गेल्या दोन अंकात येत्या नोव्हेंबर महिन्यात नुसत्या डोळय़ांनी दिसण्याची शक्यता असलेल्या धूमकेतू आयसनच्या अनुषंगाने धूमकेतूंबद्दल चर्चा केली. या धूमकेतूचा शोध २१ सप्टेंबर २०१२ रोजी आरटीयम नोव्हिजिनोक आणि विटाली नेव्हिस्की दोन रशियन खगोलनिरीक्षकांनी किसलोव्हॉस्क येथील International Scientific Optical Network या वेधशाळेच्या ४० सेंटिमीटर व्यासाची दुर्बीण वापरून लावला होता. या वेधशाळेच्या नावावरून या धूमकेतूला ISON हे नाव देण्यात आले. या धूमकेतूचा जेव्हा शोध लागला तेव्हा असेच वाटले होते की हा या शतकातला धूमकेतू म्हणून नावाजला जाईल. पण नंतर घेण्यात आलेल्या निरीक्षणातून हा धूमकेतू जेमतेम नुसत्या डोळय़ांना दिसेल असे लक्षात आले.
धूमकेतूचा फुसका बार होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. लूबोस कोहूटेक या झेक हौशी आकाशनिरीक्षकांनी १९७३ साली एका नवीन धूमकेतूचा शोध लावला होता. अर्थात त्याला कोहूटेक हेच नाव देण्यात आले होते. या धूमकेतूची कक्षा मांडताना हा धूमकेतू ऊर्ट ढगातून आलेला होता हे लक्षात आले. म्हणजे हा धूमकेतू पहिल्यांदाच सूर्याजवळ येणार होता. म्हणजेच याच्यातील सर्व पदार्थ अजून तसेच होते. आणि हा खूप प्रखर होईल असेही भाकीत करण्यात आले. याला शतकाचा धूमकेतू असेही म्हणण्यात आले. प्रत्येकाला हा धूमकेतू बघण्याची फार उत्सुकता होती. पण
प्रत्यक्षात हा जेमतेम नुसत्या डोळय़ांना दिसला होता. (तेव्हा मी शाळेत होतो आणि हा धूमकेतू कोहूटेक बघू शकलो नाही याची खंत वाटल्याचे अजूनही आठवते.) त्यानंतर आज सुमारे ४० वर्षांनंतर परत तोच इतिहास घडत आहे. खरेतर धूमकेतू कोहूटेकनंतर खगोलशास्त्रज्ञ पण खूप सावध झाले. त्यांनी धूमकेतू किती प्रखर दिसेल याचे भाकीत करणे पण बंद केले  आयसनची पण कथा कोहूटेकसारखीच आहे.  हा धूमकेतू पण ऊर्ट ढगातून आलेला आहे. फक्त या गेल्या ४० वर्षांत विज्ञानाची अभूतपूर्व प्रगती झाली आहे. निरीक्षणे घेण्यात आणि निरीक्षणांवरून धूमकेतूच्या अभ्यासात तेव्हा आता धूमकेतूचे अभ्यासक आयसनवरून निराश न होता तो धूमकेतूच्या या अशा वागण्यामागचे कारण शोधण्याच्या तयारीत आहेत.
खरेतर ऊर्ट ढगातून येणारे धूमकेतू काही खगोलशास्त्रज्ञांना नवीन नाहीत. तसेच सूर्याच्या इतक्या जवळून जाणारे धूमकेतूही नवीन नाहीत. पण असे दोन्ही गुणधर्म असलेला धूमकेतू ज्याचा शोध पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या सहापट अंतरावर लागणे असे मात्र क्वचितच घडते  आणि म्हणून आता शास्त्रज्ञ या धूमकेतूकडे एका चालून आलेल्या संधीसारखे बघू लागले आहेत. या धूमकेतूच्या निरीक्षणासाठी अनेक वेगवेगळी शोधसाधने वापरण्यात येतील.
धूमकेतू आयसनने १ ऑक्टोबर २०१३ रोजी मंगळाची कक्षा पार केली. सध्या मंगळावर असलेल्या मार्स रोव्हर क्युरिओसिटीला हा जरी दिसला नसला तरी मार्स रिकनसान्स ऑरबायटरला याचे चित्र घेण्यात यश आले होते. १ नोव्हेंबर रोजी आयसन पृथ्वीची कक्षा पण पार करेल. त्या वेळी पृथ्वीपासून याचे अंतर १८० मिलियन किलोमीटर असेल. तेव्हा हा सुमारे ६ इंच व्यासाच्या िभग किंवा आरसा असलेल्या दुर्बणिीतून दिसू लागेल. हा पूर्व क्षितिजावर सूर्योदयाच्या सुमारे ४० मिनिटे आधी बराच वर दिसेल. अर्थात, जसजसा हा धूमकेतू सूर्याजवळ जाऊ लागेल तसेच सूर्योदयापूर्वी क्षितिजावर याची वेळही कमी होत जाईल. ११ नोव्हेंबरला हा शुक्राची कक्षा पार करेल. हा आपल्यापासून जरी दूर जात असला तरी तो सूर्याच्या जवळ पण जात आहे. त्यामुळे तो प्रखरही होत जाईल. तेव्हा आता मात्र हा बायनोक्युलर्समधून दिसण्याची शक्यता आहे आणि साधारण १५ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान हा नुसता डोळय़ांनाही दिसू लागेल. २३ नोव्हेंबर रोजी हा बुधाची कक्षाही पार करेल. या सुमारास धूमकेतू आयसन सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आधी पूर्व क्षितिजावर उगवेल.  २४ नोव्हेंबर रोजी बुधाच्या बरोबर खाली शनि दिसेल आणि त्यांच्या डावीकडे म्हणजे दक्षिणेला हा धूमकेतू असेल. पण त्यासाठी क्षितिजाजवळचे आकाश मात्र निरभ्र असण्याची गरज आहे, कारण हे तिघे ही बऱ्यापकी क्षितिजाजवळ असतील. त्यानंतर मात्र त्याच्या दिसण्याची शक्यता आणखी कमी होत जाईल. धूमकेतू आयसन २८ नोव्हेंबर रोजी  हा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळच्या िबदूवरून म्हणजे उपसूर्य िबदूवरून प्रवास करेल. त्या वेळी सूर्याच्या पृष्ठभागापासून याचे अंतर फक्त १,१६५,०० किलोमीटर असेल. हा कालावधी धूमकेतू आयसनसाठी महत्त्वाचा ठरेल. जर याने उपसूर्य िबदू सुखरूप पार केला म्हणजे सूर्याच्या ऊर्जेमुळे याचे तुकडे झाले नाहीत तर हा मग हा परत आपल्याला पूर्व क्षितिजावर दिसू लागेल.  
आता हा बराच उत्तरेस सरकला असेल. तसेच याची प्रखरता पण कमी होती जाईल. १६ डिसेंबर रोजी हा स्वातीच्या सुमारे ७ अंश खाली असेल. पौर्णिमा १७ तारखेला आहे तेव्हा १५ आणि १६ डिसेंबर रोजी ‘स्वाती’च्या मदतीने याला शोधण सोपे असेल.  ८ ते ९ जानेवारी २०१४ हा ध्रुव ताऱ्याच्या खालून प्रवास करेल, पण आता हा नुसत्या डोळय़ांना दिसणार नाही.  
१४-१५ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी या धूमकेतूच्या कक्षेच्या खूप जवळून जाईल. असा एक अंदाज आहे की त्या वेळी आपल्याला उल्का वर्षांवही दिसू शकेल. पण याची शक्यता काही अभ्यासकांनी फेटाळून लावली आहे. त्याच्या मताप्रमाणे हा धूमकेतू पहिल्यांदाच सूर्याजवळ आला आहे, त्यामुळे मोठय़ा उल्कावर्षांवासाठी लागण्याइतका धुरळा त्याने मागे सोडला नसेल आणि अशाप्रकारची निरीक्षणे पूर्वी झालेली नाहीत.  जर यासंबंधी अधिक किंवा नवीन माहिती आली तर ती तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
 paranjpye.arvind@gmail.com