मुंबईच्या सर्वात मोठय़ा सार्वजनिक ग्रंथालयाने (एशियाटिक लायब्ररी) पुस्तके स्वस्तात विकायला काढल्यावर पुस्तकप्रेमींच्या रांगा ज्या दिवशी लागल्या, त्याच ५ मेच्या गुरुवारी रजनी परुळेकर गेल्या.. जगण्यातले विरोधाभास स्त्रीच्या नजरेतून, स्त्रीच्या प्रतिमासृष्टीतून व्यक्त करणाऱ्या या कवयित्रीची निधनवार्ता देताना बहुतेक प्रसारमाध्यमांनी ‘ऑनलाइन मराठी विश्वकोशा’तील आयत्या माहितीचा आधार घेतला.. आणि ती अनेक वाचकांना नवीच वाटली!

 समाजाच्या मध्यमवर्गीय चौकटीत वावरणारी, गिरगावात राहणारी, साठच्या दशकात ‘एमए मराठी’ ही पदव्युत्तर पदवी मिळवून एकाच महाविद्यालयात वर्षांनुवर्षे शिकवणारी ही कवयित्री समाजजीवनाचे- माणसांचे- त्यांच्या नात्यांचे सहजासहजी न दिसणारे आतले पापुद्रे पाहणारी- प्रसंगी ते सोलून काढणारी होती, याची आच किती जणांना असेल? ती आच लोकांना नाही, म्हणून परुळेकर थांबल्या नाहीत. त्या अगदीच दुर्लक्षित राहिल्या असेही नाही.. चार कवितासंग्रह, पाचवा निवडक कवितांचा संग्रह (ज्याच्या मुखपृष्ठामुळे परुळेकर यांच्या छायाचित्राची उणीव भरून निघाली!), पहिल्याच संग्रहाला राज्य पुरस्कार, नंतरही कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा आणि महानोर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार, असे मानसन्मान मिळाले. पण प्रसिद्धी किंवा लोकप्रियता हा त्यांचा पिंड नव्हता आणि त्यांच्या कवितेचाही. या कवितेला हिंसावाचक उल्लेखसुद्धा वज्र्य नव्हते. सत्तरच्या दशकामध्ये आधीच्यांपेक्षा निराळी कविता लिहिणाऱ्या कवींना नेमके हेरून ग्रंथालीने ‘कविता दशकाची’ हा  प्रकल्प हाती घेतला त्यात परुळेकर होत्याच.. पण तेव्हा जगातल्या हिंसकपणाची जाणीव त्यांच्या कवितेत सूचकपणे येत होती. ‘मध्यरात्रीच्या सुमारास’ कुठूनतरी येणारा रडण्याचा आवाज ऐकून जगाविषयी जे वाटते आहे ते सांगणाऱ्या कवितेत बालमृत्यू, नकोशा गर्भधारणा यांचे थेट उल्लेख नव्हते, पाळण्यातल्या तान्ह्या मुलांबद्दलचे ‘हश् अ बाय बेबी’ हे इंग्रजी बडबडगीत आणि ‘पाळणा झाडावरून खाली पडेल’ हा त्याचा शेवट यांचा आधार घेऊन ‘फांदी आता तुटेल..’ अशी चिंता होती.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
ग्रामविकासाची कहाणी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

पशुत्वाच्या ‘गर्भखुणा’ माणसात असतात आणि अनेकदा त्या दिसतातही याची जाणीव परुळेकरांना होती, पण तरीही कुंपणाच्या तारेवर झोके घेत बसलेल्या चिमण्या जशा तारांच्या मधल्या काटेरी गाठी सहज टाळतात, तसा माणसांचा संवादही शक्य असतो असा विश्वासदेखील त्यांना – म्हणून त्यांच्या कवितेलाही होता. मात्र पुढल्या काळात या कवितेने जगाकडे, जगण्याकडे आणखी सखोलपणे पाहिले.  त्यातला अटळ संघर्ष, त्यामागचा अटळ अहंकार, त्यातून उद्भवणारी अटळ हिंसा यांच्या कथा जशाच्या तशा न सांगता त्यांना कवितेत रुजवले. एका कवितेत एकाच रसाचा परिपोष वगैरे संकेत झुगारणारी परुळेकर यांची कविता आशावाद, विद्रोह, व्याकुळता या साऱ्या अवस्था तात्कालिक मानणारी होती आणि त्या अवस्थांना ओलांडून शहाणिवेकडे जाण्याचा रस्ता शोधणारी होती. हा रस्ता दूरचाच, म्हणून जणू त्यांची कविताही दीर्घ. तिच्या सुरुवातीच्या ओळी साध्याशा कथानकवजा असोत की भावनांचा प्रस्फोट मांडणाऱ्या; तिची पुढली वाट मात्र सुखदु:खाच्या पल्याड गेलेली असे. जगाचे टक्केटोणपे नीट माहीत असणाऱ्या या कवितेने कल्पिताचा आधार घेणे- स्वप्ने पाहणे-  सोडले नाही. मग ते ‘प्रत्येक स्त्रीच्या हातात एक अ‍ॅसिड बल्ब, गर्दीत धक्के देणाऱ्या पुरुषाच्या तोंडावर फेकण्यासाठी’ अशा शब्दांतले असो की त्याच कवितेच्या शेवटाकडले, ‘एक नवा वसंतोत्सव सुरू होईल, फांद्यांच्या अंतर्भागातून वाहणारा हिरवा द्रव, स्त्रियांच्या हक्कांचा नवा जाहीरनामा, त्या हिरव्या शाईने लिहिला जाईल’ (पूर्वप्रसिद्धी : १९९९चा ‘आशय’ दिवाळी अंक) असे कल्पवास्तव असो. चटके सोसूनही जिवंत राहणाऱ्या आशेला परुळेकर यांच्या जाण्याने नवी घरे शोधावी लागतील.