सध्या मृत्यूच्या भीतीपुढे जगण्याच्या इच्छाशक्तीने हात टेकले आहेत आणि अविवेकाच्या गाजावाजापुढे विवेकाचा आवाज क्षीणला आहे. म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे मलेरियावरील औषध करोना रुग्णांना वापरणे अशास्त्रीय, असे म्हणणाऱ्या तज्ज्ञांचे ऐकतो कोण, अशी परिस्थिती आहे. तर वापरून बघायला हरकत काय, म्हणणाऱ्या उतावीळ, बोलघेवडय़ा तज्ज्ञांची चलती आहे. त्यात क्लोरोक्विनचा प्रचार करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वार्थ साधत आहेत की परमार्थ? आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन.. ते सैरभैर झाले आहेत की लोकानुनय करत आहेत? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याबरोबरच काही वृत्तमाध्यमे विज्ञान आणि विवेकाची कास धरून डोकी ताळ्यावर आणण्याचे, प्रबोधनाचे कामही करीत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाशी कसे लढावे, हे कळेनासे झालेले अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ‘क्लोरोक्विन’च्या कच्छपी लागले आहेत. मलेरियाचे औषध घेतले तर तुमचे काहीही नुकसान होणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले, वरून भारताने निर्यातनिर्बंध हटवले नाहीत तर ‘परिणाम भोगावे लागतील’असा इशाराही जाहीरपणे दिला. परंतु छोटय़ा, गरीब देशांचे प्रमुख मात्र विवेकाने परिस्थिती हाताळत आहेत. याचे उदाहरण म्हणजे ग्वाटेमालाचे अध्यक्ष अलेहान्द्रो जिआमत्ती. ‘पुष्कळ जण करोनाच्या संसर्गापासून एरवीही वाचणार आहेत, पण तुम्ही ते यकृतास घातक औषध घेतलेत तर मरण ओढवून घ्याल,’ असा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याला ठळक प्रसिद्धी देताना ग्वाटेमालातील ‘प्रेन्सा लिब्रे’ (फ्री प्रेस) या स्पॅनिश वृत्तपत्राने मलेरियावरील औषध कोरोनावर लागू पडते, हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झाले नसल्याचे वाचकांच्या निदर्शनास आणत, करोनावर मलेरियाचे औषध घ्या म्हणणारे ट्रम्प आणि ते घेऊ नका म्हणणारे अलेहान्द्रो या दोन राष्ट्रप्रमुखांच्या विचार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधले आहे.

क्लोरोक्विनच्या प्रचाराचा अतिरेक ट्रम्प वारंवार करीत असल्याने तेथील वृत्तपत्रांना या प्रकाराला हितसंबंध आणि दलालीचा वास येत आहे. ‘ट्रम्प यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा कज्जेदलालीचा व्यवसाय पाहता या औषधप्रचारात त्यांचे हितसंबंध गुंतल्याचा त्यांच्या टीकाकारांचा कयास आहे. ज्या अर्थी ट्रम्प वारंवार मलेरियाचे औषध घेण्यास सांगत आहेत त्या अर्थी नफ्यातील वाटा त्यांनाही मिळत असावा, असाही एक अंदाज असल्याचे,  ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील विश्लेषणात्मक लेखात म्हटले आहे. या अंदाजांची पुष्टी करणारे वृत्त ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचीच आवृत्ती असलेले मलेरियावरील ‘प्लॅक्वेनील’ हे औषध बनवणाऱ्या ‘सनोफी’ या फ्रेंच औषधनिर्मिती कंपनीत ट्रम्प यांची छोटी गुंतवणूक आहे, असे टाइम्सचे वृत्त म्हणते, परंतु ‘सनोफी’तील गुंतवणुकीचे आकडे आणि त्यांच्या लाभाची गणिते पाहता ट्रम्प यांच्या आक्रमक औषधप्रचारामागे त्यांची स्वत:ची नफेखोरी नसेल, पण  राजकारण नक्कीच आहे, असे विश्लेषण ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा लेख करतो.

फ्रान्समधील डॉ. दिदिए रॉल या वैद्यकतज्ज्ञाने क्लोरोक्विन करोनावर लागू पडत असल्याचा दावा मार्चमध्ये केल्यानंतर या औषधाचा गाजावाजा सुरू झाला. मग हे औषध सर्वत्र उपलब्ध करण्यासाठी फ्रेंच नागरिकांची स्वाक्षरी मोहीम असाही उपक्रम सुरू झाला. गेल्याच आठवडय़ात फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी डॉ. रॉल यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या या भेटीवर माध्यमांत टीकाटिप्पण्या सुरू आहेत. काही फ्रेंच माध्यमांनी या भेटीचा वृत्तांत, ‘सल्लामसलत की अभिषेक’ असे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला आहे. मॅक्रॉन यांच्यावर संशोधक, संपादक, डॉक्टर मंडळी टीका करीत असल्याचा वृत्तांत ‘क्षिनहुआ’ या चीनच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेतील अग्रगण्य ‘सायन्स’ नियतकालिकानेही या भेटीचा वृत्तांत देताना क्लोरोक्विनच्या वादात मॅक्रॉन तेल ओतत आहेत का, असा प्रश्न केला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा समावेश डॉ. रॉल यांनी आपल्या प्रयोगात केला नाही, त्यांचा समावेश या औषधाच्या प्रयोगात करावा, अशी सूचना फ्रान्समधील नामांकित डॉक्टरांनी केल्याच्या ‘ल् फिगारो’मधील वृत्ताचा हवालाही ‘सायन्स’ने दिला आहे.

आज अमेरिका, ब्राझील या देशांना करोनाशी लढण्यासाठी क्लोरोक्विन ही तथाकथित ‘संजीवनी’ हवी आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी भारताकडे क्लोरोक्विनची मागणी केली होती. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानाने जशी हिमालयातून पवित्र संजीवनी आणली तशी आम्हाला तुमच्याकडून क्लोरोक्विनची गरज आहे, अशी भावनिक व आध्यात्मिक साद बोल्सोनारो यांनी नरेंद्र मोदींना घातल्याचे सांगणारा ‘द प्रिंट’ या भारतीय वृत्तसंकेतस्थळावरील लेख स्पॅनिशमध्येही भाषांतरित झाला आहे. या वृत्ताची दखल  घेताना ‘गल्फ न्यूज’ने,  बोल्सोनारो आणि मोदी हे दोन्ही नेते ‘धार्मिक’ असल्याचे म्हटले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)

मराठीतील सर्व विश्वाचे वृत्तरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump claim that malaria drugs treat coronavirus zws
First published on: 13-04-2020 at 01:58 IST