मुंबई महानगरीशी स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रपटसृष्टीचे आणि चित्रपट-आकर्षणाचे घट्ट  जसे नि जितके घट्ट नाते; तितकेच ऐन मुंबईत- धोबीतलाव- न्यू मरीन लाइन्स भागात राहाणाऱ्या रशीद इराणींचे नाते जागतिक चित्रपटसृष्टीशी होते.        त्यांना कवितांचे आणि वाचनाचेही वेड होते. इतके की, ‘घरात एकटेच राहणाऱ्या रशीद इराणींचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला’ अशी निधनवार्ता आली, ती खुद्द रशीद यांनी वाचली असती तर, ‘एकटेच कसे? घरात पाच हजार पुस्तके आहेत की… ’ असा आक्षेप त्यांनी घेतला असता!

नावाजलेले चित्रपट-समीक्षक ही रशीद इराणींची ओळख. वृत्तपत्रे वा मासिकांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या समीक्षेशी त्यांनी आपले नाते अखेरपर्यंत कायम ठेवले. अन्य समीक्षक नाव झाल्यावर चित्रपट-महोत्सवांचे गुंफणकार (क्युरेटर) वगैरे झाले किंवा व्याख्याने देऊ लागले, त्या फंदात इराणी फारसे पडले नाहीत. ‘मुंबई प्रेस क्लब’ या संस्थेशी त्यांचे दीर्घकाळचे संबंध, त्यातून इथला फिल्म क्लब मात्र त्यांनी सुरू केला व सुरू ठेवला. भरपूर चित्रपट पाहावेत आणि त्यावर मनसोक्त लिहावे, अशी निकोप त्यांची चित्रपटसमीक्षा!

रशीद यांचा जन्म १९४७ सालचा. धोबीतलाव भागात घर, त्यामुळे मुंबईतील थिएटरांचा सहवास अगदी जवळचा. एडवर्ड, मेट्रो, लिबर्टी, कॅपिटॉल, रीगल, इरॉस ही गाजलेली चित्रपटगृहे १९५० च्या दशकापासूनच रशीद यांच्या पायांखालची. पण तरुणपणी या छंदाला निराळे वळण मिळाले. लिखाणाचे आणि ‘हिंदी नाही तर इंग्रजी’ या दुबोळक्यात अडकून न राहाता फ्रेंच, जर्मन आदी भाषांतील चित्रपट पाहण्याचे. हाच नेमका काळ, फ्रेंच नव-लाटेतील चित्रपटांचा. तेव्हा ही ‘न्यू वेव्ह’ रशीद यांनी वृत्तपत्राच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

मुंबईप्रेमी आणि मुंबईचे इतिहासकार, कवी आणि वाचनप्रेमी अशी निरनिराळी वर्तुळे रशीद इराणींना आपलेच मानत. धोबीतलाव भागातल्या – गेली कैक वर्षे बंद व इतिहासजमाच झालेल्या ‘बर्बन रेस्टॉरंट अ‍ॅण्ड स्टोअर्स’चे रफीक इराणी हे एकतृतीयांश मालकही होते. इराणी खाद्यपेयगृहे गेली, चित्रपटगृहे गेली आणि कोविडकाळात तर उरल्यासुरल्या चित्रपटगृहांतही चित्रपट लागेनात, हे स्थित्यंतर पाहाताना स्वत:ला कोविडबाधा झाल्यावर रशीद खचले होते, त्यांना सावरण्यासाठी प्रेस क्लबने चित्रपट पाहण्याची खास सोय करून दिली, हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे! पी. के. नायर यांच्यावरील माहितीपटातच आता रशीद यांचे दर्शन होऊ शकते.