News Flash

नवे मूलद्रव्य

निसर्गात एकूण ९२ मूलद्रव्ये सापडतात. या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुकेंद्रकातील धनभारित कणांच्या संख्येएवढे क्रमांक दिले आहेत.

| December 3, 2013 06:44 am

निसर्गात एकूण ९२ मूलद्रव्ये सापडतात. या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुकेंद्रकातील धनभारित कणांच्या संख्येएवढे क्रमांक दिले आहेत. या क्रमांकाला अणुक्रमांक असे म्हणतात. केवळ अणुक्रमांकानेही मूलद्रव्य ओळखले जात असले तरी मूलद्रव्यांना नावेही दिली जातात. ९२ अणुक्रमांकाच्या नंतरची मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मिळवली आहेत. या सर्व मूलद्रव्यांची त्यांच्या अणुक्रमांकानुसार एक सारणी (तक्ता) बनविली आहे. तिला ‘आवर्त सारणी’ (पिरियॉडिक टेबल) असे म्हणतात.
आवर्त सारणी ११८ मूलद्रव्यांसाठी आहे. त्यापैकी निसर्गात सापडणारी ९२ व शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मिळवलेली २६ अशी एकूण ११८ मूलद्रव्ये म्हणजे सर्वच मानवास ज्ञात झाली आहेत. परंतु ११३, ११५, ११७ व ११८ अणुक्रमांकांच्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वास अजून पुष्टी मिळाली नाही. आता नुकतीच ११५ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याच्या कृत्रिम निर्मितीस पुष्टी मिळाली आहे व अर्थातच त्याला आवर्तसारणीसाठी मान्यताही मिळाली आहे.

११५ अणुक्रमांक असणारे हे मूलद्रव्य रशियन व अमेरिकन शास्त्रज्ञांनी खरे तर सुमारे दहा वर्षांपूर्वीच प्रयोगशाळेत प्राप्त केले होते, परंतु वैज्ञानिक संशोधनास मान्यता मिळण्यासाठी तसाच प्रयोग अन्य शास्त्रज्ञांनी केल्यानंतर तत्सम निरीक्षणे मिळावी लागतात.

११५ अणुक्रमांक असणारे हे मूलद्रव्य रशियन व अमेरिकन शास्त्रज्ञांनी खरे तर सुमारे दहा वर्षांपूर्वीच प्रयोगशाळेत प्राप्त केले होते, परंतु वैज्ञानिक संशोधनास मान्यता मिळण्यासाठी तसाच प्रयोग अन्य शास्त्रज्ञांनी केल्यानंतर तत्सम निरीक्षणे मिळावी लागतात. नुकतेच स्वीडनमधील ल्युंड विद्यापीठातील शाास्त्रज्ञांनी  जर्मनीमधील डर्मस्टॅट येथील कण- प्रवेगकाच्या (पार्टिकल अ‍ॅक्सीलरेटर), मदतीने या प्रयोगाची पुनरावृत्ती केली व त्यांना ११५अणुक्रमांकाचे मूलद्रव्य निर्माण झाल्याचे पुरावे सापडले व त्यांनी ११५अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याच्या निर्मितीस पुष्टी दिली.
या शास्त्रज्ञांनी कॅल्शियम (अणुक्रमांक २०) मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकांचा मारा अमेरिकीयम (अणुक्रमांक ९५)  मूलद्रव्याच्या पातळ पापुद्य््राावर किंवा पत्र्यावर केला असता त्यांना ११५ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य निर्माण झाल्याचे पुरावे मिळाले. या मूलद्रव्याचा अर्धआयुष्यकाळ (हाफ लाइफ पीरियड) आहे. केवळ ३० ते ८० मिलिसेकंद (एका सेकंदाचे हजार भाग केल्यानंतर होणाऱ्या एका भागास एक मिलिसेकंद म्हणतात.) स्वीडनच्या शास्त्रज्ञांनी याच प्रयोगाची पुनरावृत्ती केल्यानंतर त्यांनासुद्धा अशीच निरीक्षणे आढळली. त्यामुळे त्याचे ‘अस्तित्व’ मान्य झाले आहे, किंवा त्यास मान्यता मिळाली आहे, असे म्हणता येईल. अर्थातच त्याचा मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीमध्ये समावेश करण्यात येईल. मात्र त्याला कोणते नाव द्यायचे हे ठरवण्याचा मान त्याची प्रथम निर्मिती करणाऱ्या रशियन व अमेरिकन वैज्ञानिकांच्या पथकास दिला आहे. म्हणजेच सध्या तरी ते निनावीच आहे.
मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीमध्ये एखाद्या मूलद्रव्याचा समावेश करण्याचे अधिकार इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी) ही रसायनशास्त्राविषयीची संस्था व अशीच भौतिकशास्त्रासाठी असलेली (आययूपीएपी) संस्था यांना आहेत. त्यांच्या सभांमध्ये या प्रयोगाच्या निष्कर्षांविषयी चर्चा होईल व त्यानंतर या मूलद्रव्याचा आवर्तसारणीमध्ये समावेश होईल.
११७ व ११८ अणुक्रमांक असणारी मूलद्रव्ये वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत मिळवली आहेत, परंतु त्यांच्या निर्मितीविषयीच्या निरीक्षणांना मान्यता मिळावयाची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 6:44 am

Web Title: new chemical element
टॅग : Sci It
Next Stories
1 आयसॉन धुमकेतूच्या प्रखरतेबाबत शंकाच
2 आता निसर्गाची दीपावली
3 धूमकेतू आणि उल्कावर्षांव – २
Just Now!
X