाचा स्वीकार करण्याचा अप्रत्यक्ष उपदेशही केला. आईने अध्यात्म ठसवले आणि वडिलांनी म्हणजे नरहरपंत भावे यांनी विज्ञानाची गोडी लावली.

विनोबांच्या वैराग्याचा स्पर्श त्यांच्या दोन्ही भावांनाही झाला. बाळकोबा आणि शिवबा यांनी विनोबांप्रमाणेच आश्रमीय जीवनाची कास धरली. तूर्तास विनोबांच्या आयुष्याच्या टप्प्यांविषयी अधिक पाहू.