मंगळावर जीवसृष्टीस आवश्यक असलेला मिथेन वायू सापडू शकला नाही, त्यामुळे तेथे परग्रहवासी किंवा सूक्ष्मजीव अशा कुठल्याही स्वरूपातील जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेला मोठा धक्का बसला आहे. नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीने केलेल्या संशोधनानुसार लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर मिथेन वायू सापडलेला नाही. या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. मंगळावर मिथेन आहे किंवा नाही हे आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे कोडे होते. मिथेन वायू हा जीवसृष्टीच्या निर्मितीस आवश्यक असतो त्यामुळे त्याबाबत उत्सुकता होती. अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी यापूर्वी मंगळावर मिथेनची शक्यता असल्याचे सांगितले होते, त्यामुळे आताच्या संशोधनातील निष्कर्षांनी वैज्ञानिकांचे स्वप्न भंगले आहे. मंगळावर मिथेन शोधण्यासाठी रोव्हरवरील यंत्रसामग्रीने अनेक प्रयोग केले. मंगळ मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक मायकेल मेयर यांनी सांगितले की, मंगळावर जीवसृष्टी शोधण्याच्या मोहिमेला त्यामुळे वेगळी दिशा मिळेल. मंगळावर मिथेनची निर्मिती करणारे सूक्ष्म जीव असावेत असे मानले जात होते, पण आताचे संशोधन हे एकाच सूक्ष्मजीवाच्या चयापचयाशी संबंधित मानले जाते. अनेक सूक्ष्मजीव मिथेनची निर्मिती करीतही नाहीत असे मेयर यांचे मत आहेत. क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळाच्या वातावरणात सहा महिने मिथेनसाठी संशोधन केले, त्यात मिथेन सापडलेला नाही. ‘टय़ुनेबल लेसर स्पेक्ट्रोमीटर’ या उपकरणाने मिथेनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात मिथेन सापडला नाही, याचा अर्थ तेथे त्याचे प्रमाण १ पीपीबी पेक्षा जास्त नाही; म्हणजे अपेक्षित प्रमाणाच्या एक षष्ठांशही नाही. यापूर्वी मंगळावर ४५ पीपीबी इतका मिथेन असल्याचे सांगितले जात होते, पण प्रत्यक्षात तसे नाही.
मिथेनचे प्रमाण नगण्य-अत्रेय
क्युरिऑसिटीने दिलेल्या माहितीनुसार मिथेनचे प्रमाण अगोदरच्या निरीक्षणांशी जुळणारे नाही. त्याचबरोबर मिथेन मंगळाच्या वातावरणातून अचानक नष्ट व्हावा असेही काही नाही, असे मत मिशिगन विद्यापीठाचे सुशील अत्रेय यांनी म्हटले आहे. आमच्या मापनानुसार तेथील वातावरणात फारसा मिथेन नाही. उल्कापात, जैविक घटना, भूगर्भशास्त्र, अतिनील किरणांचा परिणाम यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात मिथेन भरला जाणे शक्य नाही. क्युरिऑसिटीच्या निरीक्षणाबाहेर असलेल्या मार्गाने तेथे वर्षांला १० ते २० टन यापेक्षा जास्त मिथेन असू शकत नाही. हे प्रमाण पृथ्वीवरील वातावरणात असलेल्या मिथेनच्या प्रमाणापेक्षा ५ कोटी पटींनी कमी आहे, असे अत्रेय यांनी म्हटले आहे.