अनुवादाच्या माध्यमातून मराठी व बंगाली साहित्याला एकमेकांशी जोडणाऱ्या वीणा आलासे यांचे नुकतेच झालेले निधन ही साहित्यविश्वाची मोठी हानी आहे. सत्यकथेच्या परंपरेतला एक तारा आणखी निखळला. आलासे मूळच्या चंद्रपूरच्या. आईवडिलांचे छत्र लवकर हरपल्याने नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यां कमलाताई होस्पेट यांनी त्यांचे संगोपन केले. लग्नानंतर कोलकात्यात स्थायिक झालेल्या वीणाताईंची शिक्षणाची ओढ कायम होती. त्यातूनच त्यांनी जादवपूर विद्यापीठातून वयाच्या ४०व्या वर्षी एम.ए. केले. नंतर शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्या लेखनाला बहर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कविवर्य ग्रेस यांच्या कवितांवरील त्यांनी केलेल्या समीक्षेने साहित्यक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. सत्यकथेत नेमाने लिहिणाऱ्या आलासेंनी बंगालमधील वास्तव्याचा पुरेपूर लाभ घेत अनेक पुस्तके अनुवादित केली. महात्मा फुलेंच्या ‘गुलामगिरी’चा अनुवाद त्यांनी बंगालीत केला. या पुस्तकाला अनुवादाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या पुस्तकामुळेच फुलेविचाराची जवळून ओळख बंगाली विचारविश्वास झाली. ‘जत्रा’ या बंगाली भाषेतील गाजलेल्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी मराठीत केला; तर विजय तेंडुलकरांचे ‘कन्यादान’ हे नाटक बंगालीत पोहोचवले. वयाच्या ६५व्या वर्षांपर्यंत शांतिनिकेतनमध्ये अध्यापन करणाऱ्या आलासे शेवटपर्यंत लिहित्या राहिल्या. दोन वर्षांपूर्वी त्यांचे ‘रवींद्र-दीक्षा : सप्तपर्णी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. उत्तम बौद्धिक समज, पुरोगामी विचार व सांप्रदायिकताविरोधी भूमिका, हे वीणातरईचे व्यक्तिमत्त्व लिखाणात दिसेच. १९८९ मध्ये भागलपूरला दंगल झाली तेव्हा आपले विद्यार्थी घेऊन त्या दंगलग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी थेट बिहारला गेल्या. बंगालमधील सुधारणावादी स्त्रियांची ओळख त्यांनी मराठी वाचकांना करून दिली. नटी विनोदिनी, वीणा दास व श्रीमती सरकार यांच्यावरचे त्यांचे लेखन स्त्रीविषयक चळवळीला समृद्ध करणारे ठरले. विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू व विचारवंत अम्लान दत्त यांच्या विचारांचा परिचय मराठी भाषिकांना व्हावा म्हणून त्यांनी वाईहून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकात विशेष लेखमाला लिहिली. राज्याबाहेर राहूनही मराठी साहित्याशी नाळ जोडून ठेवणाऱ्या सानिया, गौरी देशपांडे यांच्या परंपरेतल्या वीणा आलासे साहित्य संमेलनात हमखास दिसायच्या. गेल्या वर्षी नागपूरच्या बंगाली असोसिएशनने वीणा आलासेंचा सत्कार करून, दोन भाषांना सांधणारा सांस्कृतिक दूत म्हणून त्यांचा गौरव केला. वीणाताईंचे निधन कोलकात्याला राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे शनिवारी झाले.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer veena alase passed away
First published on: 03-06-2015 at 01:01 IST