अर्जन सिंग ज्या काळात हवाई दलात सामील झाले त्या १९३०च्या दशकात ब्रिटिश भारतीय सेनादलांच्या भारतीयीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. काही निवडक भारतीय अधिकाऱ्यांना ब्रिटनमधील क्रॅनवेल येथील हवाई दल आणि सँडहर्स्ट येथील लष्करी अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठवले जाऊ लागले होते. एच. सी. सरकार, सुब्रोतो बॅनर्जी, के. के. मझुमदार,  अर्जन सिंग, हृषीकेश मूळगावकर आदी पहिल्या फळीतील मूठभर अधिकारी. या अधिकाऱ्यांनी पुढील पिढय़ांसाठी आदर्श घालून देण्याचे, उच्च मानके स्थापित करण्याचे काम केले. या पहिल्या फळीतील बहुतेक सर्व अधिकारी पुढे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले. त्यात अर्जन सिंग यांचे नाव भावी हवाई योद्धय़ांसाठी सतत प्रेरणादायी ठरले आहे.

अर्जन सिंग यांची नेमणूक अखंड भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात (आताच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती प्रदेशात) झाली; तेथे पठाण टोळीवाल्यांशी लढताना एकदा त्यांच्या विमानाला तोफगोळा लागून विमान इंजिन बंद होऊन कोसळले. अर्जन सिंग यांच्यासह त्यांचा गनर गुलाम अली हाही जखमी झाला होता. विमान पडल्यानंतर दिशाभ्रम झाल्याने तो चुकून शत्रूच्या दिशेने पळत होता. मात्र अर्जन सिंग यांनी त्याला एकटय़ाला न सोडता मदत मिळेपर्यंत झगडून तळावर परत आणले. सहकाऱ्यांना संकटात एकटे न सोडण्याचे हे सक्रिय उदाहरण ठरले.

भारत-पाकिस्तान यांच्यात १९६५ साली मुख्य युद्ध होण्यापूर्वी काही दिवस आधी कच्छच्या रणात दोन्ही सैन्यांत चकमक झडली, तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख असगर खान यांनी भारतीय हवाई दल प्रमुख अर्जन सिंग यांना दूरध्वनी करून दोन्ही हवाई दलांनी युद्धात सहभागी होऊ नये, असे सुचवले. असगर खान त्यांचे क्रॅनवेल येथील प्रशिक्षण काळापासूनचे मित्र. त्या वेळी पाकिस्तानच्या हवाई दलाकडे अमेरिकी एफ-८६ सेबर व एफ-१०४ स्टारफायटर ही अद्ययावत विमाने व हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असल्याने त्यांच्याकडे गुणात्मक आघाडी होती. त्यामुळे भारताला युद्धात काही नुकसानीची तयारी ठेवावी लागेल, हे सिंग यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सांगितले होते. मात्र पुढे जेव्हा पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँडस्लॅम सुरू केले तेव्हा सिंग यांनी चव्हाणांना दिलेला शब्द पाळून एका तासात हवाई दलाची विमाने आघाडीवर धाडली होती. तसेच ‘१९६५च्या युद्धात दोन्ही देशांची साधारण बरोबरी साधली गेली, मात्र भारताचे पारडे काहीसे वरचढ होते,’ ही वस्तुस्थिती ते मान्य करत. एकदा रणांगणात शत्रूच्या नांग्या ठेचल्या की नागरी जीवनात त्याच्याशी खुलेपणाने वागण्याचा उमदेपणाही त्यांच्यात होता. युद्धानंतर असगर खान यांचे पद जाऊन त्यांच्या जागी नूर खान पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख झाले. तेही  सिंग यांचे मित्र होते आणि पाकिस्तानला गेल्यावर नूर खान यांनी आपल्या घरी उतरवून पाहुणचार केल्याचे सिंग सांगत.

अर्जन सिंग यांच्याच काळात भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांचे पद एअर चीफ मार्शल या दर्जाचे झाले आणि ते त्या पदावरील पहिले भारतीय होते. मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स हा सर्वोच्च पंचतारांकित सन्मान मिळवणारे ते भारताचे पहिले व एकमेव अधिकारी. हा सन्मान तहहयात राहणारा; पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम निवर्तले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहिलेले अर्जन सिंग कलाम यांच्या पार्थिवाला सलाम ठोकण्यासाठी चाकाच्या खुर्चीतून उभे राहिले होते. कितीही मोठा सन्मान मिळाला तरी लोकशाहीत सेनादले लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अधीन असतात, हे मूल्य रुजवण्यात अर्जन सिंग यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे.