कीथ गीसन या अमेरिकी लेखकाच्या ‘ऑल द सॅड यंग लिटररी मेन’ आणि इतर लेखनतुकडय़ांमध्ये १९९० च्या दशकाखेरीस अमेरिकेत लेखन उमेदवारी करताना प्रतिभा नशेवर जगणाऱ्या आर्थिक कफल्लक लेखकांचा जथ्था सापडतो. त्यात एका बाजूला सर्जनशील जगणे शिकविणाऱ्या विद्यापीठातील लेखक स्नातक, लेखन कार्यशाळा आणि लेखन निवासाच्या सुविधेतून घडणारे हुशार लेखक होते आणि भाडय़ासह एकमेकांचे कपडे वाटून घेत प्रकाशकांचे, मासिकांचे उंबरठे झिजविणारे लेखनेच्छुक दुसऱ्या बाजूला. नुकतेच ‘लेस’ या कादंबरीसाठी पुलित्झर मिळालेले अ‍ॅण्ड्रय़ू सीआन ग्रीअर दोन हजारोत्तर काळात झळकलेल्या लेखकांच्या जथ्थ्यातल्या पहिल्या गटात मोडतात. त्यांना स्वत:ला लेखनामध्ये सिद्ध करण्यासाठी मात्र दुसऱ्या गटासारखा संघर्ष करावा लागला. सत्तरच्या दशकातील हीपस्टर्स पिढीसोबत वैज्ञानिकांच्या घरात जन्मलेल्या ग्रीअर यांनी ब्राऊन विद्यापीठातून लेखनात पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या बाजारात शिक्षण आणि स्वत:बद्दलचे भ्रम वेगाने संपुष्टात येतात. तसेच काहीसे या लेखकोच्छुक तरुणाचे झाले आणि भ्रमनिरास झालेल्या अवस्थेत चित्रपटांमध्ये किडुकमिडुक भूमिका, शोफरगिरी आणि वाटेल त्या नोकऱ्या असा प्रवास करीत त्यांनी कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकविण्यास सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखनाबाबतच्या आटलेल्या भरवशाला शोधत २००१ साली त्यांची पहिली कादंबरी ‘द पाथ ऑफ मायनर प्लॅनेट्स’ प्रसिद्ध झाली. दोन खगोल संशोधकांपैकी एकाकडून धूमकेतूचा शोध लागण्याचे कथानक त्यांच्या कुटुंबातील पाश्र्वभूमीतून त्यांनी हाती घेतले होते. सुरुवातीच्या उमेदवारीत मासिकांमध्ये नावासह झळकण्यासाठी कथा पाठविण्याचे काम त्यांच्याकडून नित्यनेमाने होत होते. दोनशेहून अधिक कथा साभार परत आल्यानंतरही त्यांनी कथा पाठविण्याचा हट्टाग्रह सोडला नाही आणि एकदाची ‘एस्क्वायर’ मासिकाने त्यांची कथा प्रसिद्ध केली. त्यानंतर न्यू यॉर्कर, पॅरिस रिव्ह्य़ू या शुद्ध साहित्यिक मासिकांमध्ये ग्रीअर यांच्या कथा छापून येऊ लागल्या. पुढे २००४ मध्ये त्यांची ‘द कन्फेशन्स ऑफ मॅक्स टिव्होली’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. म्हातारपणी जन्माला येऊन उत्तरोत्तर तरुण होत जाणे असा काहीसा अनैसर्गिक विषय यात हाताळला आहे. विनोदी व तिरकस मांडणीमुळे ही कादंबरी खूपविक्या गटांत मोडू लागली आणि अ‍ॅण्ड्रय़ू ग्रीअर यांचा लेखनविश्वास दुणावत गेला.

गेल्या काही वर्षांतील लिखाणातील यशापयशाचा आणि साहित्यिक गोतावळ्यातील वातावरणाचा वापर करून त्यांनी गतवर्षी ‘लेस’ ही कादंबरी लिहिली. आपल्या अपयशाची जाणीव धुऊन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यमवयीन लेखकाचा प्रवास हा ‘लेस’च्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रवासात भारताचाही समावेश असल्याने आपल्याला ती वाचण्यासाठी निश्चितच एक कारण आहे! ‘नॅशनल’ तसेच ‘बुकर’ पुरस्कार मिळविलेल्या पुस्तकांना मागे टाकत ‘लेस’ने ‘पुलित्झर’मध्ये बाजी मारली आहे.

Web Title: American novelist andrew sean greer
First published on: 09-05-2018 at 01:47 IST