पॅराबोलिक सौरकुकर  पॅराबोला आकाराच्या तबकडीपासून बनविण्यात येतो. या तबकडीवर चकाकणाऱ्या व जास्तीत जास्त सूर्यकिरणे परावर्तित करतील अशा पॉलिश केलेल्या अॅल्युमिनियम धातुच्या पट्टय़ा वापरून पडणारी किरणे एका ठिकाणी केंद्रित होतील अशाप्रकारे रचना केलेली असते. हा कुकर लोखंडी पाईपच्या सांगाडय़ावर बसविण्यात आलेला असून सूर्यकिरणांच्या दिशेप्रमाणे कळविणे सहज शक्य होते. तबकडी सूर्याच्या दिशेने फिरवता येईल, अशा प्रकारे फिरवता येते. सूर्यकिरणे केंद्रित होतील, त्या जागेवर भांडे ठेवण्याकरिता लोखंडी पट्टय़ा वापरून बैठक तयार केलेली असते. तबकडी कशीही फिरवली तरी भांडे जमिनीस समांतर राहून आतील अन्नपदार्थ सांडणार नाही या करिता ही व्यवस्था केलेली आहे. सौरकुकरच्या तबकडय़ांच्या बाजूस एक उभा खिळा दिलेला असतो. सूर्यकिरणांच्या दिशेने तबकडीची दिशा केल्यास या खिळ्याची सावली पडत नाही. त्यावेळी उपलब्ध सर्व सूर्यकिरणांचा योग्य वापर होत आहे असे समजावे. अन्यथा तबकडीची दिशा फिरवावी व योग्य स्थिती येईपर्यंत तबकडी फिरवणे सुरू ठेवावे. हा सौरकुकर वापरण्यांस अत्यंत सोपा व वजनाने हलका असल्याने कोठेही वाहून नेण्यास सुलभ आहे. तसेच ह्य़ा कुकरची जोडणी खूपच सोपी असून सुटे भाग स्वस्त व सहज उपलब्ध आहेत. या कुकरच्या  बैठकीच्या ठिकाणी अन्न शिजविण्याकरिता बाहेरून काळा रंग दिलेले धातूचे भांडे ठेवतात. तसेच नेहमीच्या वापरातील प्रेशर कुकर ठेवून त्याद्वारे सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात. पॅराबोलीक कुकरच्या केंद्रकात २०० अंश सेल्सिअस इतके तापमान मिळते. त्यामुळे पाण्याची वाफ होऊन प्रेशर कुकरमधील अन्न शिजू शकते. या कुकरद्वारे १०-१२ माणसांचे अन्न अध्र्या तासात शिजवता येते. या कुकरद्वारे भाजण्याचे पदार्थ सुद्धा करता येतात. हा सोलर कुकर हॉटेल्स; धाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाकाकरिता उपयुक्त आहे. हा कुकर वापरण्यास, हाताळण्यास व स्वच्छ करण्यास सोपा आहे. तसेच ह्य़ामध्ये काचेचा वापर केला नसल्याने टिकाऊ आहे. याचे कार्य सध्या वापरातील चुलीसारखेच असल्याने अधिक लोकप्रिय आहे. याची कार्यक्षमता अधिक असून स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यास अन्न शिजवण्याचा कालावधी कमी होतो, अन्न योग्य प्रकारे शिजविण्यासाठी कमी वेळ लागतो व अन्नही अल्पावधीत चांगल्या प्रकारे शिजते. मात्र हा कुकर वजनाने हलका असल्याने व छत्रीच्या आकाराची तबकडी असल्यामुळे वारा वेगाने वाहत असल्यास कलंडण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळझी घ्यावी. तसेच परावर्तनाद्वारे सूर्यकिरणे प्रखर होत असल्याने त्यापासून डोळ्यांना इजा होऊ शकते. ते टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी व गॉगलचा वापर करावा. काम संपल्यानंतर तबकडी पालथी करून ठेवल्यास हा धोका टाळता येईल; तसेच चकाकी जास्त काळ टिकविता येईल. तापमान बरेच जास्त असल्याने भाजण्याच्या जखमा होऊ शकतात. त्याबाबत योग्य काळजी घ्यावी.
अनंत ताम्हणे
(लेखक अभियंता व ऊर्जा अभ्यासक आहेत)