डॉ. रोहिणी पटवर्धन  rohinipatwardhan@gmail.com

आपल्या मागची पिढी इतकी जगलीच नाही. त्यांच्याकडून मार्गदर्शनाची शिदोरी आपल्याला मिळाली नाही त्यामुळे आजचे ज्येष्ठ दिशा हरवल्यासारखे जगत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या किमान २० वर्षांचा विचार करून आजची जीवनशैली तपासून पाहिली पाहिजे. त्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. त्या सुधारणा केल्या पाहिजेतच आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. म्हणजेच आपण पुढच्या पिढीला समृद्ध वृद्धत्वाचा मार्ग दाखवू शकू.

‘संहिता साठोत्तरी’च्या आतापर्यंतच्या १९ लेखांमध्ये मी १९ विषय मांडले. त्यावर जवळजवळ ४०० प्रतिक्रिया आल्या.

ई-मेल द्वारेच प्रतिक्रिया द्यायच्या होत्या. ज्येष्ठांची तंत्रज्ञानाशी जवळीक असण्याचे प्रमाण लक्षात घेता खरं तर ते जेमतेम १ टक्के असेल, असे गृहीत धरले तर या प्रतिक्रिया या किमान ४० हजार लोकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हव्यात. पण या प्रतिक्रिया किंवा खरं तर याला प्रतिसादच म्हणायला हवं इतक्या विविध विचारांच्या विषयांच्या होत्या की त्यामधून वृद्धांसंदर्भात किती किती दृष्टिकोनांतून किती विचार, चर्चा होणे आवश्यक आहे याची प्रचीती आली. दिवाळीच्या दिवशी जवळजवळ येत्या वर्षभरात आलेल्या प्रतिसादाच्या मेल पाहता पाहता किती तास उलटले कळलंच नाही. मन एकदम भरून आणि भारून गेलं. विचारांची गर्दी उसळली. आपण कुठे पोहोचलो, कुठे पोहोचू शकलो नाही, किती लोकांच्या हृदयीचे आपण जाणून घेऊ शकलो, हे सगळे विचार मनात आले. विचारांना बळकटी मिळाली, नव्या फांद्या फुटल्या. एका अर्थी मनाच्या समुद्रात ‘मंथन’ झालं, असं म्हणायला हवं.

या दहा महिन्यांच्या काळामधल्या अंतप्र्रवासामुळे मनाला प्रचंड जबाबदारीची जाणीव झाली. मुळातच लिहिताना मनात विषयांची इतकी दाटी व्हायची की कुठला विषय लिहावा हे कळायचेच नाही. या प्रतिसादाच्या वाचनाने तर तळमळ अधिकच तीव्र झाली. इतक्या प्रचंड संख्येत असणारे ज्येष्ठ त्यांच्या प्रकृती, त्यांच्या वृती, त्यांची संस्कृती या साऱ्यापुढे पुरे पडण्याची धडपड करणारी एका कणाएवढी मी! क्षणभर स्तब्ध झाले. मग मोठ्ठा श्वास घेतला आणि आता या प्रवासातल्या ठळक ठळक मुक्कामांकडे बघायचा प्रयत्न सुरू केला.

लेखन सुरू करतानाच आणि खरं तर वृद्धकल्याण क्षेत्रात कामाला सुरुवात करताना मनात एक गोष्ट निश्चित केली आहे, ती म्हणजे लिहिताना लोकांना आवडेल की नाही याची चिंता करायची नाही. कारण आधीच ज्येष्ठांच्या संघटना आणि राजकारणी लोक यांनी त्यांना या भीतीपोटी सत्यापासून दूर ठेवले आहे. (मला लोकानुनय करण्याची आवश्यकता वाटत नाही कारण मला कोणतेच मत किंवा पद नको आहे.) ही भावना मनात ठेवून लिखाण केलं, पण वाचकांनी ही भावना जाणली. यावर कोणत्याही ज्येष्ठाने विसंवादी सूर लावला नाही. त्यामुळे मी विषय नीट मांडू शकले. प्रतिसाद ढोबळमानाने तीन प्रकारचे होते. एक म्हणजे विचार पटले किंवा आवडले. दुसरा प्रकार म्हणजे विचारांना पुष्टी देणारी माहिती मिळाली किंवा सूचना करणारे आणि काही वैयक्तिक समस्यांबाबत मार्गदर्शनाची अपेक्षा असणारे. आम्ही लिहिलेले प्रकाशित करा, नोकरी द्या असेही होते. त्याने जरा रुचिपालट झाला हे मात्र खरे. मला शक्य त्या सर्वाना मी उत्तरे पाठवली आहेत. पण सनवर्ल्ड वृद्धाश्रम, कॉलेजची प्रिन्सिपॉलशिप, व्याख्याने, परिषदा आणि लेखन या साऱ्याच्या रेटय़ामध्ये काहींना सविस्तर उत्तरे देता आली नाहीत. ती उणीव मी नक्की भरून काढीन. लिखाणातून नवे विषय, नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास मिळाला आहे. त्यातून मी पुढे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांची माहिती सतत मिळत राहावी, असे ज्या वाचकांना वाटत असेल त्यांनी ई-मेल करून त्यांचा फक्त मोबाइल क्रमांक द्यावा, म्हणजे त्यांना माहिती मिळत राहील. व्हॉट्सअ‍ॅप असल्यास खूपच उत्तम.

योगायोग म्हणावा की, मनापासून काम करणाऱ्याला देव सहाय्य करतो, या विश्वासामुळे म्हणावं पण गेल्या आठवडय़ात तीन वेगवेगळ्या संदर्भात घडलेल्या घटनांमुळे मला मी आग्रहाने प्रतिपादन करत असलेल्या ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाला, विचाराला बळकटी मिळाली.

त्याचे असे झाले की माझे गुरू प्रभाकर पाध्ये यांनी जगभरातील विद्वानांवर ‘साधना साप्ताहिका’मध्ये ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या छोटेखानी लेखाचे ‘असेही विद्वान’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशन समारंभात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावरील अभ्यासिका

वैजू नरवणे यांचे माहितीपूर्ण व्याख्यान झाले. त्यांनी ‘युरोपच्या दृष्टिकोनातून भारत’ हा विषय मांडला. युरोपीय देशांमधले प्रश्न त्यामध्ये चर्चिले गेले, अर्थातच वृद्धांची वाढती संख्या या विषयावर बोलणे पण ओघाने आलेच. त्या वेळी त्यांनी सांगितले की, ‘‘त्या देशांनाही वृद्धांचे प्रश्न फक्त सरकारच्या माध्यमातून सोडवणे कठीण होत चालले आहे. मग आपल्यासारख्या देशाची परिस्थिती तर किती गंभीर आहे, हे जळजळीत सत्य समोर आले. टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये वृद्धकल्याण या विषयाचे शिक्षण घेताना (ह्य़ुमन/सोशल) मानव, समाज भांडवल हा विषय अभ्यासाला होता. ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ या २८ ऑक्टोबरच्या लेखाला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे मी पुन्हा त्या विषयाचा अभ्यास सुरू केला होता.

त्या अभ्यासातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी ‘समाज’ (म्हणजे आपणच नाही का?) मोठे काम कसे करू शकतो हे तपशीलवार लक्षात येत होते. त्याच वेळी ‘सोशल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ हे हॉवर्ड डब्ल्यू बफेट् (Howard W. Buffett) आणि  William B. Eimicke  यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आले. दहा वर्षे विविध स्तरावरच्या देशांसंदर्भात घडणाऱ्या सकारात्मक आणि परिणामकारक अशा घटनांचा अभ्यास करून त्यावर आधारित माहिती देणारे हे पुस्तक आहे. वॉरन बफेट् या अमेरिकेतल्या प्रचंड मोठय़ा गुंतवणूकदाराचा नातू याचा एक लेखक आहे. कोणत्याही देशाला समस्या सोडवण्यासाठी समाजाचे भान ठेवून समाजाचेच सहकार्य मिळाल्याशिवाय प्रगतीच करता येत नाही, असे ढोबळमानाने या पुस्तकाचे सूत्र आहे. विकासापूर्वी आणि आर्थिक सुबत्तेपूर्वीच ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड आव्हानांना तोंड द्यावे लागणाऱ्या भारतासारख्या देशाच्या संदर्भात हे समाज सहकार्याचे तत्त्व एक मोठा आशेचा किरण आहे, नव्हे तोच एकमेव आशेचा किरण आहे, असंच म्हणावं लागेल.

एवढंच काय ज्येष्ठांसाठी द्यायला ज्या ज्या ज्येष्ठांकडे वेळ, शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य, ज्ञान, जागा, पसा जे जे काही आहे त्या त्या गोष्टींचा वापर ज्या ज्येष्ठांना यापैकी एक किंवा अनेक गोष्टींची निकड आहे अशा ज्येष्ठांना देण्याची किंवा त्यासाठी वापरण्याची अत्यंत मोठी गरज आहेच. ते जर करायला सुरुवात केली नाही तर आपल्या मुलाबाळांचे (जवळ असोत की नसोत) खूप अवघड होणार आहे. त्यांना जेव्हा गरज पडणार आहे तेव्हा तर माणसांची सेवेची आणखीनच कमतरता भासणार आहे. आपल्या मागची पिढी इतकी जगलीच नाही. त्यांच्याकडून मार्गदर्शनाची शिदोरी आपल्याला मिळाली नाही त्यामुळे आजचे ज्येष्ठ दिशा हरवल्यासारखे जगत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या किमान २० वर्षांचा विचार करून आजची जीवनशैली तपासून पाहिली पाहिजे. त्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. त्या सुधारणा केल्या पाहिजेतच आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. म्हणजेच आपण पुढच्या पिढीला समृद्ध वृद्धत्वाचा मार्ग दाखवू शकू. पुढच्या पिढीला जमीन, घरदार, दाग-दागिने, शेअर्स.. इत्यादी ठेवण्याच्या नादात पुढचे जीवन कसे जगावे, यासाठी आपण काही आदर्श ठेवू शकलो नाही, तर त्या पशा-अडक्याचे मूल्य काय? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

chaturang@expressindia.com