‘वैसे हमारे ख्मिलाफ कुछ लोगों की एक शिकायत यहीं हैं कि हमने अपनी सौतेली माँ को कभी-कभी यूँ देखा हैं मानो वह हमारी महबूबा हो।’ – या वाक्यातील सारे शब्द कळण्यासाठी हिंदी ही तुमची मातृभाषाच असणे गरजेचे नाही. साधेच शब्द आहेत सारे.. हे एवढेच वाक्य वाचल्यास त्याचा अर्थ किती घाणेरडा होतो, असेच कुणालाही वाटेल.. शब्द कळले पण भाव कळले नाहीत, भाव कळले पण हेच भाव का असावेत याचे संदर्भ कळले नाहीत, संदर्भ कळले पण त्यामागच्या स्मृती कळल्या नाहीत.. की मग असाच राग येतो शब्दांचा! कृष्ण बलदेव वैद यांच्या बाबतीत असेच झाले. अश्लीलतेचा, पाश्चात्त्यांच्या अनुकरणाचा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. या संदर्भात आणि साहित्यविश्वाने आपल्याबद्दल दाखवलेल्या असमंजसपणाच्या स्मृतीनिशी एका मुलाखतीत वैद म्हणाले की, मी हिंदी साहित्याचा ‘सावत्र मुलगा’च आहे, याची मला पुरेपूर कल्पना आहे.. यानंतर ते वरचे वाक्य आले. त्याचा भावार्थ हा, ‘हिंदी आणि साहित्य यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पारंपरिक नाही. ही भाषा, हे साहित्य जणू माझ्याच काळाचे आहे असे मी मानतो’ – एवढाच!

हे कृष्ण बलदेव वैद गेले. गुरुवारी, न्यूयॉर्कमध्ये मुलीकडे राहायचे तिथे, ९२ व्या वर्षी वारले. आदरांजल्या भरपूर वाहिल्या गेल्या हिंदी साहित्यविश्वातून; पण वैद यांच्याबद्दलचा आदर आणि हिंदीने जिवंतपणी त्यांची उपेक्षाच केल्याची खंत असे दुहेरी स्वरूप लेवून ही आदरांजलीदेखील खंतावली. पण कदाचित, उद्या साहित्यिकांपुढे कसा उपेक्षेचाच काळ येणार आहे याची खूणगाठ पक्की असेल, तर कोणत्याही भाषेतील साहित्यिकाला वा दर्दी वाचकांनासुद्धा वैद यांचे ‘सावत्र’ पण संपन्न साहित्यजीवन हे प्रेरणादायीच वाटावे. दहा कादंबऱ्या, १८ कथासंग्रह आणि त्यातील वा अप्रकाशित कथांची मिळून आणखी चार संकलने, सहा नाटके, इंग्रजीतून हिंदीत अनुवाद केलेली चार, तर हिंदीतून इंग्रजीत नेलेली सात पुस्तके, एक निबंधसंग्रह व पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले रोजनिशीवजा तीन आत्मपर लेखनसंग्रह. ही झाली संख्येची मोजणी. गुण अगणितच. लहान वाक्ये. साधीच भाषा, मोठा अर्थ. वाचकावर विश्वास ठेवणारा, त्याला विचार करू देणारा कथात्म गुंता मांडण्याची हातोटी वैद यांच्याकडे होती. मात्र ‘कथेतला नकोसा गुंता सुटणे म्हणजेच आपलीही समज व्यापक होणे’ ही वाचकाला वैद यांनी दिलेली शक्ती वाचकांनीच कधी कधी अव्हेरली. मग समीक्षक सोकावले. ‘बिमल ऊर्फ जाएँ तो जाएँ कहां’ ही कादंबरी ‘अश्लील’ आहे’, अन्य पुस्तकांतही ‘फार लैंगिकता असते’ अशी टीका तर झालीच, पण १९४० नंतरचे नवे तत्त्वचिंतन हे अस्तित्ववादाची दखल घेऊनच पुढे जाणारे असल्याची गंधवार्ताच न ठेवता, ‘अस्तित्ववाद तर १९४०च्या दशकातच संपला फ्रान्समध्ये, मग आत्ता तो हिंदीत कशाला?’ असेही षटकार समीक्षकांनी ठोकले. अस्तित्ववादी ‘पर’-भावातून ‘एक नौकरानी की डायरी’सारखी कादंबरी होऊ शकते, ती उत्तम आणि मुख्य म्हणजे भारतीयच असू शकते, हे लक्षात न घेता टीका! अमेरिकेत (हार्वर्डहून) साहित्यात पीएचडी आणि पुढे दोन अमेरिकी विद्यापीठांत शिकवणारे वैद १९८५ ते ८८ या काळात भोपाळच्या ‘भारत भवन’चे प्रमुख होते, तोच त्यांचा मोठा सन्मान. दिल्ली साहित्य अकादमीच्या शलाका पुरस्कारासाठी २००९ मध्ये निवड होऊनही त्यांना तो नाकारला गेला, हे ‘सावत्र’पणावर शिक्कामोर्तब!