सलमान रश्दी यांनी यंदा साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी निवडले गेलेले चिनी लेखक मो यान यांच्यावर केलेली ताजी टीका बोचरी आहे. तिचं सार असं की, चीनमध्ये काय जळतंय याकडे एवढय़ा जगभूषण लेखकाचं लक्षच कसं नाही? त्यावर ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या दैनिकाचे स्तंभलेखक पंकज मिश्रा यांनी केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद वाढणार, अशी चिन्हं आहेत.. मिश्रा यांनी मो यान यांच्यावर ही चीनधार्जिणेपणाची टीका आणखीही काहींनी केली असल्याकडे लक्ष वेधलं आहे आणि त्याविरुद्ध मत मांडण्यासाठी साक्ष काढली आहे ती थेट जॉन अपडाइक आणि व्लादिमीर नोबोकॉव्ह यांची. अमेरिकी कादंबरीकार अपडाइक यांनी व्हिएतनाम युद्धाला पाठिंबा दिला होता. हे अपडाइक १९८६ साली ब्रिटनमध्ये आले असता ‘पेन’ संघटनेच्या बैठकीत टपालखात्याचे गोडवे गाऊ लागले, तेव्हा सॉल बेलो आणि एल डॉक्टोरोव्ह यांसारख्या लेखकांनी अपडाइकना विचारलं-  तुम्हाला फक्त टपालपेटय़ाच दिसतात? बॉम्ब वगैरे नाही? एखाद्या लेखकाला त्याच्या राजकीय भूमिकेबद्दल थेट प्रश्न विचारण्याचा लढाऊ बाणा अमेरिकी व ब्रिटिश लेखकांमध्ये एरवी दिसत नाही, असंही मत पंकज मिश्रा नोंदवतात. नोबोकॉव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना पाठिंबा दिला होता. त्यांना कुणी काही विचारलं नाही. पाश्चात्य लेखक कसेही वागले तरी चालतं, पण अन्यदेशीय लेखकांनी मात्र आपापल्या देशांमध्ये उचित राजकीय भूमिकाच घेतली पाहिजे, असा आग्रह आहे की काय? तसा असेल तर सोडा; कारण सर्वच लेखकांचं लक्ष सत्तेवर असतं, असा सल्ला पंकज मिश्रा देतात!