‘देशातील महत्त्वाच्या किंवा बहुचर्चित घटनांबद्दल सरकारची भूमिका उच्चपदस्थांकडून लोकांपर्यंत पोहोचायला हवीच, परंतु सीमेवर जेव्हा कुरापती होत असतात तेव्हा माहितीयुद्धही सुरू असते. अशा स्थितीत नकारात्मक बातम्या खुबीने माध्यमांपासून टाळणे, हेही कर्तव्यच असते’ हे उद्गार आज कुणी काढल्यास, एखादा मोदीविरोधक गोरक्षकांच्या हिंसाचाराबद्दल सूचक तिरकसपणे बोलून पुढे सीमा सुरक्षा दलातील पदे स्वीकारण्यास अनेक पात्र उमेदवारांचा नकार, पाकिस्तानकडून सलग तीन दिवस शस्त्रसंधीभंग, त्यामुळे एक हजार नागरिक तात्पुरत्या निवाऱ्यांकडे.. आदी बातम्यांवर रोख ठेवतो आहे असा अर्थ काढला जाईल. परंतु वरील मत आय. राममोहन राव यांनी लडाखमधील चीनच्या कुरापतीसंदर्भात २००९ सालीच व्यक्त केले होते आणि या मताकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले होते. ते अपेक्षितच; कारण आय. राममोहन राव हे देशाचे माजी ‘प्रमुख माहिती अधिकारी’ तसेच राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, इंदरकुमार गुजराल आणि काही काळ पी. व्ही. नरसिंह राव अशा चौघा पंतप्रधानांचे माध्यम-सल्लागार होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्चपदी अनेक कर्तृत्वहीन माणसे बसतात, पण राव तसे नव्हते. सन १९७१ च्या युद्धात लष्कराचे ‘युद्धकालीन संप्रेषक’ (कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर) म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आठवण जाणकार मंडळी आजही काढतात. युद्धस्थितीत दिल्लीच्या साउथ ब्लॉकमधील वातानुकूल कचेरीतून प्रत्यक्ष अमृतसर सीमाभागात जाऊन, सैनिकांच्या राहुटय़ांत तात्पुरती कचेरी उभारूनही त्यांनी काम केले होते. भारतीय हवाईदल आणि नौदल पूर्व सीमेवर बांगलादेशाचा जन्म सुकर करीत असताना, पश्चिम सीमेवरून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या अफवा मुंबईपर्यंत पसरत होत्या, पण चोख लष्करी हवाल्याने तातडीने त्यांचे खंडन करून, भारतीयांचा हुरूप वाढवणारे काम राव करीत होते.

Web Title: I ramamohan rao former principal information officer
First published on: 16-05-2017 at 01:27 IST