पर्यावरण क्षेत्रात दर वर्षी ब्रिटनमधील ‘दी व्हिटले फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या वतीने पुरस्कार दिले जातात, त्यांना ग्रीन ऑस्कर म्हटले जाते. यंदा हा पुरस्कार दोघा भारतीयांना मिळाला आहे त्यात एक आहेत आसामच्या पक्षी संवर्धन कार्यकर्त्यां पूर्णिमादेवी बर्मन तर दुसरे आहेत. कर्नाटकचे वन्यजीव संवर्धन कार्यकर्ते संजय गुब्बी. एकूण ६६ देशांतील पर्यावरण कार्यकर्त्यांतून त्यांची निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्णिमा या हार्गिला म्हणजे ग्रेटर अ‍ॅडज्युटंट स्टॉर्क या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यांनी आसामात कामरूप जिल्ह्य़ातील दादरा, पंचारिया, हिंगिमारी खेडय़ांमध्ये या पक्ष्यांसाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे त्या भागात बर्मन यांना स्टॉर्क सिस्टर म्हणजे स्थानिक भाषेत हार्गिला बैदू म्हणून ओळखले जाते. ३५ हजार पौंडांचा हा व्हिटले पुरस्कार पर्यावरण प्रकल्पास मदतीच्या रूपात दिला जातो. विशेष म्हणजे बर्मन यांची सगळी संस्था महिलांची आहे. आसाममधील पाणथळ जागेत आढळणारे हार्गिला पक्षी निसर्गाचे स्वच्छता दूत असतात. वयाच्या ३७ व्या वर्षी बर्मन यांनी पक्षी संवर्धनाचे उभे केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. सध्या हार्गिला स्टॉर्क (चित्रबलाक) पक्ष्यांची जगातील संख्या १२०० असून त्यातील ७५ टक्के आसाममध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेच्या मते या पक्ष्यांची संख्या १२०० ते १८०० असून त्यातील ८०० आसामात तर १५६ बिहारमध्ये आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी बर्मन यांनी २००९ पासून ‘अरण्यक’ ही संस्था चालवली असून त्यात फक्त महिलाच काम करतात. आसामी महिलांनी स्कार्फ व साडय़ा विणून त्यांची विक्री केली व त्या निधीतून या संस्थेसाठी पैसा उभा केला आहे. हा पुरस्कार म्हणजे जीवनात मोठा बदल घडवणारी घटना असल्याचे पूर्णिमा सांगतात. आता त्या पुरस्काराचा निधी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वापरणार आहेत. बर्मन यांनी कामरूप जिल्ह्य़ात पीएच.डी. करीत असताना पक्षी संवर्धनाचे काम हाती घेतले. पूर्णिमा यांनी वाडय़ा वस्त्यांमध्ये जाऊन स्थानिक लोकांमध्ये या पक्ष्यांच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला आहे. त्यासाठी त्यांनी पोस्टर्स, बॅनर्स या मार्गाचा वापर केला. हा पक्षी म्हणजेच तुमची संपत्ती आहे त्याला वाचवणे हे तुमचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे व तो तेथील लोकांमध्ये रुजला आहे. यापूर्वी बर्मन यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा अर्थ हिरो पुरस्कार मिळाला होता.

Web Title: Purnima devi barman sanjay gubbi
First published on: 20-05-2017 at 04:54 IST