१९५६ च्या ऑक्टोबर महिन्यात रशियाने ‘स्पुटनिक’ (कृत्रिम उपग्रह) यशस्वीपणे अंतराळात पाठवून पृथ्वीच्या बाह्य़वातावरणाचे संशोधन करण्याचे नवीन दालन उघडले. रशियाने प्राप्त केलेल्या यशामुळे अमेरिका या महान राष्ट्राचा अपमान झाला. आपले सामथ्र्य सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने प्रचंड पैसा गुंतवून संशोधक आणि शास्त्रज्ञांना आव्हान करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. स्पेस रीसर्च (अंतराळ संशोधन) ही एक अत्याधुनिक, अतिकार्यक्षम संस्था निर्माण झाली.
चंद्रावर अंतराळवीराला पाठविणे, अंतराळात प्रयोगशाळा स्थापणे, मंगळ, शुक्र या सारख्या ग्रहांवर याने पाठवून मानवाच्या ज्ञानांत भर टाकणे यासारखी उच्च ध्येये अमेरिकेने जगजाहीर करून टाकली. अंतराळ संशोधनाचे ध्येय समोर ठेवून रशिया आणि अमेरिका या राष्ट्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. आपणही विज्ञान तंत्रज्ञान या अत्याधुनिक वाटचालीत मागे नाही हे सिद्ध करण्यासाठी भारत, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, इराण यांसारख्या राष्ट्रांनी अंतराळ संशोधन संस्था स्थापन केल्या.
कृत्रिम उपग्रह रॉकेट्सच्या साहाय्याने अंतराळात पाठवून त्यात वेगवेगळ्या यंत्रणा स्थित करून, अंतराळाचे छायाचित्रण करून अनेकविध प्रकारची निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात केली. अमेरिकेने ‘नासा’ आणि रशियाने ‘कॉस्मोलॉजी’ या दोन स्वायत्त संस्था स्थापन करून अंतराळ संशोधनात भरभक्कम भर घालण्यास सुरुवात केली. भारताने ‘इस्रो’ संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
कृत्रिम उपग्रहांच्या यशस्वीतेनंतर कुत्रा, मांजर, माकड यांसारख्या प्राण्यांना अंतराळात पाठवून पुढचा टप्पा सुरू झाला. त्यानंतर युरी गागारीन, व्हॅलेंतिना तेरेश्कोव्हा, अ‍ॅलन शेपर्ड, भारताचे राकेश
शर्मा यांना अंतराळात यशस्वीपणे पाठवून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण
केल्या. वजनविरहीत अवस्थेत गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून पृथ्वीपासून
पाचशे-सहाशे किलोमीटर्स अंतरावर राहिल्याने मानवाच्या
शरीरांवर विपरीत परिणाम घडत नाहीत हे निश्चित झाले. अशा प्रकारच्या यशानंतर जुलै १९६९ मध्ये अमेरिकेच्या नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर यशस्वीपणे पदार्पण करून अंतराळ संशोधनाचा महत्त्वाचा टप्पा
गाठला. ‘स्पेस शटल’ ही संकल्पना अस्तित्वात आली. रॉकेट आणि विमान यांची संयुक्त जोडणी करून पृथ्वी ते अंतराळ आणि पुनश्च पृथ्वीवर पदार्पण यशस्वी होऊ लागले.
अंतराळात, पृथ्वीपासून साधारणत: आठशे किमी अंतरावरून पृथ्वीभोवती भ्रमण करीत राहील अशाप्रकारची ‘अंतराळ स्थानक प्रयोगशाळा’ (स्पेस स्टेशन लॅबोरेटरी) यशस्वीपणे कार्यरत झाली. अंतराळ प्रयोगशाळेत बराच काळपर्यंत वास्तव्य करून अनेक प्रकारचे प्रयोग करून, मानवी शरीरांवर कोणते परिणाम घडतात याची निरीक्षणे नोंदविण्यात आली. सुनीता विल्यम्स हिने सातत्याने सहा महिने अंतराळात राहून अविश्वसनीय विक्रम प्रस्थापित केला.
पृथ्वीभोवती भ्रमण करताना दक्षिण अमेरिका खंडाच्या वरून अ‍ॅटलांटिक महासागर ओलांडताना यानातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, सदेशवहन यांच्यात गफलत निर्माण होते. बम्र्युडा ट्रँगल्स सारखे स्पष्टीकरण देतां न येणाऱ्या घटना घडतात याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष केंद्रित झाले. त्या प्रदेशांचे भरपूर संशोधन केल्यानंतर पृथ्वीच्या गर्भातील चुंबकीय क्षेत्र इतर भागांपेक्षा कमी शक्तीचे आहे असे निश्चित झाले. यालाच शास्त्रीय परिभाषेत ‘साऊथ अ‍ॅटलांटिक अ‍ॅनॉमॉली’ असे संबोधतात. त्याचा जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्या प्रदेशांतील पृथ्वीच्या गर्भात लोह, निकेल यांचे प्रमााण सातत्याने बदलत आहे. त्याचा परिणाम गुरुत्वाकर्षण शक्तीवर घडतो हे निश्चित. झाले.
मानवी शरीरावर खूप काळ अंतराळात वास्तव्य केल्यास, गुरत्वाकर्षण शक्ती नसल्याने फारसे दुष्परिणाम घडत नाहीत असे आशादायक चित्र तयार झाले आहे. परंतु मानवाच्या विचारशक्ती, कल्पना शक्तीवर हळूहळू दुष्परिणाम सुरू होतात. ताशी तीस हजार कि.मी. वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा घडत असल्याने दर सहा तासानंतर पूर्ण अंधार, पूर्ण उजेड (रात्र, दिवस) चक्र त्रासदायक ठरते. अन्नाची चव नष्ट होते. फक्त शरीरयंत्रणा कार्यरत राहण्यासाठी अन्नग्रहण आवश्यक असते सातत्याने अंतराळातून पृथ्वीचे विलोभनीय दृश्य पाहिल्याने मानसिकतेवर विचार प्रक्रियांवर वेगळे परिणाम घडतात, यावर संशोधन सुरू आहे. जास्त काळ अंतराळात राहिल्याने मानवाच्या स्नायू, अस्थिसंस्थेवर दुष्परिणाम घडतात. पूर्ववत होण्यास पृथ्वीवर आल्यानंतर बराच काळ ‘हॉस्पिटल’ मध्ये मुक्काम करावा लागतो. या समस्येला अद्याप उत्तर मिळत नाही. मानवाच्या अंतराळ वास्तव्यात अद्यापही खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.