महाराष्ट्र हे ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ आहे, असे महात्मा गांधी म्हणत. ऐंशी-नव्वदच्या दशकांपर्यंत तरी गांधीजींचे हे म्हणणे सार्थ होते. या काळात अनेक चळवळी इथे उदयाला आल्या, वाढल्या आणि काळाशी टक्कर घेता घेता ऱ्हासही पावल्या. या चळवळींनी मांडलेल्या सामाजिक प्रश्नांच्या निराकरणासाठी झोकून देऊन काम करणारे, ‘कार्यकर्तेपणा’ची जाणीव कामात आणि जगण्यातही जागती ठेवणारे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले. अशांपैकीच एक म्हणजे महमद खडस. गुरुवारी सायंकाळी त्यांची निधनवार्ता आली, आणि ‘सारेच दीप मंदावलेल्या’ वर्तमानात तो काळ अनेकांच्या डोळ्यांसमोर काही क्षण का होईना, तरळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजवादी चळवळीत वयाच्या १३ व्या वर्षांपासून ओढले गेलेल्या महमदभाईंचा प्रवास सुरू होतो चिपळुणातून. तिथे खलाशी म्हणून काम करणारे महमदभाई, ते सोडून मुंबईत आले. सुरुवातीला पडेल ती कामे त्यांनी केली, पण नंतर एका धान्य व्यापाऱ्याकडे ते रुजू झाले. शिक्षण बेताचे असले तरी कामाचा उरक आणि समज दांडगी असल्याने महमदभाई लवकरच त्या व्यवसायात चौथ्या हिश्श्याचे भागीदार झाले. जगण्यासाठीची ही धडपड सुरू असतानाच तत्कालीन राजकीय-सामाजिक चळवळींशी महमदभाईंनी स्वत:ला जोडून घेतले. महमदभाई समाजवादी चळवळीत होते, त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी भाग घेणे साहजिकच होते. आपल्या लहान-मोठय़ा कृतीमागे राजकीय विचार कार्यरत असतो, याचे तीव्र भान असणाऱ्या महमदभाईंची समाजवादाच्या राजकीय अवकाशाबद्दल काही ठाम मते होती. त्यामुळेच प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेशी युती करण्याला त्यांनी कडाडून विरोध केला होता. आणीबाणीविरुद्ध १४ महिन्यांचा कारावास भोगून आलेले महमदभाई , तेव्हा होऊ घातलेल्या ‘जनता पक्षा’बद्दल साशंक होते. त्यामुळेच समाजवादी पक्षाने जनता पक्षात विलीन होण्याऐवजी इंदिरा गांधींविरुद्ध व्यापक आघाडी स्थापन करावी, असे मत त्यांनी मांडले. पुढे जनता पक्षाचे जे झाले ते आणि त्यातून राज्याराज्यांत उगवलेले समाजवादी तुकडे पाहता महमदभाईंचे मत योग्यच होते, असे म्हणायला हवे. त्यामुळे जनता पक्षात राहण्यापेक्षा महमदभाई समकालीन चळवळींमध्ये सक्रिय झाले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन असो वा गिरणी कामगारांचा लढा, हमीद दलवाईंचे मुस्लीम सत्यशोधक मंडळ असो वा पुण्यातील विषमता निर्मूलन परिषद, मुंबईतील अपना बाजार चळवळ असो वा राष्ट्र सेवा दल, महमदभाई सर्वत्र सारखेच क्रियाशील राहिले.

युवकांना ठोस राजकीय-सामाजिक कार्यक्रम द्यावा म्हणून त्यांनी समता आंदोलन ही संघटना स्थापन केली. या संघटनेने तीन-चार वर्षे पदरमोड करून केलेला सफाई कामगारांच्या कामाची स्थिती आणि वस्त्या, राहणीमान आदींचा अभ्यास ‘नरकसफाईची गोष्ट’ या पुस्तकात आला आहे. य. दि. फडके यांच्या मार्गदर्शनाखाली व अरुण ठाकूर यांच्या साथीने महमदभाईंनी या सामाजिक दस्तावेजाचे लेखन केले. मुस्लीम समाजातील मागास घटकांचा अभ्यास करून त्याबद्दलचा एक अहवालही महमदभाईंनी सिद्ध केला होता.

Web Title: Senior leader of the socialist movement mohammed khadas zws
First published on: 23-11-2019 at 04:34 IST