अंजली त्रिपाठी

आणखी काही अब्ज वर्षांनी पृथ्वी मंगळासारखी होईल का, अर्थात जीवसृष्टीसह सर्व काही गमावलेली.

आणखी काही अब्ज वर्षांनी पृथ्वी मंगळासारखी होईल का, अर्थात जीवसृष्टीसह सर्व काही गमावलेली. अमेरिकेतील भारतीय वंशाची तरुण खगोल वैज्ञानिक असलेली अंजली त्रिपाठी हिच्या मते हे शक्य आहे. तिने टेड टॉकमध्ये पहिल्यांदा ही धक्कादायक माहिती दिली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अंजली मूळ लॉस एंजल्सची. तिला लहानपणापासून अवकाशातील ग्रहगोलांचे आकर्षण. त्यातूनच तिची या क्षेत्रातील आवड वाढत गेली. अंजलीच्या मते पृथ्वीनेच काय पण प्लूटोनेही वातावरण गमावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंजलीला अलीकडेच लिंडन जॉनसन विद्यावृत्ती मिळाली असून हा निश्चितच मोठा गौरव आहे. अंजली त्रिपाठी ही हार्वर्ड विद्यापीठातून खगोलशास्त्राची पीएच.डी. करीत आहे. सध्या ती हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेत काम करते.

खगोलशास्त्रातील प्रेमातून आतापर्यंत मार्स रोव्हर्स प्रकल्पात तिने काम केले व एकमेकांवर आदळणाऱ्या दीर्घिकांचे संगणक सादृश्यीकरण केले. एमआयटीची पदवी तिच्याकडे आहे व केंब्रिज विद्यापीठातून तिने पीएच. डी.चे संशोधन करताना ग्रहांची निर्मिती व उत्क्रांती हाच विषय संशोधनासाठी घेतला आहे. तेथे ती ‘मार्शल छात्र’ म्हणून आकाशगंगेचा आकार व रचना यांचा अभ्यास करीत आहे. संगणकीय सादृश्यीकरणाने तिने ग्रहांच्या वातावरणाची त्रिमिती रचना दाखवली, तिच्या मते ग्रहांचे वातावरण हळूहळू लुप्त होत आहे. आता तिने ग्रहांच्या जन्मावेळच्या परिस्थितीचा अभ्यास सुरू केला आहे. अनेक ग्रहांचे वातावरण तापत असल्याने ते विरळ होत असल्याचा तिचा निष्कर्ष धक्कादायक वाटला तरी धोक्याची घंटा वाजवणारा आहे. आपल्या आकाशगंगेचे प्रारूप व कृष्णद्रव्याचा शोध अशा आणखी दोन क्षेत्रांत ती काम करीत आहे. कण भौतिकी, भूकंपशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र या विज्ञान शाखांत फर्मीलॅब, कालटेक, एमआयटी, नासा जेपीएल या संस्थांमध्ये तिने संशोधन केले आहे. मंगळावर असलेल्या स्पिरिट व अ‍ॅपॉच्र्युनिटी या रोव्हर गाडय़ांच्या नियंत्रण चमूत तिचा समावेश आहे. विशेष म्हणजे अंजली ही विज्ञानातील संकल्पना सोप्या करून सांगते.

स्मिथसॉनियन, टेड व टीच फॉर अमेरिका या संस्थांतून तिने विज्ञान लोकांपर्यंत नेण्याचे काम केले आहे. खगोल अध्ययनासाठी अमेरिकेतील काही विद्यापीठांना तिने एका कार्यक्रमात हार्वर्ड विद्यापीठांतर्गत ज्ञानाच्या आदान-प्रदानाची संधी दिली आहे. तिच्या कामाचा आतापर्यंत हार्वर्ड, एमआयटी व अमेरिकन रेडक्रॉस यांनी सन्मान केला होता. आता त्यात व्हाइट हाऊसने शिक्कामोर्तब केले आहे. अंजलीने खगोलशास्त्रासारख्या अवघड विषयात लहान वयात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anjali tripathi