माणसाला चंद्र गवसला, त्याला रशिया व अमेरिकेच्या शीतयुद्धाची पाश्र्वभूमी होती. रशियाने पाठवलेला स्पुटनिक उपग्रह अमेरिकेवरून घिरटय़ा घालू लागला, त्या वेळी अवकाश स्पर्धेत रशियावर मात करण्याच्या हेतूने अमेरिकेने चंद्राला गवसणी घातली. आज काळ बदलला असला, तरी जेव्हा अमेरिका व भारत यांनी एकाच वेळी चंद्रावर अवकाशयाने सोडली, त्या वेळी इस्रोच्या यानाला चंद्रावर पाणी सापडले, पण तो दावा नासाने मान्य केला नव्हता. नासाचे वैज्ञानिक असलेले पॉल स्पुडिस हे भारताच्या त्या मोहिमेचे- ‘चांद्रयान १’चे प्रमुख निरीक्षण संशोधक होते. त्यांनी त्या वेळी नासा व इस्रो या दोघांचेही दावे फेटाळले होते. केवळ चंद्राचा अभ्यास हेच जीवनध्येय असलेल्या स्पुडिस यांचे नुकतेच निधन झाले. अमेरिकेतील ह्य़ूस्टन येथील ल्यूनर अँड प्लॅनेटरी इन्स्टिटय़ूट या संस्थेत त्यांनी उपसंचालक म्हणून काम केले. काही वर्षे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी या प्रयोगशाळेतही त्यांनी काम केले. ‘माणसासाठी चंद्र महत्त्वाचा का आहे’ हे शोधण्यातच त्यांनी आयुष्य खर्ची घातले. १९९४ मध्ये नासा व ‘बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स ऑर्गनायझेशन’ यांच्या क्लेमंटाइन या संयुक्त मोहिमेचे ते एक सदस्य होते. त्या वेळीही चंद्राच्या ध्रुवांवर पाण्याचे बर्फ असल्याचा दावा करण्यात आला होता. ‘या मोहिमेनेच मला चांद्र संशोधन मोहिमेशी जवळून संबंधित असण्याचा रोमांच मिळवून दिला,’ असे ते सांगत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासाठी त्यांच्या जाण्याने झालेली हानी वेगळीच आहे; कारण ‘चांद्रयान १’ या मोहिमेचे प्रमुख संशोधक या नात्याने, ‘मिनी-सार’ या उपकरणाने घेतलेल्या प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम त्यांच्याकडे होते. अमेरिकेच्या ‘ल्यूनर रेकनसान्स ऑर्बिटर’ या नासाच्या मोहिमेतील अशाच प्रकारच्या ‘मिनी आरएफ’ उपकरणाच्या माहितीचे विश्लेषण करण्याचे कामही त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. रोबोटिक (यंत्रमानवी) व मानवी अशा दोन्ही प्रकारच्या चांद्रमोहिमांचे ते समर्थक होते. माणसाला परत चंद्रावर पाठवण्यासाठी १९९० च्या सुरुवातीला जो सिंथेसिस गट स्थापन करण्यात आला होता, त्याचे ते सदस्य होते. अमेरिकेच्या अवकाश संशोधन धोरणाच्या अंमलबजावणी आयोगातही त्यांनी काम केले होते. ‘मून एक्स्प्रेस’ या कंपनीचे ते प्रमुख संशोधक होते.

स्पुडिस हे मूळचे भूगर्भशास्त्रज्ञ. ब्राऊन विद्यापीठातून ग्रहांच्या भूशास्त्राचा अभ्यास करून नंतर त्यांनी चांद्रभूमीचा अभ्यास सुरू केला. तेथील प्रत्येक विवराची, पर्वताची येथे बसूनही खडान् खडा माहिती होती. त्यांच्या निधनाने चांद्र संशोधनातील अनुभवी वाटाडय़ास आपण मुकलो आहोत.

Web Title: Lunar scientist and exploration advocate paul spudis
First published on: 05-09-2018 at 01:01 IST