19 February 2020

News Flash

अश्रूंच्या नात्याचं करुणोपनिषद

अनाम वृक्षाची स्मरणशिला..

मोती उधळताना सोबतीला आले

त्यांना विसरणं शक्य आहे,

अश्रू गाळताना साथीला होते त्यांना कसे विसरायचे?

पाण्याहून रक्ताचे नाते दाट असेल

पण अश्रूंचे नाते त्याहून घनदाट आहे..

अनाम वृक्षाची स्मरणशिला..

निव्वळ हव्यासापोटी मानवप्राण्याने बेसुमार जंगलतोड केली. आणि या विनाशक हस्तक्षेपामुळेच निसर्गचक्राचा समतोल बिघडला याची बाबा आमटेंना पूर्ण कल्पना होती. घरं बांधण्यासाठी, अवजारं बनवण्यासाठी, शेतीसाठी अशा हजारो अज्ञात सोयऱ्या वृक्षांची आहुती आनंदवन, सोमनाथ, लोक-बिरादरीच्या प्रारंभीच्या काळात नाइलाजाने पडली होती. बाबा म्हणत, ‘‘To me, a tree is a pole of Liberty. वृक्षाची पानं म्हणजे राष्ट्रध्वज आणि वृक्षाच्या फांद्यांवर बसणारे पक्षी म्हणजे साहसाचे, प्रीतीचे, स्वतंत्रतेचे राजदूत! The tree never judges, justifies… तो फक्त मदत करणं जाणतो.. आपल्या ‘उज्ज्वल उद्या’साठी स्वत:चा ‘आज’ कुर्बान करतो.’’ या अनामिकांप्रती ऋणनिर्देश म्हणून, त्यांच्या हौतात्म्याचा सन्मान म्हणून बाबांनी ‘अनाम वृक्षाची स्मरणशिला’ सत्तरच्या दशकातील मित्रमेळाव्यादरम्यान आनंदवनात रचली. या अनाम वृक्षांची पूजा नवीन रोपटी लावून केली जाते. हे नुसतं रोप लावणं नसतं, तर प्रत्येकाच्या मनात वृक्षप्रेमाचं बीज पेरणंही असतं. आणि या वृक्षारोपणाआधी अशा ‘बालतरूं’ची वाजतगाजत पालखी निघते. ‘बालतरूच्या पालखी’ची प्रेरणा ‘बाइशे श्राबण’! बंगालीत ‘बाइशे श्राबण’ म्हणजे श्रावण महिन्याची २२ तारीख. ‘वंगीय शका’प्रमाणे तेराशे अठ्ठेचाळीस सालच्या श्रावणातील बावीस तारखेला (७ ऑगस्ट १९४१ रोजी) गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या अलौकिक जीवनाचा अस्त झाला. ‘बाइशे श्राबण’पासून बंगालात ठिकठिकाणी ‘रवींद्र सप्ताह’ साजरा होतो. त्यातली सर्वात मन:स्पर्शी गोष्ट म्हणजे ‘वृक्षारोपण’! धरित्रीशी आईचे नाते मानणाऱ्या गुरुदेवांची मातीतून वर येणारी झाडे, वेली, गवताची पाती ही भावंडेच. वृक्षवेलींची आबाळ त्यांच्या कविमनाला माणसांच्या आबाळाएवढेच दु:ख देऊन जायची. निसर्गाच्या या डोळस भक्ताची पुण्यतिथी साजरी करताना ती केवळ त्याने ‘शांतीनिकेतन’मध्ये निर्माण केलेल्या सौंदर्यसृष्टीच्या स्मरणाने न करता तिथे प्रत्यक्ष कृतीची जोड दिली जावी, या जाणिवेतून ‘बाइशे श्राबण’ या दिवशी वृक्षारोपण होते! तर, ‘जीवनातील प्रत्येक कृतीला सुंदरतेने नटवावे..’ या गुरुदेवांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन कोवळ्या रोपटय़ाला समारंभपूर्वक शुभेच्छा देण्याचा असा हा ‘बालतरूच्या पालखी’चा सोहोळा. ही कल्पना ऐकूनच मोहरलेल्या गदिमांनी आजारपणातही उत्स्फूर्तपणे ‘कोवळ्या रोपटय़ा आज तू पाहुणा’ हे सुंदर स्वागतगीत लागलीच रचून पाठवलं! गाण्याला चाल बसवली पुलंनी, तर गायलं माधुरी पुरंदरे यांनी! कविवर्य वसंत बापटांची ‘नभात हिरवी विजय- पताका लहरू दे बलवंता’ आणि ‘आज ये अंगणा पाहुणा गोजिरा’ अशी सुंदर दोन गीतंही आनंद अंध विद्यालयातील संगीतशिक्षक घनश्याम गायधने आणि विद्यार्थ्यांनी गायली.

निसर्गचक्राचा बिघडलेला समतोल पुन्हा साधायचा असेल तर देशपातळीवर वृक्षांची लागवड आणि संवर्धन व्हायला हवं, या जाणिवेतून बाबांनी ‘Green Wall’ ची संकल्पना सोमनाथच्या श्रम-संस्कार छावणीत मांडली. ते म्हणाले, ‘‘जळणाचं लाकूड, इमारती लाकूड, फळं, फुलं, सावली देणाऱ्या झाडांच्या रांगांची ही ‘हिरवी भिंत’ प्रदूषणाला, अवर्षणाला तर रोखून धरेलच; पण मानवाचं मातीशी तुटलेलं नातंही जोडेल. आणि त्याहीपलीकडे जाऊन माणसांमाणसांतल्या भेदांच्या भिंती भुईसपाट करेल. कारण कोणत्याही जाती-धर्म-मत-पंथाच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी वृक्ष हेच एक Undebatable Vehicle ही संकल्पना रुजली आणि फोफावलीही. आनंदवन आणि इतर प्रकल्पांत वनशेतीच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड तर करण्यात आलीच; शिवाय महाराष्ट्र व गोव्यातल्या चारशे कॉलेजांतील २५०० विद्यार्थ्यांनी १९ ते २० नोव्हेंबर १९८२ दरम्यान सोमनाथ ते एकनाथ (पैठण) अशी ‘वृक्षगंगा’ दिंडी (Long March of Sapling) काढली. हा पाच-सहाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत त्यांनी गावोगावी वृक्षारोपण केलं. सोबतच कुटुंब-कल्याण, जातिभेद निर्मूलन, हुंडाबंदी, एक गाव- एक पाणवठा यांसारख्या आधुनिक विचारांचा प्रसारही त्यांनी केला. ‘वृक्षगंगा’ दिंडीच्या माध्यमातून सुमारे एक लाख झाडं लावली गेली.

उत्तरायण..

घरातली ‘अडगळ’ संबोधत ज्यांच्या मुलांनी उत्तरकाळात मदतीचा हात काढून घेतला अशा पोरक्या झालेल्या मंडळींसाठी बाबांनी १९७९ मध्ये ‘उत्तरायण’ सुरू केलं. निराधार वृद्ध वकील, कृषीतज्ज्ञ, अध्यापक, उद्योग-व्यवसायी, वैज्ञानिक अशा सर्वानी उत्तरायणात येत आपल्या आवडीच्या वा नैपुण्याच्या क्षेत्रातील कोणत्याही प्रकल्पाच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभागी व्हावे अशी बाबांची यामागील कल्पना होती. बाबा यास Wisdom Bank असं म्हणत. उत्तरायणाच्या इमारतीसाठी गोंदियास्थित उद्योजक आणि आनंदवनाचे स्नेही कमलाकर आणि शालिनीताई कुलकर्णी यांनी एक लक्ष रुपयांचं अर्थसाहाय्य केलं. जीवनाच्या उत्तरार्धातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सुरू झालेल्या ‘उत्तरायण’मध्ये Creative Aging ची कल्पना मूर्तिमंत साकारली. आनंदवनातील विविध प्रकल्पांत यथाशक्ती सहभागी झालेल्या उत्तरायणातील लोकांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा खूप फायदा झाला.

गोकुळ..

आनंदवनातलं प्रत्येक दु:खसुद्धा नव्या आनंदाला जन्म देतं. ‘गोकुळ’ची कहाणीही अशीच. १९५४ सालची घटना. वरोरा रेल्वेस्टेशनवर टाकून देण्यात आलेली एक तान्ही मुलगी घेऊन तिथला कर्मचारी सायकलवरून आनंदवनात आला आणि मुलीला ठेवून घेण्याची विनंती त्याने बाबांना केली. बाबांनी मुलीला ठेवून घेतलं आणि तिचं संगोपन केलं. त्याच दरम्यान वरोऱ्याच्या जवळ झुडूपी जंगलातल्या एका खड्डय़ात आपली नवजात मुलगी टाकून एक आई निघून गेली. एक पोलीस कॉन्स्टेबल त्या मुलीला आनंदवनात घेऊन आला. हातापायांच्या काडय़ा, त्वचेला एक्झिमा. एक क्षणही न दवडता इंदूने तिला कवेत घेतलं. तिचं नाव ठेवलं- ‘माया’! आईच्या मायेनं इंदूने मायाची शुश्रूषा केली. पण सहा महिन्यांनी असह्य़ आजारानं मायाचं निधन झालं. बाबा सांगत, ‘‘माया आम्हाला सोडून गेल्यानंतरचं इंदूचं रडणं मी कधीच विसरू शकणार नाही.’’ या घटनांनी समाजातल्या आणखी एका कठोर वास्तवाची जाणीव बाबा आणि इंदूला झाली. अश्राप बालकांना आईचंच नव्हे, तर गाईचंही दूध मिळत नाही अशा निष्पाप जिवांना प्रेमाची सावली मिळाली पाहिजे, हा विचार रुजला.

१९७९ साली वरोरा रेल्वेस्टेशनवर सापडलेलं चार-सहा दिवसांचं एक अर्भक घेऊन एक वृद्ध स्त्री आनंदवनात इंदूकडे आली. त्या मुलीला बघून इंदूच्या मनात मायाच्या स्मृती जाग्या झाल्या आणि आईची कूस गमावलेल्या अनेक नवजात अर्भकांना माया देणाऱ्या ‘गोकुळ’चा जन्म झाला. गोकुळातील सगळ्या बालगोपाळांची आई म्हणजे इंदू. गोकुळात येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला ती न्हाऊमाखू घालायची; शिवाय लसीकरण, आवश्यक औषधोपचार, पोषण आहार यांकडे जातीनं लक्ष द्यायची. आनंदवनातील काही कुष्ठमुक्त जोडप्यांनी गोकुळातली मुलं दत्तक घेतली. इंदूकडे आलेल्या पहिल्या मुलीला- ‘धरती’ला दत्तक घेतलं आनंदवनाचे लेखापाल मधुसूदन धारव आणि त्यांची पत्नी अंजनीने. तर सुधाकर आणि सुमन कडू यांनी ‘नीरज’ला आपलंसं केलं. पुढे पोलिसांच्या, इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून अनाथ मुलं गोकुळात दाखल होऊ  लागली. गोकुळात संगोपन होतं हे कळल्यानंतर आनंदवनाच्या दारात तान्ही मुलं सोडून जाण्याचं प्रमाणही वाढू लागलं. त्यामुळे गोकुळसाठी वेगळ्या इमारतीची गरज भासू लागली. यासाठी प्राथमिक अंदाजानुसार तीन लक्ष रुपये लागणार होते. या निधी उभारणीची जबाबदारी घेतली सानेगुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोहाडीकर यांनी. त्यांच्या पुढाकारातून मुंबईतल्या शाळकरी मुलांनी आपल्या खाऊतला एक-एक रुपया वाचवत तीन लक्ष एक रुपयांचा ‘गोकुळ सहयोग निधी’ उभा केला! मुलांनी मुलांसाठी अभिनव पद्धतीने उभारलेला हा निधी सानेगुरुजींच्या ८१ व्या जयंतीला सानेगुरुजी कथामालेतर्फे  मुंबईत राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शेकडो बालगोपाळांच्या उपस्थितीत आचार्य दादा धर्माधिकारींच्या हस्ते, पुलंच्या उपस्थितीत इंदूकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून ‘गोकुळ’ची डौलदार वास्तू प्रत्यक्षात आली.

स्नेहसावली..

कुष्ठरुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी सामाजिक, कौटुंबिक बहिष्कारामुळे त्यांचं पुन्हा समाजात परत जाण्याचं प्रमाण मात्र वाढत नव्हतं. आपलं आयुष्य आनंदवनाच्या उभारणीत घातलेले, शक्य होईल तोपर्यंत आयुष्यातला प्रत्येक क्षण कार्यरत असलेले कुष्ठमुक्त बांधव वृद्धापकाळाने थकत चालले होते. बाबा म्हणत, ‘‘ही माणसं म्हणजे आनंदवनाच्या ‘Land Army’ मधले ‘Old War Horsesl! They have lost the kBattlel, but won the kWarl against the disease. Now itls our responsibility to give them best possible comforts. जगाचा निरोप घेताना त्यांच्या मनात कटुता राहू नये.’’ या लढवय्यांसाठी १९८३ साली ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेच्या साहाय्याने आनंदवनात ‘स्नेहसावली’ वृद्धाश्रम उभा राहिला. अख्ख्या आशिया खंडातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प! ‘स्नेहसावली’चं डिझाइन नागपूरचे प्रथितयश आर्किटेक्ट दिवंगत आनंद गोडसे यांचं! ‘स्नेहसावली’ची वास्तू चार बैठय़ा कौलारू इमारतींमध्ये विभागली आहे. जुन्या काळी वाडय़ांमध्ये असे तसे छोटे अंगण प्रत्येक इमारतीच्या मध्यभागी आहे. त्यात तुळशी वृंदावन. ज्यांच्या आयुष्यातला रंगच हिरावला गेला अशा या बांधवांनी तुळशी वृंदावनांना रंग देत सजवून, बोटं झडलेल्या हातांनी सुंदर, कलापूर्ण रांगोळ्या घालून आपल्या आयुष्यात रंग भरले. तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ आणि खंजिरीच्या तालावर ‘सबके लिये खुला है, मंदिर ये हमारा’ अशी भजनं म्हणत हे दु:खी जीव एकमेकांना सावरत, सांभाळत आनंद निर्माण करतात.

इथल्या प्रत्येकाची कहाणी वेगळी. अर्थात- कहाणी वेगळी, तरी धागा मात्र समानच! असो.. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेली ही सारी मंडळी. यातल्या कुणाची वृद्धत्वाने दृष्टी अधू झालेली, कुणी हात वा पाय गमावलेलं, तर कुणी मधुमेहामुळे जखमा भरून येत नसल्याने गांजलेलं. पण तरी चेहरे मात्र समाधानी. आयुष्य आत्मसन्मानाने व्यतीत केल्याचं हे समाधान! या गात्र-थकल्या जिवांचे काळजीवाहकही इथलीच कुष्ठमुक्त तरुण मंडळी. औषधपाणी, ड्रेसिंग, रुग्णशय्येला खिळून असणाऱ्या वृद्धांना हाताने जेवू घालणं- अशी सगळी काळजी ते वाहतात. रोज भल्या पहाटे बाबा आणि इंदू न चुकता ‘स्नेहसावली’मध्ये जाऊन प्रत्येक रुग्णाची जिव्हाळ्याने विचारपूस करत. स्नेहसावलीत अशी चारशे-साडेचारशे माणसं आजही वास करतात. अस्तित्वच नाकारलेल्या या बांधवांची निधनानंतर ना कुणी ‘दखल’ घेतं, ना कुठला ‘दाखला’ असतो. बाबा म्हणत, ‘‘They die Unsung, Unmourned, Unwept’’ या योद्धय़ांचं आनंदवनात दफन केलं जातं आणि त्यावर फळाफुलांची झाडं लावली जातात. अशा हजारो अनाम कुष्ठरुग्ण बांधवांच्या वृक्षरूपी स्मरणशिला आपल्याला आनंदवनात दिसतील.

अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला..

सोनोग्राफीद्वारे लपूनछपून गर्भलिंग चाचण्या करून होणाऱ्या स्त्रीभ्रूण-हत्यांच्या सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे बाबा प्रचंड व्यथित होत. प्रत्येक कळीला फूल होऊन बहरण्याचा, आपलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. पण ज्या मूक कळ्यांना बहरापूर्वीच खुडून टाकण्यात आलं, अशा कळ्यांची स्मृती जागवण्यासाठी बाबांनी आनंदवनात ‘अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला’ निर्मिली आणि त्याभोवती गुलाबाची सुंदर बाग फुलवली. बाबा म्हणत, ‘‘मी गुलाबपुष्पाची निवड केली ती त्याच्या असामान्य सौंदर्यामुळे आणि सुगंधी दरवळामुळे. जेव्हा लोक या बागेला भेट देतील, तेव्हा त्यांना एका गोष्टीची जाणीव निश्चितच होईल, की जन्मापूर्वीच ज्या स्त्रीभ्रूणाची हत्या करण्यात आली, ती प्रत्येक मुलगी म्हणजे या जगातून नाहीसं झालेलं एकेक गुलाबाचं फूल होतं!’’

आनंदवनात आजही या अनाम मूक कळ्यांप्रमाणेच बालकांची, बालतरूंची आणि वृद्धांप्रमाणेच वृक्षांचीही जपणूक होते. अश्रूंच्या या घनदाट नात्याचं हे आनंदवनात जन्माला आलेलं ‘करुणोपनिषद’!

विकास आमटे

vikasamte@gmail.com

First Published on September 17, 2017 1:47 am

Web Title: vikas amte marathi articles save tree save life
Next Stories
1 मुक्काम : लोक-बिरादरी
2 इतिहास रचणारे उद्योग!
3 कुष्ठ-मैत्र!
Just Now!
X