|| प्रदीप रावत

साडेतीन अब्ज वर्षांत सजीवांची उत्क्रांती कसकशी झाली, याच्या खुणा जीवाश्मांनी जपल्या. या जीवाश्मांची नोंदवही फार त्रोटक आहे, अशी खंत डार्विनने व्यक्त केली होती. पण पुढच्या काळात या जीवाश्मांच्या शोधागणिक, उत्क्रांतीच्या वाटा आणि वळणेही स्पष्ट झाली..

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

उत्क्रांतीचे पुरावे म्हणता येतील अशी कोणती वैशिष्टय़े जीवाश्मांमध्ये आढळतात? सर्वात अगोदर आपल्या नजरेला येते ते उत्क्रांतीचे एक विशाल विस्तृत चित्र. खडकांच्या स्तरांचा अवघा क्रम-अनुक्रम तपासला तर काय दिसून येते? जे सजीव अगदी आरंभीच्या काळातले होते त्यांची शरीररचना सोपी साधी आढळते. जसजसे कालांतर वाढते तसतसे त्यात आढळणाऱ्या सजीवांची रचना गुंतागुंतीची आढळते. जे तुलनेने अलीकडचे ‘तरुण’ स्तर असतात त्यातल्या सजीवांच्या जीवाश्मांमध्ये आणि सध्या हयात असलेल्या सजीव जातींशी खूपच साधर्म्य वा साम्य आढळते. एवढेच नाही! या उपर आणखी काही नजरेला पडते. ते म्हणजे एखाद्या वंशावळीत उत्क्रांतीने जे बदल घडतात त्यांचे नमुनेदेखील आढळतात. म्हणजे काय तर प्राणी किंवा वनस्पतींची एखादी जात कालांतराने पालटत पालटत दुसऱ्या निराळय़ा रूपात आढळते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वंशाच्या नंतरच्या पिढय़ांमध्ये दोन प्रकारचे गुण नजरेला येतात. एकीकडे पूर्वकालीन वंशजाचे म्हणावे असे दर्शविणारे गुण असतात. तर दुसरीकडे त्याच बरोबरीने काही बदललेले गुण आणि पालटलेले रूपदेखील आढळते. जीवसृष्टीचा इतिहास म्हणजे एके काळी एकसमान असणाऱ्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना फाटे फुटत उपजलेल्या जातींचा आलेख असतो. ज्यांना कालांतराने फाटे फुटले गेले अशा पूर्वजांच्या अस्तित्वाचे पुरावे जीवाश्मांच्या नोंदवहीत सापडले पाहिजेत. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बदल होत होत सस्तन प्राणी उद्भवले असे अनुमान एकोणिसाव्या शतकातील शरीरशास्त्रज्ञांनी केले होते. हा निष्कर्ष त्यांनी दोन्ही जातींच्या प्राण्यांच्या शरीरामधे जे साधर्म्य दिसले त्यावरून काढला होता. हे अनुमान जर खरे असेल तर? जीवाश्म सरपटणाऱ्या प्राण्यांचेच पण त्यामध्ये सस्तन प्राण्यांची गुण वैशिष्टय़ांची काही प्रमाणात उपस्थिती आहे असे जीवाश्म आपल्याला आढळले पाहिजेत. पण उपलब्ध होणारी जीवाश्मांची नोंदवही अपूर्ण आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. जीवसृष्टीच्या प्रमुख वर्गाना जोडणाऱ्या प्रत्येक संक्रमणाचा दाखला मिळणे या अपुरेपणामुळे दुरापास्त होते. संक्रमणाच्या साखळीतला प्रत्येक बिंदू नोंदता येईल अशी अपेक्षाच धरता येत नाही. पण तरीही त्या साखळीतले काही बिंदू हाती लागले पाहिजेत, अशी अपेक्षा वाजवी आहे.

 डार्विनने आपल्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज’ या ग्रंथामध्ये जीवाश्मांची नोंदवही फारच त्रोटक आहे, अशी खंत व्यक्त केली आहे. त्याच्या काळामध्ये प्रमुख वर्गाना जोडणारे संक्रमण अवस्थांमधले दुवे किंवा हरवलेले दुवे उपलब्ध नव्हते. देवमाशांसारखे काही वर्ग होते. पण त्यांच्या पूर्वजांचा काही थांगपत्ता आणि ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे नोंदवहीत ते जणू अचानक उपटले आणि प्रकटले असे भासत होते. पण तरी उत्क्रांतीबद्दल तुटपुंजा का होईना जीवाश्मांचा पुरावा होता. त्या बळावर जीवसृष्टीबद्दल काही निरीक्षणे नोंदवणे त्याला शक्य झाले. सध्याच्या सजीवांपेक्षा प्राचीन काळामधले प्राणी आणि वनस्पती खूपच भिन्न होते. आधुनिक सजीवांशी जास्तीत जास्त साधर्म्य खडकांच्या कुठल्या स्तरात आढळते? तर खडकांच्या अलीकडल्या- तरुण- स्तरातील जीवाश्मांशी. जे लगतच्या संलग्न स्तरातले जीवाश्म असतात ते एकमेकांशी अधिक मिळतेजुळते असतात, हेही त्याच्या ध्यानी आले होते.

डार्विनच्या काळात समान पूर्वज असलेले जीवाश्म त्याचप्रमाणे एखाद्या जातीच्या अंतर्गत धीम्या गतीने होणाऱ्या बदलांची साक्ष देणारे जीवाश्म हे दोन्ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्याबद्दलच्या ठोस आणि निर्णायक म्हणावे अशा पुराव्यांचा अभाव होता. पण डार्विननंतरच्या काळामध्ये पुराजीवशास्त्रज्ञांना जीवाश्मांचा खजिनाच गवसला आहे. एकेकाळी पुरेसा पुरावा सहजी उपलब्ध नसलेली पण तर्काच्या आधारे अनुमान केलेली वैज्ञानिकांची सर्व भाकिते या खजिन्यामुळे सत्य ठरली आहेत. प्राण्यांच्या वंशावळीत झालेल्या अखंड बदलांची साखळी आता आपण प्रस्थापित करू शकतो. समान पूर्वज आणि संक्रमण अवस्थेमधले जीव या दोन्ही पैलूंबद्दल आता भरपूर पुरावे उपलब्ध आहेत.

ज्यांना आता आपण आद्यजीव ( इंग्रजीमध्ये ‘प्रोकरियोट्स’) मानतो ते ‘प्रकाश संश्लेषी’ जिवाणू साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या गाळांच्या स्तरामध्ये दिसू लागतात. पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर फक्त एक अब्ज वर्षांनी जीवसृष्टीच्या खुणा आढळतात. पुढली दोन अब्ज वर्षे हे एकपेशीय जिवाणू पृथ्वी व्यापून राहिले होते. त्या कालखंडामध्ये अन्य कुठल्याही स्वरूपात जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. त्यानंतर आढळतात साध्या स्वरूपातले दृश्यकेंद्रकी जीव (युकारिओट्स).  या दृश्यकेंद्रकी जीवांमध्ये केंद्रक आणि गुणसूत्रे असलेल्या ‘खऱ्याखुऱ्या’ पेशी असतात. त्यांच्यानंतर बराच काळ लोटल्यावर म्हणजे ६० कोटी वर्षांपूर्वी तुलनेने साधेच पण भिन्नभिन्न आकाराचे बहुपेशीय जीव दृष्टीस पडू लागतात. उदा. अळय़ा, स्पंज, जेलीफिश इ. त्यापुढच्या लक्षावधी वर्षांत या वर्गाना अनेक फाटे फुटलेले दिसतात आणि विभिन्न जाती उद्भवताना आढळतात.

या उत्क्रांती प्रक्रियेतून सुमारे ४० कोटी वर्षांपूर्वी या वर्गाना अनेक फाटे फुटले. त्या काळामध्ये त्यातून भूचर वनस्पती आणि चतुष्पाद प्राणी दिसू लागतात. या नवीन आणि भिन्न जाती उत्क्रांत झाल्या म्हणजे सर्व प्राचीन वर्ग नाहीसे झाले असा नाही! त्यातील काही जाती आजतागायत तगून आहेत! जीवाश्मांच्या या मोहक नोंदवहीत वनस्पतींच्या जीवाश्मांची नोंदवही देखील आहे. तीही अतिशय मोहक आहे. परंतु त्या नोंदवहीमध्ये वनस्पतींच्या जीवाश्मांचे प्रमाण तुलनेने कमी आढळते. वनस्पतींमध्ये सहजासहजी अश्मीभूत होऊ शकतील अशा कठीण घटकांचा बराच अभाव असतो. संख्यात्मक तुलनेने कमी असले तरी जे काही उपलब्ध आहेत त्याच्यावरून वनस्पतींच्या उत्क्रांतीची रूपरेषा प्राण्यांप्रमाणेच आहे हे दिसून येते. वनस्पतीसृष्टीच्या प्रारंभी शेवाळ (म्हणजे मॉसवर्गातील  Musci) आणि शैवाल (Algae) सारखे इंद्रिय वा अवयव नसलेले प्रकार. त्यांच्या पाठोपाठ उदयाला आलेले नेचे (Ferns) त्यानंतर क्रमश: सूचिपर्णी (Conifers), पानझडी वृक्ष (Deciduous) आणि सपुष्प (Flowering plants) असा क्रम स्पष्ट आढळतो. जीवाश्मांमध्ये आढळणारा जीवजातींचा कालक्रम यदृच्छेने निर्माण झालेला नाही. अगोदर साधे जीव अवतरले. नंतर त्यांच्यामधून अधिक जटिल जीव उत्क्रांत होत गेले.

भूचर वनस्पती आणि चतुष्पाद यांच्या आगमनानंतर सुमारे पाच कोटी वर्षांनी प्रथमच खरेखुरे उभयचर उत्क्रांत झाले. त्यांच्या पाठोपाठ अजून पाच कोटी वर्षांनंतर सरपटणारे प्राणी अवतरले. पहिल्या सस्तन प्राण्यांनी २५ कोटी वर्षांपूर्वी हजेरी लावली. या वंशवृक्षातल्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नवीन सस्तन प्रशाखेला नवीन फाटा फुटून पक्षीवर्गीयांचा वंश उपजला. आद्यतम सस्तनांच्या उदयानंतर त्यांच्या सोबतीनेच कीटक आणि भूचर वनस्पती यांच्यापासून विविध जाती उपजत गेल्या. फार खोल नसलेल्या अगदी उथळ खडकांच्या स्तरांजवळ पोहोचलो की त्या स्तरात आढळणाऱ्या जीवाश्मांचे वर्तमान सजीवांशी खूपच साम्य- साधर्म्य आहे असे स्पष्ट दिसून येते. इतर नर-वानर ( इंग्रजीत प्रायमेट्स ) गणांपासून माणसांचा वंश विभक्त होऊन केवळ ७० लाख वर्षे झाली आहेत. हा काळ एकूण उत्क्रांतीच्या काळाचा अगदी छोटासा अंश आहे. उत्क्रांती वृक्ष साडेतीन अब्ज वर्षे जुना आहे. या वृक्षाचे खोड दर सालागणिक एकएक पापुद्रा साठत फुगत असते. म्हणजे उत्क्रांती वृक्षाचे वय एक वर्ष धरा. हा वृक्ष पहिल्या महिन्यापासून म्हणजे जानेवारीपासून वाढत चालला आहे, असे मानले तर त्या वर्षांचा मार्च उजाडेल तेव्हा आद्यतम जिवाणू दिसू लागतील. या क्रमाने बघत गेलो तर माणसाच्या आद्य पूर्वजाचे दर्शन होण्यासाठी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळचे सहा वाजलेले असतील. म्हणजे इसवीसनपूर्व ५०० च्या सुमाराचा ग्रीक सुवर्णकाळ दिसायला तर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीला फक्त तीस सेकंद कमी असतील!

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

 pradiprawat55@gmail.com