मंगळावर पाठवण्यात आलेली आतापर्यंतची शेवटची मोहीम म्हणजे ‘क्युरिऑसिटी लँडर’. नुकताच या लँडरने मंगळावर पदार्पणाचा आपला पहिला वाढदिवस साजरा केला. ‘नासा’चे हे क्युरिऑसिटी लँडर सुमारे ८ महिन्यात साडेपस्तीस कोटी किलोमीटरचा प्रवास करून गेल्या वर्षी ६ऑगस्ट रोजी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ११ वाजता अचूकपणे मंगळाच्या विवरावर अलगद उतरले. या संपूर्ण प्रवासात क्युरिऑसिटीला नेणाऱ्या अग्निबाणाने दर तासाला वीस हजार आठशे किलोमीटरचा उच्चांकी वेग गाठला होता.
क्युरिऑसिटी हे सुद्धा रोव्हर प्रकारातील स्वयंचलित यान आहे, जे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना काम करू शकते. या यानांचा विकास खास करून मंगळावर उतरून मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला आहे.
क्युरिऑसिटीचा आकार आधीच्या स्पिरिट आणि अ‍ॅपॉरच्युनिटी रोव्हर यांच्या दुप्पट आहे. तसेच याला मंगळावर उतरवण्यासाठी वेगळी पद्धत वापरण्यात आली होती.पूर्वीच्या दोन्ही रोव्हरच्या यानांच्या बाजूने मोठे मोठे फुगे होते, जे या रोव्हरना मंगळाच्या वातावरणात नेताना फुगवण्यात आले. आणि या फुग्यांना अशाप्रकारे लावण्यात आले होते की जेव्हा हे फुग्यांनी वेढलेले रोव्हर मंगळावर पडून स्थिर होईल तेव्हा त्यांची चाके जमिनीच्या दिशेनेच असतील.
 क्युरिऑसिटीला मंगळावर उतरवण्यासाठी पॅरॅशूटचा वापर करण्यात आला होता आणि त्याला मंगळावर उतरवण्याचा मार्ग देखील आधीच्या रोव्हरच्या तुलनेत छोटा होता.  मंगळावर क्युरिऑसिटीचे यशस्वी अवतरण (लँडिंग) यानातील स्वयंचलित यंत्रणेच्या अचूक काम करण्यावर अवलंबून होते. आणि हे सर्व सात मिनिटात घडायला हवं होतं.
जेव्हा या रोव्हरला घेऊन जाणारे यान मंगळाच्या पृष्ठभागाच्या सुमारे १२५ कि.मी. जवळ आले तेव्हा त्याला मंगळाच्या वातावरणातील घटकांचा गतिरोध जाणवू लागला. यानाची गती त्या वेळी तासाला सुमारे २१ हजार किलोमीटर होती. मंगळाच्या वातावरणातील घटकांच्या घर्षणामुळे यानाचे ऊर्जा कवच तापू लागले आणि त्याचे तापमान सुमारे २००० अंश सेल्सियस इतके वाढले. पुढच्या ४ मि. आणि १४ सेकंदात यान ११४ कि.मी. खाली आले, म्हणजे त्याची उंची मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे ११ कि.मी. होती. आपली जेट विमाने दूरचा प्रवास सुमारे या उंचीवरून करतात. यानाची गती आता दर तासाला १४०० कि.मी.  इतकी कमी झाली होती. आता यानाचे पॅरॅशूट उघडण्यात आले. पुढे सुमारे २४ सेकंदानंतर समोरच्या ऊर्जा कवचाला दूर फेकण्यात आले. त्याने आपले काम चोख बजावले होते. आता पुढची सुमारे ८५  सेकंद यानाचा प्रवास मंगळाच्या पृष्ठभागावर समांतर होत होता. ६ मिनिटे आणि ४ सेकंदांनी यानाचे मागचे कवच ज्याला पॅरॅशूट जोडलेले होते ते सुद्धा यानापासून वेगळे झाले. त्या वेळी त्याची उंची पृष्ठभागापासून १.६ कि.मी. इतकीच राहिली होती आणि गती पण आता तासाला २८८ कि.मी. झाली होती.
आता दोन गोष्टी एकामागून एक करण्यात आल्या. जेव्हा रोव्हर मंगळाच्या पृष्ठ भागावर फक्त २० मीटर उंचीवर होते तेव्हा स्कायक्रेनने मंगळाच्या दिशेने जेट सोडून त्याची गती आता दर तासाला २ कि.मी. इतकी कमी केली. आणि मग स्काय क्रेननी दोरीच्या मदतीने रोव्हरला अलगद मंगळावर उतरवले आणि ज्या क्षणी त्याने मंगळाच्या पृष्ठभागाशी संपर्क केला त्या क्षणी रोव्हरने स्कायक्रेनला बांधलेली आपली दोरी तोडून टाकली आणि स्काय क्रेनने स्वतला रोव्हरपासून दूर भिरकावून दिले.  
आणि जेव्हा नासाच्या नियंत्रण कक्षामध्ये क्युरिऑसिटीने आपला प्रवास सुखरूप होऊन धडधाकटपणे मंगळावर उतरलो आहोत, असे पाठवलेले संकेत मिळाले तेव्हा या मोहिमेच्या अत्यंत मोठ्या यशावर शिक्कामोर्तब झाले. दुसरी बाब म्हणजे या मोहिमेत जवळ जवळ एक टन वजनाचे साहित्य मंगळावर उतरवण्यात आले.   ही मोहीम मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रॅम (एम एस एल) च्या अंतर्गत येते. त्याची मुख्य उद्दिष्टे कधी काळी मंगळावर सजीवांना पोषक परिस्थिती होती का याचा शोध घेणे, त्यात पाण्याच्या अस्तित्वाची भूमिका किती, मंगळावरचे वातावरण आणि त्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास ही आहेत. तसेच, या मोहिमा मानवाला मंगळावर उतरवण्याच्या पूर्वतयारीसाठीही आहेत.  या उद्दिष्टांपर्यंत पोचण्याकरता जी शास्त्रीय उपउद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत.
१) मंगळावरील सेंद्रिय कार्बनिक संयुगांची यादी तयार करणे, २) सजीवांसाठी लागणाऱ्या रसायानाचा – म्हणजे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस  आणि सल्फर यांचा शोध घेणे, ३) ज्याच्यामुळे  जैविक क्रियांवर प्रभाव पडू शकेल, अशा मंगळाच्या भौगोलिक आणि भूरासायनिक गुणधर्माचा शोध घेणे  ४) मंगळाच्या पृष्ठभागाजवळच्या रसायनांचा आणि खनिजांचा शोध घेणे, ५ ) मंगळाच्या दगडांत आणि मातीत बदल घडविण्यास कारणीभूत असलेल्या प्रक्रियांचा वेध घेणे  ६) चार अब्ज वर्षांच्या दीर्घ कालावधीत  मंगळाच्या वातावरणात झालेल्या बदलांचा आढावा घेणे, ७) मंगळावरील पाण्याच्या आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या सध्याच्या स्थितीचा, त्यांच्या वितरणाचे आणि त्यांच्या आवर्तनाचे मापन करणे  ८) पृष्ठभागावरून वेगवेगळ्या प्रारणांचा अभ्यास करणे. अशा प्रकारे गोळा होणारी  माहिती आगामी मोहिमा व प्रामुख्याने मानवी मोहिमांसाठी फार उपयोगी ठरतील.