रॉबर्ट शिफमन

मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येईल, असेही त्यांनी शोधून काढले होते.

अन्न शिजवण्यासाठी अत्यंत कमी वेळ घेणारी मायक्रोवेव्ह ओव्हन पद्धत आता सर्वांच्या परिचयाची आहे. ती विकसित करण्यात ज्यांचा मोठा वाटा होता ते रॉबर्ट शिफमन यांचे नुकतेच न्यूजर्सीत निधन झाले. जगातील अन्न तंत्रज्ञानातील एक आघाडीवरचे तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अन्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हची पद्धत विकसित केली. मॅनहटन ब्राउनस्टोन येथे त्यांनी संशोधक, सल्लागार, वैज्ञानिक या नात्याने काम केले. त्यांच्या नावावर ८० पेटंट होती. मायक्रोवेव्ह माझा मित्र आहे, असे ते म्हणत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच पदार्थ सहज गरम करणे शक्य होऊ लागले. त्यांनी मायक्रोवेव्हमध्ये तयार करता येईल असे कॅरमल पॉपकॉर्न, फ्रोझन पॉटपाइज ओटमील असे अनेक पदार्थ तयार केले. अन्नावरचे वेष्टन न काढताही ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येईल, असेही त्यांनी शोधून काढले होते. गोठवलेली कणीक कमीतकमी वेळात पूर्वपदावर आणण्याची सोयही त्यांनी केली. १९८० मध्ये त्यांनी आणि केन एकी यांनी मिळून हाफ टाइम ओव्हन तयार केले होते. त्यात गरम हवा फिरवण्यात आली होती. नंतर ते यंत्र बरेच विकले गेले. क्यूव्हीसी व अपोलो वल्र्डवाइड कंपन्यांनी त्याचे हक्क घेतले. शिफमन यांचे वर्णन मायक्रोवेव्ह गुरू असेच केले जात असे. मायक्रोवेव्हमध्ये बर्फ का वितळत नाही याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की बर्फ मायक्रोवेव्हची ऊर्जा शोषून घेऊ शकत नाही. शिफमन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९३५ रोजी मॅनहटन येथे झाला. त्यांचे वडील रंग तयार करीत असत तर आई गृहिणी होती. त्यांचे एक घर ब्राउनस्टोन येथे होते. तेथे शिफमन यांनी मायक्रोवेव्ह प्रयोगशाळा तयार केली. कोलंबिया विद्यापीठात फार्मसीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी परड्यू विद्यापीठातून रसायनशास्त्रात आणखी पदव्या घेतल्या. नंतर डीसीए फूड इंडस्ट्रीजमध्ये त्यांना नोकरी मिळाली  १९६१ मध्ये उष्णता कशी पसरते याचा अभ्यास करत असताना त्यांनी क्रोम प्लेटेड मशीनमध्ये एका व्यक्तीला सॅण्डविच गरम करताना त्यांनी पाहिले. नंतर त्यांनी त्याबाबत काही प्रयोग केले. त्यांचे हे संशोधन केवळ स्वत:पुरते किंवा त्या कंपनीपुरते नव्हते तर त्याचा अनेकांना फायदा झाला. एखादा अन्नपदार्थ पटकन गरम करून खाण्याची सोय झाली. आज सर्वत्र मायक्रोवेव्ह वापरले जातात. काहीजणांचा मायक्रोवेव्हला विरोध असला तरी कोट्यवधी लोक त्याचा दैनंदिन जगण्यात वापर करतात. मायक्रोवेव्हमध्ये नेहमीच्या पद्धतीने अन्न शिजत नाही. तर ऊर्जा प्रसारामुळे शिजते. ती प्रत्यक्षात उष्णता नसते तर तापमानातील फरकामुळे हवा तो उद्देश साध्य होत असतो. मायक्रोवेव्ह्जमुळे पदार्थांना मिळणारी उष्णता ही औष्णिक ऊर्जा असते. मायक्रोवेव्हच्या वापरामुळे तरंगलहरी घरात पसरतात, असा काहीजणांचा आक्षेप आहे. पण त्याला आधार नाही कारण त्या यंत्राची रचना वेगळ्या पद्धतीने केली आहे. मायक्रोव्हेव्ह्जच्या तरंगलांबीच्या लहरी ज्यातून बाहेर येणार नाहीत असे आवरण त्यात वापरलेले असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile robert schiffman akp

Next Story
राजेंद्र धवन
ताज्या बातम्या