राम खांडेकर

यशवंतराव कर्तृत्ववान असूनही  राज्यपातळीवरील नेते म्हणूनच त्यांना मानले जात होते. अखिल भारतीय राजकारणात त्यांना कधी संधी मिळाली नाही. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत होत्या. १९६१ साली भावनगर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात मात्र त्यांच्या लोकप्रियतेची व कर्तृत्वाची पावती त्यांना मिळाली. वर्किंग कमिटीचे सभासद म्हणून ते भरघोस मतांनी निवडून आले. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नि:स्वार्थी नेत्याकडूनही त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली होती.

महाराष्ट्र राज्याचा पहिला वर्धापनदिन नुकताच साजरा झाला होता. केवळ एका वर्षांतच राज्याच्या सर्वागीण प्रगतीला जबरदस्त वेग आला होता. त्याबरोबरीनेच वैचारिक क्रांतीही घडत होती. ‘नव्या जीवनाचा नाद मला ऐकू येत आहे,’ असा काव्यमय आशावाद कवी कुसुमाग्रजांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी व्यक्त केला होता. ग्रामीण भागात नव्या जीवनाचे प्रतिनाद ऐकू येऊ लागले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्य आणि जनता समृद्धीसाठी एकजीव झाल्याचे दर्शन घडविणारे महाराष्ट्र हे बहुधा पहिले राज्य असावे. सर्वाना बरोबर घेऊन चालले तर प्रगतीची वाटचाल सुखकर, अडचणीरहित होते हे यशवंतरावांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले होते. आजच्या परिस्थितीतही हे तत्त्व मार्गदर्शक ठरू शकते.

अशा वेळी दुधात मिठाचा खडा पडावा अशी एक बातमी यशवंतराव मंत्रालयात कामात व्यग्र असताना आली. बातमी होती पानशेत आणि नंतर खडकवासला धरण फुटून पुण्यात पुराने कहर मांडल्याची. अधिवेशनासाठी सायंकाळी रेल्वेने नागपूरला जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून यशवंतरावांनी काही अधिकाऱ्यांसमवेत विमानाने पुणे गाठले. पुण्यात पोहोचल्यावर विमानातून पूरग्रस्त भागाची पाहणी करताना हृदयाला पीळ पाडणारे दृश्य पाहून यशवंतरावांसारखा धीरोदात्त माणूससुद्धा काही क्षण नि:स्तब्ध झाला. खचला. पानशेत धरण  तज्ज्ञांचा सल्ला न मानता, तसेच स्थानिक हवामान आणि पावसाच्या प्रमाणाचा विचार न करता बांधले गेले होते. बांधकामात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. मातीचे हे धरण पुराचा प्रचंड दाब सहन करू शकेल का, याचा साधकबाधक विचारही केला गेला नव्हता. त्यामुळे ९ जुलै १९६१ रोजी सुरू झालेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पाण्याचा दाब सहन न होऊन हे धरण उद्ध्वस्त झाले होते. त्यापाठोपाठ खडकवासला धरणही फुटले.

दुसऱ्या दिवशी रस्त्यावरील पुराचे पाणी ओसरल्यावर यशवंतरावांनी प्रत्येक बाबीची अगदी खोलात जाऊन शहानिशा केली. त्यांच्या लक्षात आले की समोर उभे ठाकलेले संकट एकटय़ा राज्य शासनाला पेलणे अवघड आहे. मदत आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान खचितच सोपे नाही. यशवंतरावांनी पूरग्रस्तांची तातडीने निवारा आणि खाण्यापिण्याची सोय खर्चाची पर्वा न करता करण्यासंबंधी आदेश देऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक समिती स्थापन केली. तीद्वारे निधी गोळा करून, तसेच पंतप्रधान फंडातून साहाय्य घेऊन मदत व पुनर्वसनाच्या कामास त्यांनी तातडीने सुरुवात केली. लगेचच नागपूरला विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार असल्याने आणि त्यात पानशेतसंदर्भात विरोधकांकडून होणारा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन त्यांनी त्यादृष्टीनेही तयारी केली.

..आणि घडलेही तसेच.

या धरणफुटी प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे, या विरोधकांच्या मागणीने जोर पकडला. म्हणून न्या. बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी ११ ऑगस्ट १९६१ पासून इतर कमिशन्ससारखा साक्षी-पुराव्यांत वेळ न घालवता दोषी व्यक्तींना शोधून त्यांना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू केले. विरोधी पक्षांना कमिशनची कार्यपद्धती मान्य नव्हती म्हणून त्यांनी एकत्र येऊन नवीन कमिशन नेमण्याचा आग्रह धरला. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की कमिशनचे अध्यक्ष साधारणत: मंत्र्यांना भेटत नाहीत, तसेच कामाच्या पद्धतीबाबत बंधन वा मर्यादा घालू शकत नाहीत. न्या. बावडेकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच त्यांना प्रमुख इंजिनीअर्सनी अपघाताबद्दल जी माहिती दिली त्यात सरकारच्या अधिकाऱ्यांनी फेरबदल केल्याचा संशय येऊन त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.

पुण्यातील मदत व पुनर्वसनाचे काम तसेच नागपुरातील विधीमंडळ अधिवेशनामुळे न्यायमूर्तीचे आपल्या राजीनाम्याबाबतचे विचार ऐकण्यासाठी वेळ काढणे यशवंतरावांना शक्य नव्हते. हे काम थोडय़ा वेळाचे नव्हते, तर त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे न्या. बावडेकर यांच्या राजीनाम्याबाबत मुख्य सचिवांना भेटून आपले म्हणणे मांडण्यास त्यांना सांगण्यात आले. अनेकदा झालेल्या या भेटींत बावडेकर फटकळपणे वागत होते. शेवटी तर त्यांनी मुख्य सचिवांवर मुख्य कागदपत्रे बदलण्याचा आरोपही केला. विषयांतर करून यासंदर्भात माझे मत सांगतो. मुख्य सचिव मोने हे विदर्भातील. शांत स्वभावाचे. त्यांनी कधीही आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांच्या नोटिंगमध्ये ढवळाढवळ केली नाही, तर या कागदपत्रांमध्ये ते काय करणार? त्यांच्याकडे जाणाऱ्या बहुतेक फाइल्सवर नुसती त्यांची सही असे. नोटिंग फार कमी असे. म्हणून मंत्रालयात त्यांना ‘नथिंग टू मेन्शन’ या नावाने संबोधत. कारण त्यांचे इनिशियल होते- एन. टी. एम. (एन. टी. मोने)! या आरोपानंतर त्या भेटीत काय झाले हे कळणे अवघड होते; पण काही दिवसांनी न्या. बावडेकर यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. विरोधी पक्षांच्या  टीकेमुळे न्या. बावडेकर यांच्यासारखी व्यक्ती आत्महत्या करण्याची शक्यता कमीच होती. त्यांच्या या आत्महत्येमागचे कारण पुढे कधीच कळले नाही.

विरोधी पक्षांना १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा विषय संपल्यामुळे नवीन विषय शोधत असताना हा विषय आयताच मिळाला. या विषयाच्या अनुषंगाने मांडल्या गेलेल्या ठरावाला उत्तर देताना यशवंतरावांनी सर्व गोष्टींचा सविस्तर उल्लेख करून आपण त्यांना कधीही भेटलो नसल्याचे सभागृहाला पटवून दिले. सर्वाचे पूर्ण समाधान झाले होते. पण तरीही विरोधी पक्षाने मूळ विषयास कलाटणी देऊन चव्हाण सरकारने न्या. बावडेकर यांचा राजकीय खून केल्याचा गंभीर आरोप जाहीर सभांतून करण्यास सुरुवात केली आणि १९६२ च्या निवडणुकीसाठी या मुद्दय़ाचा प्रचारासाठी उपयोग करण्याचे त्यांनी ठरवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विरोधी पक्षांना बहुतेक प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मतदारांवर प्रभाव टाकणारे असे विषय मिळत आले आहेत. आजकाल गाजणारा कांद्याच्या भाववाढीचा क्षुल्लक विषयसुद्धा यातलाच. तेव्हा एका वर्तमानपत्राच्या अग्रलेखात लिहिले होते :

‘एक लाख प्रजेच्या जीवन-मरणाबद्दल उलटय़ा काळजाची बेपर्वाई दाखवणाऱ्या या काँग्रेसवाल्या राज्यकर्त्यांची धुंदी उतरवण्यासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे उभ्या महाराष्ट्रातील जनतेने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसवाल्यांना सणसणीत आपटी दिली पाहिजे.’

राजकारणाच्या दृष्टीने या मुद्दय़ावर आक्षेप घेण्याजोगे काही नाही. पण इथे त्याबद्दल सविस्तर लिहिण्याचा उद्देश हा, की काहींनी याचा सरळ संबंध यशवंतरावांशी जोडण्याचे धाडस दाखवले. ज्या व्यक्तीने अहोरात्र कष्ट करून महाराष्ट्र घडवला, तिला यामुळे किती यातना झाल्या असतील याचा साधा विचारही त्यांनी करू नये याचा खेद वाटतो. शिवाय ही चौकशी यशवंतराव किंवा राज्य सरकारविरुद्ध नसून धरणाचे काम करणाऱ्या अभियंत्यांच्या विरोधात होती.

यावेळच्या विधानसभा अधिवेशनात कोणालाच रस नव्हता. अधिवेशन संपवून यशवंतराव मुंबईत आल्यानंतर १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसोबत त्यांचा विचारविनिमय सुरू झाला. सत्तेवर येण्याची शक्यता असलेल्या पक्षात पक्षांतर करून येणाऱ्यांची यादरम्यान रांग लागते. आजपर्यंत हेच घडत आलेले आहे. यशवंतराव अशा प्रवृत्तीच्या विरोधात होते. त्यांनी एका जाहीर सभेत पक्षांतर करून येणाऱ्या अशा इच्छुकांना आपली जागा दाखवली. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. निश्चित ध्येयधोरणांच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. तेव्हा भलता आविर्भाव व्यक्त करून काँग्रेसप्रवेश करण्याऐवजी राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी पूर्ण विचार करून नंतरच मोकळ्या मनाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा.’’

यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये तरुणांची फौज तयार केली होती. यशवंतराव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निरनिराळ्या जिल्ह्य़ांतील नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आगळा उत्साह निर्माण झाला होता. यशवंतरावांनी लोकांच्या सहज लक्षात येणार नाही अशी आणखी एक गोष्ट करण्याचे धाडस केले. ते म्हणजे काँग्रेस पक्षावरील आणि प्रदेश काँग्रेसवरील विशिष्ट लोकांची मक्तेदारी त्यांनी पूर्णपणे संपविली. अर्थात याला पूर्वीपासूनच त्यांनी प्रारंभ केला होता. यशवंतरावांच्या नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या धोरणाला आणि विरोधी पक्षाच्या बिनबुडाच्या प्रचाराला फारसे महत्त्व न देता जनतेने काँग्रेसच्या पदरात भरघोस यश टाकले. या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो, की राजकारणातील किती लोक शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हा जरी वादाचा व चर्चेचा विषय असला तरीही महाराष्ट्रातील जनतेने मात्र शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. सत्तेवर नसतानाही त्यांचा पत्रव्यवहार फारसा कमी झाला नव्हता. मी आठवडय़ातून दोनदा तरी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याकडे डिक्टेशनसाठी जात असे. यशवंतराव महाराष्ट्रात आले की ते जनतेच्या गराडय़ात असत. या दिवसांत अनेक मित्रांच्या, साहित्यिकांच्या घरी राहून त्यांनी दोन-चार दिवस त्यांचा पाहुणचारही घेतलेला आहे.

या निवडणुकीत विधानसभेच्या २६५ जागांपैकी २१४ जागा मिळवून काँग्रेसने प्रचंड विजय संपादन केला. एवढेच नव्हे तर ज्या पानशेत धरणफुटीचे भांडवल विरोधी पक्षाने केले होते, त्या पुणे शहरातून लोकसभेच्या

व विधानसभेच्या सर्व जागा जिंकून यशवंतरावांना काँग्रेस पक्षाने त्यांनी केलेल्या कष्टांची, कार्याची जणू पावतीच दिली होती. नव्या सवंगडय़ांना घेऊन यशवंतरावांनी पुन्हा नेटाने कारभार सुरू केला.

परंतु यादरम्यानच महाराष्ट्राने सत्तेचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषदांना सत्तेत महत्त्वाचे स्थान व अधिकार देणे योग्य ठरेल काय, याबद्दलची चर्चा देशभरात सुरू झाली. केंद्र सरकारचे या खात्याचे मंत्रीसुद्धा याला अनुकूल नव्हते. त्यांनी यशवंतरावांशी या विषयावर चर्चा केली. मंत्रिमंडळातील काही सदस्यही याकरता सहमत नसल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकांतून दिसून आले होते. मात्र, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाबाबत यशवंतरावांची काहीएक ठाम मते होती. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक करीत असत. त्यामुळे केंद्राच्या दबावाला ते बळी पडले नाहीत. एवढेच नाही तर आपल्या सहकाऱ्यांनाही त्यांनी स्पष्टपणे समज दिली, की ‘लोकशाहीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे मान्य करण्याची ज्यांची तयारी नसेल त्यांना आपला मार्ग मोकळा आहे. मंत्रिमंडळातून ते खुशाल जाऊ शकतात.’

यशवंतराव कर्तृत्ववान असूनही  राज्यपातळीवरील नेते म्हणूनच त्यांना मानले जात होते. अखिल भारतीय राजकारणात त्यांना कधी संधी मिळाली नाही. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत होत्या. १९६१ साली भावनगर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात मात्र त्यांच्या लोकप्रियतेची व कर्तृत्वाची पावती त्यांना मिळाली. वर्किंग कमिटीचे सभासद म्हणून ते भरघोस मतांनी निवडून आले. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नि:स्वार्थी नेत्याकडूनही त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली होती. १९६२ मध्ये निवडून आल्यानंतर स्थिर सरकारचा पूर्ण फायदा उठवत यशवंतरावांनी विकासाचे कार्यक्रम धडाक्याने सुरू केले होते. पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य हे एक पुरोगामी आणि समृद्ध राज्य बनवण्याचे चित्र त्यांनी मनोमनी रंगवले होते.

पण दैव जाणिले कुणी..?

नोव्हेंबर १९६२ मध्ये ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणवणाऱ्यांनी भारतावर आक्रमण केले. भारतीय शासनकर्ते पंचशील तत्त्वे आणि शांतीप्रियतेचे पुरस्कर्ते असल्यामुळे असं काही घडेल याची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. त्यापायी संरक्षण व्यवस्थेकडे थोडेफार दुर्लक्षही झाले होते, हे मान्यच करावे लागेल. भारतीय सैन्याने हाती असलेल्या शस्त्रांनिशी जिवाची पर्वा न करता चिनी आक्रमणाला तोंड देण्यास सुरुवात केली. या वर्षी दिवाळी साजरी करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण दररोजच कोणत्या ना कोणत्या घरातील कुलदीपक युद्धात शहीद झाल्याची वार्ता येऊ लागल्याने घरात जळत असे ती फक्त पिठावरची पणती! पणतीच्या त्या ज्योतीच्या स्मरणाने डोळ्यासमोर आजही उभे राहते- वीरमरण आलेल्या कुटुंबांतील शोकाकुल वातावरण आणि युद्धभूमीवरील करुण दृश्ये! ते दिवस आठवताना याक्षणीही विचार आणि लेखणी स्तब्ध झालीय..

ram.k.khandekar@gmail.com