पोतराज निर्मूलन, अनुसूचित जाती- जमातीमधील व्यक्तींना मंदिर प्रवेश, त्यांच्या हस्ते देवतांना अभिषेक व्हावा म्हणून झटणे… अशा उपक्रमांतून समतेचे मूल्य सामाजिक आणि राजकीय पातळीवर अबाधित राहावे या प्रयत्नांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे सि. ना. आलुरे गेले. त्यांच्या नावानंतर गुरुजी असा शब्द उच्चारला गेला नाही तर त्यांची ओळख अपुरी वाटावी एवढा व्यावसायिक दबदबा त्यांनी त्यांच्या कामाने उभा केला. ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा राखणाऱ्या, राष्ट्रीय संस्कार विकसित करणाऱ्या जवाहर विद्यालयातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. उस्मानाबाद जिल्ह्याातील आणि विशेषत: तुळजापूर तालुक्यातील विद्यार्थी डोक्यावर गांधी टोपी अक्षरश: मिरवितो. कारण या शाळांच्या गणवेशाचा टोपी हा अविभाज्य भाग होता. या टोपीमागचा विचार, शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवली. आलुरे यांनी तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा अनेक वर्षे फडकवत ठेवला. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या या कार्यकर्त्यांवर साने गुरुजी, विनोबा भावे, पुढे नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा प्रभाव अधिक होता. त्यामुळे अनेक समाजसुधारणेची कामे त्यांनी केली. तुळजापूर तालुक्यात अनेक विद्यार्थी पोतराज होत. केस राखत. त्यांचे शिक्षण सुटून जाई. पण केस कापले की ही मुले सामान्यपणे जगू शकतात, शिकू शकतात असा विश्वास निर्माण करून देण्यासाठी आलुरे गुरुजींनी विशेष परिश्रम केले. दांडगा जनसंपर्क हे आलुरे गुरुजींचे वैशिष्ट्य. त्यामुळे अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणारा तुळजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे सरकला. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि त्यानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मधुकरराव चव्हाण यांचा विजय आलुरे गुरुजींच्या शब्दांशिवाय पूर्ण होणे शक्य नसे. एका बाजूला राज्यभरच्या सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क, दुसरीकडे सहकारी संस्था नीट चालाव्यात म्हणून होणाऱ्या जाणीवपूर्वक प्रयत्नांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसह राज्य शिखर बँकेचे १५ वर्षे संचालक म्हणून काम करताना चुकीचे काही होऊ नये यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही अनेकांच्या लक्षात आहेत. पांढरा शुभ्र सदरा, शुभ्र धोतर आणि टोपी या पेहरावात राहणाऱ्या आलुरे गुरुजी यांनी विनयशील स्वभावाचा संस्कार ते अध्यक्ष असणाऱ्या बालाघाट शिक्षण संस्थेत काम करणाऱ्यांपर्यंत रुजविला. त्यासाठी ते आग्रही राहिले. म्हणूनच त्यांचे निधन पोकळी निर्माण करणारे आहे.