एखाद्या विषयावर सखोल संशोधन करणे हे जसे तपश्चर्येचे काम, तेवढेच हे केलेले कार्य वा तो विषय समाजापर्यंत घेऊन जाणे हेही. हे दोन्ही यशस्वीपणे साधणारे ज्येष्ठ अभ्यासक उदयन इंदूरकर हे नुकतेच निवर्तले. प्राच्यविद्येसारख्या उपेक्षित विषयाचा शोध घेण्याचे आणि त्यातून घडलेला बोध समाजाला करून देण्याचे कार्य इंदूरकर यांनी केले. इंदूरकर हे भारतीय प्राच्यविद्या म्हणजेच इण्डोलॉजी या विषयातील प्रसिद्ध नाव. मंदिर स्थापत्य हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्रात पदवी घेतल्यानंतर इंदूरकर भारतीय प्राच्यविद्येकडे वळले. या विषयाचे रीतसर शिक्षण घेऊन ते शेवटपर्यंत भारतीय प्राच्यविद्येच्या विश्वात रमले. यातही प्राचीन हिंदू मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य विज्ञान हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. याअंतर्गत त्यांनी देशविदेशातील चारशेहून अधिक मंदिरांचा अभ्यास केला. भीमबेटका, वेरूळ, अंजिठा, खजुराहो इथपासून कंबोडियातील प्राचीन मंदिर समूहापर्यंत अनेक स्थळांचा अभ्यास करतानाच, हा ऐतिहासिक वारसा उलगडून दाखवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासाठी लेखनाबरोबरच व्याख्यानांचा मार्गही त्यांनी अवलंबला. ‘एक होतं देऊळ’सारख्या अनोख्या दृक्श्राव्य कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली. पाहणाऱ्याला खिळवून ठेवणाऱ्या, इतिहासाच्या पाऊलखुणांवरून फिरवून आणणाऱ्या या सव्वातीन तासांच्या कार्यक्रमात, भारतात मंदिरबांधणी कशी सुरू झाली इथपासून मंदिरनिर्मितीमागील तत्त्वज्ञानापर्यंत अनेक कंगोरे उलगडले जायचे. इंदूरकर यांच्या ‘वेरूळ : अद्भुत भारतीय शिल्प’ आणि ‘टेम्पल्स ऑफ कंबोडिया’ या दोन पुस्तकांतून त्यांचा या विषयातील प्रचंड अभ्यास दिसतो. मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांमधील आदिमानवाच्या कलाकृतींवर प्रकाश टाकणाऱ्या हरिभाऊ  वाकणकर यांचे ‘द्रष्टा कलासाधक’ हे छोटेखानी चरित्रही त्यांनी लिहिले.

Web Title: Article udayan indurkar akp
First published on: 11-12-2019 at 01:51 IST