05 June 2020

News Flash

बोलावे, परी जपून

ती जूनमध्ये शाळेत आली तेव्हा शाळाभर फुलपाखरासारखी बागडत असायची

लहान मुलं त्यांच्या शाळेतल्या बाईंचे सतत निरीक्षण करत असतात. त्यांचं वागणं, बोलणंही ती पटकन उचलतात. म्हणून तर वर्गात प्रत्येक शब्द न् शब्द जपून वापरायला लागतो, मी वर्गात केलेला, ‘आली का भटकभवानी!’ हा शब्दप्रयोग मधुराने तिच्या घरी आजीसाठी वापरला आणि महाभारत घडलं..

आमच्या मराठी शाळेत पालक मुख्यत: दोन प्रकारचे आहेत. एक वर्ग, जागरुक पालकांचा, जे जाणीवपूर्वक आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालतो आणि दुसरा वर्ग, ज्यांना इंग्रजी माध्यम झेपणारं आणि परवडणारं नसतं, तो. वर्गातल्या या सरमिसळीमुळे आपल्या मुलांच्या भाषेवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना या शंकेने पहिल्या प्रकारचा पालकवर्ग थोडा चिंतेत असतो.
आम्हालाही कधी तरी असे अनुभव येतात की काही मुलांच्या तोंडी घरी किंवा शेजारीपाजारी ऐकलेले अपशब्द असतात. त्यांचा त्यात काहीही दोष नसतो. लहान मुलांची शब्दसंग्रह वाढविण्याची क्षमता अफाट असते. कानावर पडलेला प्रत्येक शब्द त्यांचा मेंदू टिपकागदासारखा टिपून घेत असतो. त्यातून जर काही अपशब्द किंवा असं एखादं विशेषण जे क्वचितच वापरलं जातं ते कानावर पडलं तर ती मुलं त्याचा उपयोग कुठे ना कुठे हमखास करतात. मुळात त्यांना तो शब्द न उच्चारण्याजोगा आहे हेच माहीत नसतं. मोठी माणसं मात्र जेव्हा मुलांच्या तोंडून असे शब्द ऐकतात, तेव्हा हबकून जातात आणि मुलांनी काही तरी अक्षम्य गुन्हा केला आहे असं समजून गहजब करतात, तो शब्द वापरायचा नाही अशी तंबी देत राहतात..मात्र याचा परिणाम अगदी उलटा होतो. त्या शब्दामुळे आपण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय हे मुलांच्या लक्षात येतं आणि मग ती अधिकच उत्साहाने तो शब्द वापरायला लागतात. त्यातूनच मग अपशब्द वापरण्याची प्रवृत्ती वाढण्याचीही शक्यता असते. या वयातली मुलं त्यांच्या शाळेतल्या बाईंचे तर सतत निरीक्षण करत असतात. त्यांचं वागणं, बोलणंही ती पटकन उचलतात. म्हणून तर वर्गात प्रत्येक शब्द न् शब्द जपून वापरायला हवा आणि जर कधी काही गडबड झालीच तर मुलांना आकर्षित करणाऱ्या अशा शब्दांना थोडय़ा वेगळ्या पद्धतीने हाताळलं तर मुलांची त्या शब्दांबद्दलची ओढ कमी करण्यात आपण सहज यशस्वी होऊ शकतो.

मधुरा, माझ्या वर्गातलं एक छानसं फुलपाखरू. ती जूनमध्ये शाळेत आली तेव्हा शाळाभर फुलपाखरासारखी बागडत असायची. त्यात आमच्या वर्गाची नावं फुलांची. जास्वंद, कमळ, गुलाब, शेवंती, सूर्यफूल. दिवसभर या फुलावरून त्या फुलावर. शाळेचे सुरुवातीचे दिवस असल्याने मला सतत तिचा माग काढायला लागायचा. ती कुठल्या तरी वर्गात आहे याची खात्री करून घ्यायला लागायची. सुरुवातीच्या काळात मी आणि मधुराची आई तिच्या फिरण्याने हैराण झालो होतो. तिच्या आईचा सारखा माझ्यामागे धोशा, ‘बाई तुम्ही तिला एकदम धाकात ठेवा. अजिबात कुठे जाऊ देऊ नका.’ पण मला काही माझ्या या ‘तोतोचान’ला दमात घ्यायला जमायचं नाही. शोधायला गेल्यावर, सापडली की इतकं गोड हसायची की आपण ही सापडत नव्हती म्हणून घाबरलो होतो, सापडली की रागावायचं ठरवलं होतं हे सगळं मी विसरून जात असे. मग ती छान उडय़ा मारत मारत आणि मी तिच्या मागे असे वर्गात यायचो. सुरुवातीला प्रत्येक वेळेला ही वर्गात नाही म्हटल्यावर घाबरी-घुबरी होणारी मी नंतर नंतर तिच्या बाहेर असण्याला सरावले. बाकीच्या शिक्षिका आणि सेविकांनाही तिच्या फिरण्याची सवय झाली. तिचा ठावठिकाणा मला वर्गातच कळायला लागला. तिच्या येण्याजाण्याला इतर वर्गही सरावले. एक मात्र होतं की सगळ्या वर्गामधून जरी ती फिरत असली तरी आपला वर्ग हा आहे आणि आपल्या बाई या आहेत याची तिला पूर्ण जाणीव होती. दर काही वेळाने एकदा येऊन ती वर्गाला भोज्ज्या करून जायची.

एक दिवस सकाळचे साधारण नऊ वाजत होते. मुलं येण्याच्या वेळेला आम्ही दररोज त्यांच्या स्वागताला वर्गाच्या दारात उभे राहतो तशी मी उभी होते आणि तेवढय़ात मला शाळेच्या गेटमधून मधुराची आई, एका हाताने तिला बखोटीला धरून आणि अडीच वर्षांच्या तिच्या लहान भावाला कडेवर घेऊन घाईघाईने येताना दिसली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. मधुराचा चेहराही घाबराघुबरा, पडलेला. एवढंच काय पण अडीच वर्षांच्या लहान बाळालाही काही तरी झालं आहे हे जाणवलेलं असावं. मीही गोंधळले. काय झालं असेल बरं, कुणाला काही लागलेलं तर दिसत नव्हतं. मी तिच्या आईसाठी पाणी आणायला सांगितलं. मावशी पाणी घेऊन आल्या, पण तिचं अजिबातच कशात लक्ष नव्हतं. ती मला घाईघाईने सांगायला लागली, ‘‘अहो बाई, काल मधुराने कमालच केली. आमच्या आजी (म्हणजे मधुराच्या आईच्या सासूबाई) देवळातून घरी आल्या तर कमरेवर हात ठेवून त्यांना ही म्हणाली, ‘आली का भटकभवानी!’ सासूबाईंना वाटलं की मीच काही तरी बोलले असेन, त्यांनी घराचं रणांगण केलं.’’ तिच्या आईची खात्री होती की नक्की वर्गात कोणी तरी मुलाने तो शब्द उच्चारला असावा. पण आता पाणी पिण्याची वेळ माझ्यावरच आली. माझा चेहराही आता मधुरासारखाच घाबराघुबरा झाला आणि पडला. कारण..
कालचीच गोष्ट. नेहमीप्रमाणेच बाईसाहेब शाळाभर सगळीकडे फेरफटका मारून वर्गाच्या दारात आल्या. ती आल्याबरोबर मी कमरेवर हात ठेवून मोठय़ानं म्हटलं, ‘आली का भटकभवानी!’ खरं तर म्हटल्याक्षणी मला माझी चूक समजली होती. माझ्या त्या वाक्याने वर्गातले सगळे कान एकदम काही तरी नवीन ऐकल्यासारखे टवकारले गेले होते. मी लगेच विषय बदलत, ‘आलं का माझं फुलपाखरू!’ वगैरे म्हणायला लागले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.

नवीन सापडलेला शब्द नको तिथे मधुराने चपखलपणे वापरला होता आणि महाभारत घडवून आणले होते. तिला मी जागेवर बसायला सांगितलं. कधी नव्हे तर ती गुपचूप आपल्या जागेवर बसली. मी तिच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला. चूक माझीच होती हेही सांगितलं. आता तर बाईंमुळेच आपली मुलगी बिघडली अशा नजरेने ती माझ्याकडे बघू लागली. एव्हाना वर्गातील सगळ्या त्या साडेतीन ते चार वर्षांच्या मुलांचे ‘भटकभवानी’ या शब्दाबद्दलचं कुतूहल जागं झालं होतं. हा काही तरी फार विचित्र शब्द आहे आणि तो वापरणं म्हणजे भयंकर गुन्हा आहे असा सगळ्यांचा समज झाला होता.

त्या दिवशी, दिवसभर मी अस्वस्थ होते. माझ्या एका शब्दाची मधुराला आणि तिच्या आईला शिक्षा झाली होती. मी स्वत:च माझ्या वागण्याचा विचार करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा भटकभवानी हा शब्द उच्चारला होता तेव्हा स्वत:च दचकून जीभ चावली होती आणि माझ्या या अशा प्रतिक्रियेमुळेच तो शब्द मुलांच्या लक्षात आला होता. आता मला हेही उमगलं की त्या शब्दाला लाभलेलं वलय काढून टाकणं नितांत गरजेचं आहे. नाही तर उद्या पुन्हा कोणी तरी तो वापरेल आणि पुन्हा एखादं महाभारत घडेल.
दुसऱ्या दिवशी वर्गात अक्षरओळख घेताना मी मुद्दामच ‘भ’ या अक्षराची उजळणी घेतली. आमच्याकडे एखाद्या अक्षराची ओळख करून द्यायची असेल तर ते अक्षर असलेले वेगवेगळे शब्द फळ्यावर लिहून त्यातील ते अक्षर ओळखायला शिकवलं जातं. सुरुवातीला मुलांना मदत करावी लागते पण नंतर ती अगदी पोपटासारखी पटापट त्या अक्षराचे शब्द सांगू शकतात. तशीच त्या दिवशीही मुलं पटापट ‘भ’चे शब्द सांगायला लागली. भ-भटजी, भ-भाकरी, भ-जीभ, भ-भोपळा, भ-भूत, भ-भजी. सगळे जण एक एक शब्द सांगत होते आणि मी म्हटले, ‘भ-भटकणे. भटकणे म्हणजे फिरणे.’ मी मुद्दामच अर्थ सांगितला. ‘मला तर बाबा खूप भटकायला आवडते. तुम्हालाही आवडते ना?’ अर्थातच मोठ्ठा होकार आला. मग म्हटले, ‘‘भ – भवानी’’. सगळा वर्ग एकदम चिडीचूप. कालचा हलकल्लोळ त्यांना आठवला असावा. मी शांतपणे म्हटलं, ‘‘भवानी म्हणजे देवी. शिवाजी महाराजांची गोष्ट माहीत आहे ना, त्यांना नाही का भवानीमातेने तलवार दिली होती.’’ सगळ्यांच्या चेहऱ्यावर आलेला ताण सैल झाला. शिवाजी महाराजांच्या नावाने चैतन्य आलं. मग म्हटलं, ‘‘भ- भ रे भटकभवानी, म्हणजे ज्या देवीला फिरायला आवडते ती देवी.’’ एकदम सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाव आले, ‘‘अरेच्चा! हा अर्थ आहे का भटकभवानीचा. मग त्यात एवढे काही विशेष नाही.’’ मीही सुटकेचा नि:श्वास टाकला. माझी युक्ती कामी आली होती. त्या शब्दाला आलेले वलय नाहीसे करण्यात मी बहुधा यशस्वी झाले होते. कारण नंतर कधी कोणा पालकाची तक्रार आली नाही. पण प्रत्येक वेळी हे असंच होईलच असं मात्र नाही हे लक्षात ठेवून मी ‘बोलावे, परी जपून’ हा मंत्र अंगीकारला.
पुढे किती तरी दिवस, मधुरा दिसली की माझ्या मैत्रिणी हळूच मला म्हणत, ‘‘ती बघ आली, तुझी फिरायला आवडणारी देवी.’’

– रती भोसेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 1:08 am

Web Title: how to speak with elders
टॅग Chaturang
Next Stories
1 मी आहे महाराष्ट्र मुलांनो, मी आहे महाराष्ट्र..
2 शाळेमध्ये ‘बालनिर्णय’ असावे..
3 बालकवितेतून भाषा विकास
Just Now!
X