26 April 2018

News Flash

चातुर्वर्ण्य कधी अस्तित्वात असेल काय?

भारतीय संस्कृतीचे प्रधान लक्षण म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्था.

गुणनिष्ठ चातुर्वर्ण्याचे रूपांतर जातिव्यवस्थेत झाले. नंतर मनुस्मृतीने यास शास्त्राधार दिला,’ हे प्रतिपादन ऐतिहासिक दृष्टीने निर्विवाद मानता येत नाही. सर्व भारतीय फक्त या चार वर्ण-जातींत विभागले असणे कोणत्याही काळी शक्य नव्हते. सर्व लोकसमूहांना एका समाजाचे भाग मानण्यासाठी चातुर्वर्ण्याची कल्पना मांडण्यात आली असावी..

एकात्मतेसाठी, मग ती सामाजिक असो की सांस्कृतिक वा राष्ट्रीय असो; इतिहास हा एक महत्त्वाचा घटक असतो. सर्वाचा मिळून जसा एक इतिहास, तसाच समाजातील विविध घटकांचाही स्वतंत्र इतिहास असतो. त्यांच्या पूर्वजांनी ऐक्यभावनेने केलेले कार्य व घडविलेला देशाचा उज्ज्वल इतिहास जसा त्यांना अभिमानास्पद व प्रेरणादायी वाटत असतो, तसाच एका घटकाने दुसऱ्यावर केलेला अन्याय, अत्याचार त्यांना आठवत असतो. परस्परांनी ऐक्याने व बंधुभावाने राहावे हीच सर्वाची इच्छा असते, पण त्यासाठी कोणी कोणावर अन्याय करू नये ही अपेक्षा असते. जर अन्यायाला ऐतिहासिक वारसा असेल, तर तो इतिहास वर्तमानातील संघर्षांचा भाग होऊन बसतो. इतिहासाचा उपयोग दोन्हीही अर्थानी करता येतो. न्यायाची, समतेची, बंधुभावाची वागणूक मिळणार असेल, तर आपले पूर्वजही असेच वागत होते असा इतिहास सांगता येतो. तशी वागणूक मिळणार नसेल, तर संघर्षांचा इतिहास सांगून अन्यायग्रस्तांना संघर्षांसाठी उभे करता येते.

तसेच प्राचीन इतिहासामध्ये निर्णायक पुरावा नसणाऱ्या अनेक बाबी असतात. सारासारविचार व तर्काच्या आधारे अन्वयार्थ लावून इतिहासकार विविध मते मांडत असतात. अशा ठिकाणी समाजपरिवर्तनाला उपकारक ठरेल अशा प्रकारच्या अन्वयार्थाचा स्वीकार केला जाऊ शकतो व विविध समाजसुधारकांनी तो केलेला दिसेल. या दृष्टीने चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था या अत्यंत महत्त्वाच्या विषयांसंबंधात इतिहासाचा अन्वयार्थ कसा लावता येतो व लावला गेला आहे, हे पाहणे उद्बोधक ठरेल.

भारतीय संस्कृतीचे प्रधान लक्षण म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्था. त्यातूनच जातिव्यवस्था निर्माण झाली असे मानले जाते. एकात्मतेसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणून याचा उल्लेख केला जातो. पुरुषाच्या (ईश्वराच्या) मुख ते पाय अशा चार अवयवांपासून ब्राह्मण ते शूद्र हे वर्ण तयार झाले, असे ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात म्हटल्याचे सर्वश्रुत आहे. याचाच                नंतर वैदिक ग्रंथांनी व मनुस्मृतीने प्रचार केला. नंतर गीतेने या चातुर्वण्र्याला तात्त्विक अधिष्ठान दिले. चातुर्वण्र्य हे गुणकर्मानुसार निर्माण झाल्याचे सांगून हा सिद्धांत जनमानसात रुजविला. नवव्या शतकातील आद्य शंकराचार्यानी हे गुण गतजन्मीचे असल्याचे प्रतिपादन करून हा सिद्धांत अधिकच दृढ केला. ब्रिटिश राजवटीत धर्मचिकित्सेचे व सामाजिक  समतेचे वारे वाहू लागल्यानंतरही चातुर्वण्र्याचे समर्थन चालूच राहिले. १८७५ साली स्थापन झालेल्या आर्यसमाजाने जातिव्यवस्था नाकारली, तरी गुणनिष्ठ चातुर्वण्र्याचा पुरस्कार केला. स्वातंत्र्योत्तर काळातही चातुर्वर्ण्याला परमेश्वराचे चतुर्विध स्वरूप मानणारे नेते व संघटना निर्माण होत राहिल्या. २१व्या शतकातही जन्मजात चातुर्वण्र्याचा व मनुस्मृतीचा कडवा पुरस्कार करणारेही मॅगसेसे व पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त ठरू शकले. सामाजिक क्रांतीची अनेक आंदोलने व जात्युच्छेदक राज्यघटना होऊनही चातुर्वर्ण्याचा जनमानसात व शासनदरबारीही प्रभाव राहिला आहे.

पण आपण थोडा विचार करू की, भारतात चातुर्वर्ण्य कधी तरी एक सामाजिक वास्तव म्हणून अस्तित्वात असेल काय? म्हणजे असे की, त्या काळी भारतात जी एकूण लोकसंख्या असेल त्याची चार वर्णात विभागणी झाली आहे. त्या वर्णाबाहेर भारतात कोणी व्यक्ती वा व्यक्तिसमूह नाही. इतिहासाच्या पुराव्याच्या असो वा अनुमानाच्या आधारे असो ही गोष्ट असंभवनीय वाटते. पुरुषाच्या देहापासून हे वर्ण तयार होण्यापूर्वी भारतात लोक राहत होते की नाही? त्यांचा वर्ण कोणता होता? देशातील लोकांची निर्मिती व त्यांच्या वर्णाची निर्मिती एकाच क्षणी झाली की काय? वेद हे बाहेरून आलेल्या आर्याचे. ते येण्यापूर्वीच्या लोकांचा वर्ण कोणता होता? आर्य मूळचे येथीलच असे मानले तरी पुरुषसूक्ताच्या आधी त्यांचा वर्ण कोणता होता? हे सर्वमान्य झाले आहे की, ऋग्वेदातील हे पुरुषसूक्त मूळचे नसून नंतर केलेला प्रक्षेप आहे. या सूक्ताशिवाय ऋग्वेदात चार वर्णाचा कोठेही उल्लेख नाही. शूद्राचा उल्लेख नाही. ब्राह्मण व क्षत्रिय याशिवायच्या अन्य लोकांना ‘विश्’ (प्रजा) म्हटले आहे. त्याचा अर्थ वैश्य असा नाही. म्हणजे ऋग्वेद काळातच चातुर्वण्र्य नव्हते. इतिहास सांगतो की, आर्य अनेक शतके टोळ्या-टोळ्यांनी भारतात येत राहिले. ते येण्याआधी भारतात एक प्रगत संस्कृती नांदत होती. मोहेंजोदारो वा हरप्पा येथील सिंधू संस्कृती हे याचे उदाहरण आहे. या आर्यपूर्व लोकांचा वर्ण कोणता होता?

चातुर्वण्र्य हे गुणकर्मसिद्ध असे मानले, तर त्या गुणांची वा कर्माची विभागणी चारच वर्गात कशी करता येते? एकाच व्यक्तीत काही गुण ब्राह्मणाचे व काही अन्य वर्णाचे असू शकणार नाही काय? त्या गुणांना ब्राह्मण-शूद्र अशीच नावे का? त्या गुणांची परीक्षा त्या व्यक्तीच्या कोणत्या वर्षी करायची? त्या परीक्षेच्या आधी त्याचा वर्ण कोणता असणार? परीक्षेनंतर तेच गुण पुढे जन्मभर कायम राहतील याची खात्री काय? ती परीक्षा कोण घेणार? हे सारे प्रश्न गुणनिष्ठ चातुर्वण्र्याची अव्यवहार्यता दर्शविणारे आहेत.

तथापि, यासंबंधात काही मान्यवर अभ्यासक व समाजक्रांतिकारकांनी असे प्रतिपादन केले आहे की, आरंभीच्या काळात वर्ण-निश्चितीची विशिष्ट पद्धत होती. प्रत्येक व्यक्तीचा वर्ण निश्चित करण्यासाठी ‘मनू व सप्तर्षी’ नावाचे एक निवडमंडळ होते. ते मंडळ मुलाखती घेऊन गुणांनुसार व्यक्तींना ब्राह्मण ते शूद्र असे वर्ण प्रदान करीत असे. हा वर्ण फक्त चार वर्षांपुरता असे. त्यानंतर पुन्हा प्रत्येकाला वर्णनिश्चितीसाठी निवडमंडळाकडे जावे लागे. नव्या निवडीत वर्ण बदलून ब्राह्मणाचा शूद्र किंवा शूद्राचा ब्राह्मण बनू शके. या वर्ण-बदलाला मन्वंतर असे म्हटले जाई. काही काळानंतर या पद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आली व गुरुकुल पद्धत सुरू  झाली. त्यात विद्यार्थी लहानपणीच विद्याभ्यासासाठी गुरुकुलात जाई. त्याचे अंगभूत गुण व आवड-निवड लक्षात घेऊन गुणविकास करण्याच्या दृष्टीने त्याला आचार्य शिक्षण देई. बारा वर्षांच्या शिक्षणानंतर त्याला गुणवत्तेनुसार वर्ण प्रदान करण्याचा विधिसमारंभ होई. त्याला उपनयनविधी म्हटले जाई. हा दिलेला वर्ण मात्र जन्मभराकरिता असे. मात्र तो वंशपरंपरागत नसे. त्याच्या वंशजांना याच पद्धतीने गुरुकुलात जावे लागे. त्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा शूद्र वा शूद्राचा ब्राह्मण असे होऊ लागले. ही पद्धत काही काळ चालली, पण ब्राह्मणांना ती नकोशी झाली. त्यांनी आपला मुलगा गुरुकुलात जाण्यापूर्वीच घरीच त्याचे उपनयन करून आपलाच वर्ण त्याला देणे सुरू केले. पूर्वी जो वर्णप्रदान विधी गुरुकुलात होई, तो आता घरीच होऊ लागला. अशा प्रकारे वर्ण गुणांवर न राहता जन्मजात झाला. गुणनिष्ठ चातुर्वण्र्याचे रूपांतर जातिव्यवस्थेत झाले. नंतर मनुस्मृतीने यास शास्त्राधार दिला.

हे प्रतिपादन ऐतिहासिक दृष्टीने निर्विवाद मानता येत नाही. सुधारणेच्या अनुकूल भूमिकेतून इतिहासाचा लावलेला हा अन्वयार्थ आहे असे मानले पाहिजे. पूर्वी चातुर्वर्ण्य गुणनिष्ठ होते, आताचे जन्मजात चातुर्वण्र्य व जातिभेद सोडून द्या, असे सांगण्यासाठी असा अन्वयार्थ लावला जातो. पूर्वी वर्ण म्हणजे वर्ग होते, जात नव्हते हे याच भूमिकेतून मांडले             जाते.

हा अन्वयार्थ खरा मानला, तरी भारतातील सर्व लोक गुणनिष्ठ चार वर्णात विभागले होते, हे दिसतच नाही. गुरुकुलात किती जण जाणार? आचार्य कोणाकोणाचे वर्ण ठरविणार? अर्थात समाजातील काही निवडक लोकांपुरतीच ही निवडपद्धत असणार. गुण पाहून चातुर्वर्ण्य ठरविणे शक्य नसल्यामुळेच गतजन्मीच्या गुणकर्मावर ते अवलंबून असतात असा सिद्धांत नंतर मांडला गेला.

गुणकर्मनिष्ठ बाजूला ठेवले, तरी जन्मजात चातुर्वर्ण्यही कधी काळी अस्तित्वात असणे असंभव आहे. जन्मजात चातुर्वण्र्य म्हणजे वर्णाच्या नावाच्या चार जाती. कधी काळी सर्व भारतीय चार जन्मजातींत विभागले असणे शक्य आहे काय? वेदकाळापासून आर्यात चातुर्वण्र्याबाहेरच्या जातींचे उल्लेख आढळतात. व्यवसायही केवळ जन्मजात आढळत नाहीत. वेदकाळातही ब्राह्मण अनेक व्यवसाय करताना दिसतात. आर्याच्या पूर्वी भारतात द्रविड, असुर, निषाद, नाग, दास इत्यादी शेकडो लोकसमूह राहत होते. ते जन्मनिष्ठ चातुर्वण्र्यात येतच नव्हते. तेव्हा सर्व भारतीय फक्त या चार वर्ण-जातींत विभागले असणे कोणत्याही काळी शक्य नव्हते. जे आर्यापुरतेही शक्य नव्हते, ते सर्वाकरिता असणे शक्यच नव्हते.

तेव्हा चातुर्वर्ण्य, मग ते गुणकर्माने असो की जन्माने असो, कधी काळी सामाजिक वास्तव म्हणून असण्याची शक्यताच नाही. ती व्यवस्था नसून एक कल्पना आहे. समाजाचे वर्णन वा वर्गीकरण करण्याची एक पद्धत आहे. वास्तवात शेकडो लोकसमूह आहेत, टोळ्या आहेत, गण आहेत. त्यांना नावे आहेत. ते अनार्यातच नव्हेत तर आर्यातही आहेत. अशा सर्व लोकसमूहांना एका समाजाचे भाग मानण्यासाठी चातुर्वण्र्याची कल्पना मांडण्यात आली आहे. या सर्वाना एका सामाजिक चौकटीत बसविण्यासाठीचा तो बौद्धिक उद्योग आहे, वैचारिक संकल्पना आहे. तो धर्मग्रंथात आहे, विचारात आहे, प्रचारात आहे, मानसिकतेत आहे – पण वास्तवात पूर्वीही नव्हती, आताही नाही. असे असेल तर मग जातिव्यवस्था कोठून आली?

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

First Published on June 8, 2016 4:33 am

Web Title: article on caste discrimination
 1. N
  Nice
  Jun 10, 2016 at 8:05 am
  एकदम फालतू आणि चुकीचा लेख...
  Reply
  1. P
   prasad
   Jun 9, 2016 at 3:11 am
   लेखक इतिहास चे अभ्यासक असून त्यांना ठावूक नाही कि आर्य द्रविड हि खोटी गोष्ट इतिहासात पेरली होती ...इंग्रजांनी केलेली घाण ...किती दिवस धरून बसणार ...सोडा आता चुकीचा अभ्यास ...इंग्रजीतून शिकेलेला अभ्यास अस्साच आडतो साहेब
   Reply
   1. R
    RJ
    Jun 8, 2016 at 9:30 pm
    इतिहासाचा उपयोग व वापर ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आज आधुनिक लोकशाहीत वर्णव्यवस्था सुरूच असेल तर आपण लोकशाहीस पात्र नाही. आपली मानसिकता द्रोणाचार्यांची असेल एकलव्याकडून गुरुदक्षिणेच्या नावाखाली अंगठे कापून सर्वोत्तमास पुसून टाकण्याची, तर मग सर्वच कठीण आहे.
    Reply
    1. S
     sachin
     Jun 10, 2016 at 4:56 pm
     डाळ घोटाळा कोणत्या वर्णात होता ज्यामुळे दाबला गेला .
     Reply
     1. S
      sachin
      Jun 8, 2016 at 5:35 pm
      divide and rule .
      Reply
      1. Y
       yousef
       Jun 10, 2016 at 4:29 am
       Jat system is nurtured, sustained and consolidated by AmbedkarManu and MandalManu dastur's reservation by birth. Now Indian Popes called caste recognition committee issues caste certificate using by birth criteria. Real Pope used to issue heaven ascendancy certificate. You have already stated above that such a system existed in the past.
       Reply
       1. Load More Comments