पुण्यातील पेरुगेट भावे स्कूलच्या पाठीमागे असलेल्या चिंचोळ्या गल्लीतून जाताना पहिले घर लागत असे, ते प्रभाकर जोग यांचे. जरासे पुढे गेले की मात्र मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा प्रासादिक बंगला. मराठी भावसंगीतातील हे दोन दिग्गज नुसते सख्खे शेजारी नव्हते, त्यांचा एकमेकांशी स्वरानुबंध होता. मास्तरांनी प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना दिलेल्या संगीताने मराठी भावसंगीत के वढे तरी उजळून निघाले होते. जोग यांनी तीच गादी पुढे चालवली. मास्तरांचा प्रभाव असलेले संगीतकार सुधीर फडके  ऊर्फ  बाबूजी यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध जमले, याचे कारण मजेशीर होते. पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात प्रभाकर जोग या विद्याथ्र्याचे व्हायोलिन वादन ऐकून सुधीर फडके यांनी नुसती दादच दिली नाही, तर गाण्यांच्या तालमीलाही यायला सांगितले. जोगांसाठी ही सुवर्णसंधीच. एकदा चाल ऐकवत असतानाच, बाबूजींना नवीन काही सुचत होते. मात्र, आधीचे आठवून पुन:पुन्हा म्हणून ती चाल पक्की करण्यात नवे सुचलेले नेमके  काय होते, तेच आठवेना. जोगांनी धैर्य करून त्याचे नोटेशन वाजवून दाखवले, बाबूजी खूश झाले आणि त्यांचा बंध सुरू झाला, तो कायमचा. त्या काळात संगीताचे नोटेशन करण्याची रीत नव्हती. संगीतकाराने स्वररचना म्हणून दाखवायची, ती गायक कलावंताने पाठ करायची आणि संगीत संयोजकाने पाश्र्वसंगीतासाठी विविध वाद्यवादकांसाठी स्वतंत्र रचना करून ती त्यांच्याकडून घटवून घ्यायची, असा सारा प्रकार. जोगांकडे गाणे सुरू असतानाच त्याचे नोटेशन करण्याची क्षमता होती. अनेक संगीतकारांना त्यांच्याकडे असलेल्या या वेगळ्या कौशल्याचे कौतुकमिश्रित आदर वाटत असे. परंतु प्रभाकर जोगांचे व्हायोलिनवरील प्रभुत्व वेगळ्या पातळीवरचे होते. मुळात हे वाद्यच भारतीय वाद्यपरंपरेला नवखे होते. ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या या वाद्याने भारतीय परंपरेतील सारंगीला मागे टाकले. अभिजात संगीतात स्वतंत्रपणे रागदारी संगीतही सादर करू शकणारे वाद्य म्हणून ते मैफलींमध्ये दिमाखाने वावरू लागले. चित्रपट संगीताच्या क्षेत्रात त्याचे आगमन तेव्हाही अतिशय आनंदाने झाले. या संगीतात गायक कलावंताच्या बरोबरीने ते गीत वाजवता येणे, ही व्हायोलिन वादनाची सर्वात शेवटची पायरी. (त्याला ‘गीत वादक’ म्हणजेच ‘साँग व्हायोलिनिस्ट’ म्हणतात.) गायकांना त्या स्वरसंगतीचा फारच उपयोग होत असे. गीतातील प्रत्येक बारकावा तंतोतंत वाजवता येणारे व्हायोलिन वादक म्हणून प्रभाकर जोग यांचा चित्रपट संगीताच्या क्षेत्रात दबदबा होता, तो यामुळे. त्यांच्या ‘गाणारे व्हायोलिन’ या ध्वनिमुद्रणमालेतून याचे अतिशय सुरेल दर्शन घडते. जोगांना अतिशय श्रेष्ठ संगीतकारांचा सहवास मिळाला. संगीतकार होण्यासाठी तो फारच महत्त्वाचा आणि उपकारक ठरला. व्हायोलिन वाजवता वाजवता त्यांना स्वत:मधील सर्जनाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी संगीतकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली.

मराठी माणसांच्या कानामनात रुजलेली त्यांची अनेक गाणी आजही मनात रुंजी घालतात, ती त्यांच्या प्रासादिक संगीत रचनेमुळे. सहज लक्षात राहील, गुणगुणता येईल आणि त्यातील शब्दांनाही योग्य तो न्याय मिळेल, असे त्यांचे संगीत. आकारमानाने फार मोठे नाही, परंतु दर्जाने मात्र फार उंचीचे. अवघ्या बावीस चित्रपटांना जोगांनी संगीत दिले. परंतु त्यापलीकडे जाऊन अनेक भावगीते स्वरबद्ध केली आणि ती अजरामर झाली. मालती पांडे-बर्वे यांच्या आवाजातील ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का’ या गीतातील लय, शब्दांना स्वरांच्या कोंदणात बसवणारी स्वररचना, यामुळे हे गीत घरोघरी पोहोचले. ज्या सुधीर फडके यांचे संगीत संयोजक म्हणून प्रभाकर जोग यांनी खूप काळ काम पाहिले, त्या फडके यांनी जोगांनी स्वरबद्ध केलेली अनेक गीते गायली. ‘स्वर आले दुरूनी’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘प्रेमाला उपमा नाही’, ‘धुंद आज डोळे’, ‘शुभंकरोती म्हणा मुलांनो’, ‘ऊर्मिले त्रिवार वंदन तुला’ यांसारख्या किती तरी गीतांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढीला लागले. एका अर्थाने प्रभाकर जोग हे भावसंगीतातील ‘फडके घराण्या’चे वारसदार. परंतु गुरूच्या कलेची नक्कल न करता स्वत:च्या प्रतिभेने त्यात भर घालून ते घराणे पुढे नेण्याचे जे कार्य अभिजात संगीतातील कलावंतांनी आजवर केले, तेच जोग यांनी भावसंगीतात केले. त्यामुळे वाद्यावरील प्रभुत्वाला नवतेची जोड मिळाली. त्यांच्या निधनाने त्यांचे गाणारे व्हायोलिन मूक झाले आहे!

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!