डॉ. जयदेव पंचवाघ

बोटांची हालचाल अपेक्षित चपळपणे न करता येणं, पायांतून चप्पल निसटणं वा तोल जाणं, हीदेखील स्पाँडिलोसिसची लक्षणं असू शकतात..

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

स्पाँडिलोसिसच्या प्रक्रियेविषयी चर्चा आपण मागच्या आठवडय़ात केली तेव्हाच, ही प्रक्रिया जसं वय होईल तशी वाढत जाते हेही बघितलं. त्या पार्श्वभूमीवर या आठवडय़ात आपण, स्पाँडिलोसिस प्रमाणाबाहेर वाढल्यास अनुभवाला येणारी लक्षणं समजावून घेऊ-  कारण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर ते मात्र धोक्याचं ठरू शकतं. स्पाँडिलोसिस झालेल्या बऱ्याच व्यक्तींमध्ये मानदुखी आणि अधूनमधून मान अवघडण्यावरच प्रकरण थांबतं. मात्र स्पाँडिलोसिसची प्रक्रिया प्रमाणाबाहेर झाल्यास किंवा ज्या व्यक्तींमध्ये जन्मत:च मणक्यातील कॅनॉल हा चिंचोळा असतो अशांमध्ये मानेच्या मज्जारज्जूवर अधिक दाब येऊ लागतो.

मागेच पाहिल्याप्रमाणे मानेचा मज्जारज्जू हा एक अत्यंत महत्त्वाची ‘केबल’ आहे. ही केबल मेंदू व शरीरातील इतर भाग यांना जोडते. मेंदूतले संदेश शरीरातील स्नायूपर्यंत व इतर अवयवांपर्यंत पोहोचवणे आणि शरीरभरच्या अवयवांच्या संवेदनांची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवणे हे कार्य मानेतील मज्जारज्जू अखंडपणे करत असतो. एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने मज्जारज्जूला जगातला ‘सर्वात बिझी स्विच बोर्ड’ असं म्हटलेलं आहे. तसं पाहिलं तर मज्जारज्जू हा खरंतर कवटीच्या तळातून बाहेर येणारा मेंदूचाच अखंड भाग आहे. असंख्य चेतापेशी व त्यातून निघणाऱ्या असंख्य ‘केबल्स’ यात आहेत. मज्जारज्जूलासुद्धा स्वत:ची अशी एक बुद्धिमत्ता असते. मज्जारज्जू हा जरी केबल असला तरी नेमके कोणते संदेश मेंदूपर्यंत कोणत्या प्रकारात पोहोचवायचे याचे मर्यादित निर्णय हा घेऊ शकतो. शरीराच्या तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून असे मर्यादित फेरफार करण्याची क्षमता यात असते.

हृदय, फुप्फुस, पोटातील अवयव, मूत्राशय, लैंगिक अवयव, विविध ग्रंथी यांना जाणारा नसांच्या पुरवठय़ाचासुद्धा मज्जारज्जूशी घनिष्ठ संबंध असतो.

मानेतल्या मज्जारज्जूला अगदी वरच्या भागात गंभीर इजा झाल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या सर्वाच्याच आवडत्या ‘सुपरमॅन’ क्रिस्तोफर रीव्ह या अभिनेत्याला झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे आपल्याला माहीत आहे.  २७ मे १९९५ रोजी घोडय़ावरून पडून झालेल्या अपघातात त्याच्या मानेच्या मणक्याला गंभीर इजा होऊन मज्जारज्जूमधील प्रवाह पूर्णपणेच खंडित झाला. या अपघाताच्या वेळेला रीव्ह त्याच्या ‘बक’ नावाच्या घोडय़ावर स्वार झाला होता. घोडय़ांच्या कसरतीच्या एका स्पर्धेत बक या घोडय़ाला एका विशिष्ट अडथळय़ावरून उडी मारायची होती परंतु उडी मारायच्या आधीच तो अगदी अचानक, जागीच थिजला. या अनपेक्षित घटनेमुळे क्रिस्तोफर घोडय़ावरून फेकला गेला आणि डोक्यावर आपटला. या पडण्याच्या दणक्याने तत्क्षणी मज्जारज्जूला गंभीर इजा झाली व त्यामुळे त्याचे दोनही हात व पाय हलेनासे झाले. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास कारणीभूत असलेले स्नायू असलेल्या स्नायूंवरचा ताबासुद्धा सुटल्यामुळे त्याचा श्वास बंद झाला. हृदयाचे ठोके मंद झाले. केवळ वेळीच मदत मिळाल्यामुळे तो रुग्णालयापर्यंत पोहोचू शकला आणि जिवानिशी वाचला; परंतु त्याला मानेखाली कायमच लकवा म्हणजेच पॅरॅलिसिस राहिला. अर्थात या विचित्र अपघाताला तोंड देऊन पुढची काही वर्षे अतुलनीय धैर्याने तो जगला हे सर्वश्रुतच आहे

 मुद्दा असा की, मानेचा मज्जारज्जू हा इतका महत्त्वाचा भाग आहे. ज्या वेळी स्पाँडिलोसिसमुळे त्याच्यावर दाब येऊ लागतो, तशी काही लक्षणे दिसू लागतात. चालताना-  विशेषत: अंधारात चालताना-  तोल जाणं, पायांमध्ये जडपणा वाटणं, पायांतली शक्ती कमी वाटणं, चालताना पायातली चप्पल नकळत निसटणं, चालताना पायाखालची जमीन एखाद्या कापसाच्या गादीसारखी भासणं अशी पायांशी संबंधित लक्षणं दिसू शकतात. मानेपासून हा भाग खूपच दूर असल्यानं त्याचा उलगडा होत नाही. अशा व्यक्तींना चालताना तोल जाताना बघून, ‘बहुतेक ‘घेऊन’ आलेले दिसतात,’ असाही लोकांचा समज होऊ शकतो.

त्याचबरोबर दोन्ही हातातसुद्धा लक्षणं जाणवू लागतात. तळहातात बधिरपणा येणं, क्लिष्ट कामं बोटांनी न करता येणं. उदा. शर्टचं बटन लावणं वा पँटचं बक्कल काढणं, नाडी बांधणं, ब्लाऊजचा हुक काढणं, पोळी किंवा भाकरी एका हाताने तोडणं, कानात डूल घालणं.. अशा गोष्टी अवघड होत जातात. या क्लिष्ट गोष्टी करणं अवघड होत गेलं तरीसुद्धा हाताची पकड (‘ग्रिप’) मात्र अनेक दिवसांपर्यंत तुलनेनं व्यवस्थित राहते. मानेची पुढे किंवा मागे अचानक हालचाल झाल्यास विजेच्या झटक्यासारखी संवेदना व मुंग्यांची सळसळ सर्रकन मानेपासून ते पायापर्यंत अचानक जाणं हेसुद्धा मानेच्या स्पाँडिलोसिसचं लक्षण असू शकतं. ‘ही लक्षणं सुरू होतात तेव्हा आजार हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये नसतो,’  हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हे वाक्य पुन्हा लिहावं इतकं महत्त्वाचं आहे..

याचं कारण म्हणजे स्पाँडिलोसिसचा मज्जारज्जूवरचा दाब शिगेला पोहोचेपर्यंत, मज्जारज्जूमध्ये एक प्रकारची दाब सहन करूनही कार्य करत राहण्याची जी सहनशीलता असते त्यामुळे लक्षणं दिसत नाहीत. दाब खूप वाढून सहनशीलता पार झाल्यावरच अशी लक्षणं सुरू होतात. ही लक्षणे दिसू लागल्यावरसुद्धा त्यांचा अन्वयार्थ नीट न लागल्याने अनेक रुग्णांचं योग्य निदान होत नाही. पुढची पायरी म्हणजे स्पाँडिलोसिसचा दाब वाढून मज्जारज्जू अधिक खराब झाला तर चालताना पाय अत्यंत जोरात थरथरणं, तोल जाण्याचं प्रमाण वाढून आधार द्यावा लागणं, तळहातातील स्नायू वाळून बारीक होणं आणि तळहाताचा आकार वाकलेल्या पंजासारखा (क्लॉ हँड) होणे अशा गोष्टी सुरू होतात. लघवीवरचा ताबासुद्धा जाऊ शकतो. म्हणजेच क्रिस्तोफर रीव्हला जो एका क्षणात डोक्याखाली पॅरॅलिसिस झाला तो अनेक महिन्यांमध्ये हळूहळू होत जातो. अशा आजाराच्या वाढलेल्या स्थितीत जेव्हा व्हीलचेअरवरून रुग्ण न्युरोसर्जरी क्लिनिकमध्ये येतात यांना खोलात जाऊन प्रश्न विचारल्यावर वर दिलेली लक्षणे अनेक महिने चालू आहेत हे लक्षात येतं आणि त्या लक्षणांचा अन्वयार्थ योग्य पद्धतीने आधीच लागला असता तर खूप गोष्टी टळल्या असत्या असं प्रकर्षांनं वाटल्यावाचून राहात नाही.

दंड आणि हातापुरता..

स्पाँडिलोसिसच्या दाबात एक दुसरा प्रकारसुद्धा आपल्याला माहीत हवा. यात संपूर्ण मज्जारज्जूवर फार दाब न येता मणक्यातून बाहेर पडून दंड व हातात जाणाऱ्या नसेवर दाब येतो व थोडी वेगळी लक्षणं दिसतात.

दोन मणक्यांमधून बाहेर पडणारी नस एका गोलाकार पण चिंचोळय़ा बोगद्यातून बाहेर येते. स्पाँडिलोसिसने वाढलेलं हाड जर या बोगद्यात घुसलं तर नसेवर दाब येतो आणि ही लक्षणे दिसतात. मान व एका बाजूचा खांदा दुखणे, मानेपासून कळ सुरू होऊन ती खांद्यातून जाऊन दंड व हातात पसरणे, दंड.. हात.. किंवा तळहातातील स्नायूंची शक्ती कमी होणे, अशी लक्षणं यात दिसतात ( याला ‘सव्‍‌र्हायकल रॅडिक्युलोपथी’ म्हणतात).  कधी कधी कळ न येतासुद्धा फक्त हातातील स्नायूंची शक्ती कमी होते, याला वेदनारहित दाब ‘पेनलेस रॅडिक्युलोपथी’ म्हटलं जातं.

अनेक वेळा असं दुखणं अचानक झोपेतून उठल्यावर सुरू होतं. मान अवघडलेल्या स्थितीत जर झोप झाली तर हे होऊ शकतं.

मज्जारज्जूवरील दाबावर, म्हणजेच ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलोटिक मायलोपथी’ या आजारावर शस्त्रक्रियेने दाब काढण्याची जी तंत्रं आहेत ती गेल्या शंभर वर्षांत विकसित झाली. त्यांच्या खोलात जाणं इथे शक्य व योग्यही नाही पण थोडक्यात सांगायचं तर : मणक्यातला दाब काढण्याच्या शस्त्रक्रिया प्रथम कंबरेच्या मणक्यासाठी सुरू झाल्या. त्यातील सुरुवातीच्या अनुभवांवर आधारित शस्त्रक्रिया मानेच्या मणक्यावर सुरू झाल्या. त्या अर्थात मागून म्हणजे मानेच्या पाठीमागच्या भागातूनच केल्या जायच्या. १९५० च्या दशकात मात्र मणक्यावर मानेच्या पुढच्या बाजूने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. स्मिथ आणि रॉबिन्सन या दोन शल्यचिकित्सकांनी मणक्याच्या पुढच्या बाजूने डिस्क काढण्याची शस्त्रक्रिया १९५५ साली केली. डॉ. क्लॉवर्ड या न्यूुरोसर्जननं १९५८ साली पुढून शस्त्रक्रिया करण्याची आणखी एक पद्धत विकसित केली.

यानंतरच्या काळात शस्त्रक्रियांमध्ये अनेक सुधारणा होत गेल्या.

पण मला असं वाटतं की शस्त्रक्रियांच्या पद्धतींपेक्षा या आजाराची प्राथमिक लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. किंबहुना एकंदरीतच रुग्ण म्हणून प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

मज्जरज्जू : सामान्य स्थितीतला (डावीकडे) आणि मणक्याचा दाब आल्यानंतरचा

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com