आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील तरुण उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. या मालिकेत आता आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवडून गेलेले अनिरुद्ध राजपूत यांची भर पडली आहे. या आयोगाच्या ६८ वर्षांच्या इतिहासात वयाच्या ३३ व्या वर्षी निवड होणारे ते सर्वात तरुण सदस्य आणि पहिलेच मराठी वकील ठरले आहेत. आशिया खंडातून निवडून आलेल्या सात उमेदवारांमध्ये सर्वाधिक १६० मते राजपूत यांना मिळाली. ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसाला १९ बठकांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जगातील एकूण १२० देशांमध्ये प्रचार केला.

पुण्यातील आयएलएस या संस्थेच्या विधि महाविद्यालयातून त्यांनी २००५ मध्ये एलएल.बी.ची पदवी मिळवलीच, पण महाविद्यालयातर्फे दिला जाणारा सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. नंतर त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाच जेथे प्रवेश मिळू शकतो अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्स या विख्यात संस्थेतून एलएल.एम. ही पदव्युत्तर पदवी मिळविली. तेथून पीएच.डी.साठी त्यांनी सिंगापूर गाठले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथे गुंतवणूकविषयक करारातील लवाद आणि नियमन या विषयात  त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट मिळविली. गेली सहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असून अल्पावधीतच त्यांची कारकीर्द बहरली. वकिली करीत असतानाच इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट येथे दोन वर्षे ते अभ्यागत प्रोफेसर होते. आंतरराष्ट्रीय व्यापार लवाद आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे हे विषय ते पदवी पातळीवर शिकवीत असत. सध्या ते दिल्लीच्या राष्ट्रीय विधि विद्यापीठात विशेष आमंत्रित म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.  विविध कायद्यांचे राजपूत यांना सखोल ज्ञान असल्याने अनेक राज्यांनी उच्च न्यायालयात त्यांना आपली बाजू मांडण्याची जबाबदारी वेळोवेळी सोपवली. पर्यावरण ते जागतिक पातळीवरील  किचकट करारांसंदर्भातील हे दावे होते. केंद्र व विविध राज्यांनीही महत्त्वाच्या पदांवर त्यांना नियुक्त केले. हरयाणा वित्त आयोगाचे सदस्य, विधि आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ गटाचे सदस्य, २०१२ मध्ये क्रीडा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे ते सदस्य होते. हे विधेयक संसदेसमोर विचारार्थ प्रलंबित आहे. इंडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट ट्रीटी अर्ब्रिटेशन आणि डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर ही राजपूत यांची दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. याशिवाय जागतिक स्तरावरील विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. हिंदी साहित्याचाही त्यांचा दांडगा व्यासंग आहे. नवीन वर्षांपासून त्यांची ही आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होईल. या आयोगावर काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आपल्या पाच वर्षांच्या काळात पर्यावरणासह विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नेमलेल्या लवादांच्या प्रक्रियेचे नियम तयार करण्यावर आपला भर राहील, असे ते सांगतात.