आयुष्यभर वृद्धत्वाच्या प्रश्नावर जगभर विविध प्रकारचे कार्य करणारे डॉ. शरच्चंद्र गोखले हे शेवटपर्यंत वृद्धांचे तरुण नेते म्हणूनच वावरले. सारे जग जेव्हा तरुणाईच्या मागे लागले, तेव्हा त्याकडे पाठ फिरवून डॉ. गोखले यांनी म्हातारपणामुळे येणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी संस्था सुरू केली. समाजकल्याण विभागात संचालकपदावर असताना या प्रश्नांची तीव्रता अधिक लक्षात आल्याने सरकारी नोकरी सोडून उर्वरित आयुष्य याच कामासाठी व्यतीत करण्याची त्यांची इच्छा त्यांनी सार्थ केली. ‘कास्प’ या संस्थेच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संस्थांशी संपर्क प्रस्थापित करून त्यांनी आपली वेगळी ओळख सिद्ध केली. विषयाची उत्तम जाण, विषय मांडण्याची हातोटी आणि त्याला प्रत्यक्ष कार्याची जोड यामुळे डॉ. गोखले ‘इंटरनॅशनल’ कधी झाले, ते कळलेच नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख झाली, ती जगातल्या अशा अनेक संस्थांमध्ये आणि विशेषत: संयुक्त राष्ट्रांच्या समित्यांमध्ये त्यांनी घेतलेल्या सहभागामुळे. बालक, कुष्ठपीडित आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन पातळ्यांवर शरच्चंद्र गोखले यांनी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. कुष्ठरोग्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीही त्यांनी आयुष्यभर कार्य केले. वडील दामोदर ऊर्फ बाबुराव हे ‘केसरी’ वृत्तपत्राचे संपादक होते. लोकमान्यांच्या समाजकार्याचे संस्कार असल्याने जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी शरच्चंद्रांना मिळाली. त्यामुळे टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेतून समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली. प्रश्न समजून न घेता समाजकार्य करण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्या सोडवणुकीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार त्यांनी सतत केला. त्यातूनच इंटरनॅशनल लान्जिव्हिटी सेंटर (आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र), कास्प यांसारख्या संस्था निर्माण झाल्या. आयुष्यभर सतत विविध वयोगटांतील अडचणी समजून घेत राहिलेले डॉ. गोखले हरहुन्नरी होते. हसरा चेहरा आणि समस्यांचे दडपण जाणवू न देता त्याबद्दल अतिशय कळकळीने विचार करण्याची क्षमता हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणता येईल. पत्रकारितेचा वसा वडिलांकडून मिळाल्याने ‘केसरी’चे संपादकपद ही त्यांच्यासाठी विशेष बाब होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांची समज असल्याने त्यांनी आपल्या पत्रकारितेतही त्याचा खुबीने उपयोग करून घेतला. जगातल्या विविध भागांतील प्रश्न समजावून घेऊन त्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चळवळ उभी करण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याने विकसित देशांनाही या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहणे भाग पडले. काम करीत असतानाच लेखन करणे ही त्यांची हौस होती. बालकल्याणापासून ते वृद्धत्वापर्यंतच्या विविध प्रश्नांवर त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे आहेच, परंतु त्याबरोबरच ललित लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. पुरस्कार आणि मानसन्मान ही डॉ. शरच्चंद्र गोखले यांची खरी अमानत नव्हतीच. त्यांच्या कार्याच्या बोलबाल्याने असे पुरस्कार मिळणे स्वाभाविक होते. त्यांच्या जगण्याचे खरे सार्थक साऱ्या जगाला वेढून राहिलेल्या या समस्यांच्या निराकरणासाठी सगळ्या देशांनी पुढाकार घेण्यातच आहे. आता त्याही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्याचे श्रेय डॉ. गोखले यांनाच द्यायला हवे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
वृद्धांचा तरुण नेता
आयुष्यभर वृद्धत्वाच्या प्रश्नावर जगभर विविध प्रकारचे कार्य करणारे डॉ. शरच्चंद्र गोखले हे शेवटपर्यंत वृद्धांचे तरुण नेते म्हणूनच वावरले. सारे जग जेव्हा तरुणाईच्या मागे लागले, तेव्हा त्याकडे पाठ फिरवून डॉ. गोखले यांनी म्हातारपणामुळे येणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी संस्था सुरू केली.
First published on: 15-01-2013 at 11:53 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Younge leader of elders