05 March 2021

News Flash

पानगळीतही फुलवला वसंत

दोघांनाही सामाजिक बहिष्काराला आणि प्रखर टीकेला सामोरी जावे लागले.

पुराण म्हणजे ‘पुरा आणि नवम्’ जे जुने असूनही नवे वाटते ते पुराण. बाया कर्वे आणि अण्णांनी म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काळाच्या पुढे जाऊन आपलं सहजीवन कसं फुलवलं आणि उत्तर आयुष्यातही त्यातील ओलावा नि प्रेम कसं ताजंतवानं ठेवलं याची सफल संपूर्ण कहाणी म्हणजे ‘माझे पुराण’ हे बाया कर्वे यांचं आत्मचरित्र. ऐन तारुण्यात ग्रीष्माचे चटके आणि शिशिरातील पानगळ वाटय़ाला आली असताना आपल्या सुवर्णमयी सहजीवनात त्यांनी वसंत कसा फुलवत ठेवला याची ही खरीखुरी हकिगत.

काही व्यक्ती अशा असतात की, ज्या आपल्याला कधी भेटलेल्या नसतात परंतु जित्याजागत्या माणसासारख्या आपल्या मनात घर करून राहतात. अशा व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांची ही द्वितीय पत्नी. १८९३ मध्ये अण्णांनी बायाशी पुनर्विवाह केला तेव्हा बाया बालविधवा होती. त्या काळात पुरुषाच्या पुनर्विवाहाला समाजमान्यता होती, पण विधवा स्त्रीने पुन्हा लग्न करणे ही गोष्ट समाजाच्या पचनी पडलेली नव्हती. दोघांनाही सामाजिक बहिष्काराला आणि प्रखर टीकेला सामोरी जावे लागले. ऐन तारुण्यात ग्रीष्माचे चटके आणि शिशिरातील पानगळ वाटय़ाला आली असताना आपल्या सुवर्णमयी सहजीवनात त्यांनी वसंत कसा फुलवत ठेवला याची ही खरीखुरी हकिगत. बायानं लिहिलेल्या ‘माझे पुराण’ या आत्मचरित्रातून उलगडत जाणारी.
वयाच्या आठव्या वर्षी बायाच्या नशिबी वैधव्य आलं. केशवपनासारख्या भयंकर प्रथेची ती बळी ठरली. वडील आणि भाऊ सुधारक विचारांचे असल्यामुळे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमध्ये शिकायची संधी तिला मिळाली. अण्णांची पहिली बायको निवर्तल्यावर लग्न करीन तर विधवेशीच असा निश्चय त्यांनी केला होता. बायाच्या वडिलांनी शारदा सदनात तिची आणि अण्णांची भेट घडवून आणली. किरकोळ प्रकृतीच्या अण्णांकडे पाहून ते वर्षभर तरी जगतील की नाही अशी शंका रमाबाईंना आली. त्यांनी वर्षभरानंतर लग्न करण्याचा सल्ला दिला. एवढंच नाही तर बायाच्या नावानं तीन हजार रुपयांचा विमा उतरविण्याची अट अण्णांना घातली. अशी अट घालणाऱ्या रमाबाई आणि कोणताही पुरुषी अहंकार मनात न आणता ती मान्य करणारे अण्णा दोघंही
धन्य होत.
लग्नानंतर बायाच्या नावामागे सौभाग्याचं बिरुद लागलं, पण हातात मात्र सतीचं वाण आलं. स्त्री शिक्षणासाठी अव्याहत धडपडणाऱ्या अण्णांचा पाय घरात ठरत नसे. पैशांची कायम चणचण असे. पैसे मिळविण्याच्या उद्देशानं बायानं सुईणीच्या कामाचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याच वेळी एका अमेरिकी बाईंनी ‘बायाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवता का’ म्हणून अण्णांना विचारलं. अण्णांनी होकार दिलेला पाहून बायाला वाटलं, ‘‘ह्य़ांची वेगळं राहायची तयारी होती तर माझ्याशी लग्न तरी कशासाठी केलं?’’ बायानं न जाण्याचं ठरवलं. म्हणलं तर प्रसंग तसा छोटा आहे, पण त्यातून लक्षात येतो तो पत्नीला शिक्षणाची संधी देणाऱ्या अण्णांच्या मनाचा मोठेपणा. फक्त संधी नाही तर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही. त्याचबरोबर स्वत:ला योग्य वाटेल तेच करण्याची बायाची निर्णयक्षमता. मला वाटतं, संसाराच्या सुरुवातीला परस्परांकडूनच्या अपेक्षा समजल्या आणि त्या पूर्ण व्हायच्या मर्यादा लक्षात आल्या की, भावी सहजीवनाचा पाया अधिक भक्कम होत जातो.
एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे दोघेही ओळखून होते. त्यातील अधिकउण्या स्वभाववैशिष्टय़ांकडे खिलाडूवृत्तीनं पाहायची विलक्षण हातोटी बायापाशी होती. त्यामुळे अण्णांच्या तक्रारी सांगतानाही त्यामध्ये कडवटपणाचा सूर उमटत नाही उलट अथक समजूतदारपणाचा प्रत्यय येतो. त्यांच्या स्वभावातील एककल्लीपणा, हिशोबीपणा, एका बाजूने मनस्वी भिडस्तपणा तर दुसरीकडे टोकाचा आग्रह यामुळे तिचं आणि मुलांचं कसं नुकसान व्हायचं हे तिनं जितक्या परखडपणे सांगितलं आहे तितक्याच ममत्वानं त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आयुष्यात किती नानाविध गोष्टी ती करू शकली याचाही उल्लेख ती करते. अण्णांच्या पोटात तूप जावं म्हणून ती चोरून त्यांच्या पानात तूप ढकलत असे आणि त्यांच्या लक्षात आलं की ते वसकन तिच्या अंगावर ओरडत असत. त्यांच्याबरोबर टांग्यातून जाताना त्यांच्या शेजारी बसावं अशी तिची इच्छा असे, पण अण्णा नेहमी टांगेवाल्यापाशी बसत. अशा क्षुल्लक कारणासाठी भांडत वा झुरत न बसता ती स्वत:ची समजूत काढते की, जर का ते शेजारी बसले असते तर तिच्यापेक्षा लहान दिसत असल्यामुळे मुलं हसली असती.
अण्णांबरोबर संसार करताना वैयक्तिक सुखदु:खाला थारा देऊन चालणार नाही हे बाया समजून होती, परंतु काही प्रसंग मात्र मनावर खोलवर ओरखडे उठवून जात. पुनर्विवाह केला म्हणून समाजाने कितीही घाव घातले तरी आपल्या नवऱ्याने काढलेल्या आश्रमात आपल्याला अशी वागणूक मिळू नये अशी तिची किमान अपेक्षा असायची. परंतु तिथेही तिला अस्पृश्याची वागणूक मिळे. तिची पंगत वेगळी असे. तिला पाण्याला शिवू देत नसत, कारण पुरुषाचा पुनर्विवाह समाजाला मान्य होता पण स्त्रीचा नाही. हा प्रसंग वाचताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात. एरवी छोटय़ामोठय़ा प्रसंगी कुणाचीही कानउघाडणी करणाऱ्या खरमरीत स्वभावाच्या बायानं हा अन्याय का सहन केला असेल? समस्त स्त्री जातीविषयी सहानुभूती असणाऱ्या अण्णांना आपल्या पत्नीचा होणारा अवमान दिसला नसेल? या प्रसंगाविषयी विचार करताना वाटतं की समाज परिवर्तन करायचं असेल तर वैयक्तिक मानापमानाला एका ठरावीक मर्यादेबाहेर स्थान देऊन चालत नाही हे दोघांनीही समजून घेतलं असावं. अशा सामंजस्यासाठी एक आध्यात्मिक बैठक लागते, आत्मिक बळ लागतं ते दोघांपाशी होतं. आपल्या उत्तर आयुष्यात या प्रसंगाचा उल्लेख करून बायानं म्हटलं आहे, ‘मागच्या गोष्टी आठवल्या की अजूनही थोडा राग येतो, थोडं वाईट वाटतं, पण अर्थात त्या वेळची धार आता राहिली नाही हे खरे.’ आयुष्याच्या संध्याकाळी गतकाळाकडे पाहायची क्षमाशील वृत्ती सहजीवनामध्ये सामंजस्याचे मळे कसे फुलवू शकते याचं हे चालतंबोलतं उदाहरण.
एकमेकांच्या मतांचा आदर करण्याचा सुरुवातीपासून घेतलेला वसा अण्णा आणि बायानी शेवटपर्यंत सोडला नाही आणि नात्यातील आपलेपणा हरवू दिला नाही. अण्णा आजारी पडल्यावर लॉ कॉलेजजवळ आपल्या मुलाकडे राहायला गेले. तेव्हा ते नव्वदीला पोचले होते. पण बायाने मात्र हिंगण्याला आपल्या झोपडीत एकटीनं राहणं पसंत केले. अण्णांनी नेहमीप्रमाणे तिच्या निर्णयाला विरोध केला नाही. उलट बायाच्या घरातील घडय़ाळाला रोज येऊन किल्ली देण्याचे बायाने सोपवलेले काम त्यांनी न चुकता केले. त्या निमित्ताने ते रोज बायाला भेटायला येत. तासभर बसून गप्पाटप्पा करत. कधी तिला पुस्तक वाचून दाखवत. आज आजूबाजूला पाहिलं की लक्षात येतं की, एका घरात राहूनही एकमेकांसाठी असा वेळ देणं अनेकांना जमत नाही. या दोघांनी मात्र वेगळ्या घरात राहूनही सहजीवनातील मैत्रभाव सहजपणे जपला होता. ही सहजता हाच त्यांच्या सहजीवनाचा स्थायीभाव होता.
बायाच्या सेवाभावी वृत्तीचं अण्णांना अपार कौतुक होतं. तिची समंजस साथ लाभल्यामुळे आपण आपलं काम निश्चिंत मनानं करू शकलो याची जाणीवही होती. आपल्या पाठीमागे तिला कुणावर अवलंबून राहायला लागू नये म्हणून तिला खर्चासाठी दरमहा पंधरा रुपये मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केली. परंतु बायाच्या जेव्हा लक्षात आलं की, लहानमोठी कामं करून तिनं गुंतवलेल्या ठेवींवरील व्याज तिला पुरेसं आहे तेव्हा तिनं अण्णांकडून दरमहा पैसे घेणं बंद करून टाकलं आणि आपल्या पश्चात सर्व ठेवी आश्रमाला मिळाव्यात अशी व्यवस्था केली.
वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बायाची जीवनज्योत मालवली. आश्रमाच्या परिसरात तिला अग्नी देण्यात आला. तिथं तुळशीवृंदावन बांधण्यात आलं. त्यानंतर अण्णा जेव्हा जेव्हा हिंगण्याला जात तेव्हा तिथून निघताना ‘बायाला भेटून येतो’ असं म्हणून तुळशीवृंदावनाचं दर्शन घेत.
शंभरसव्वाशे वर्षांपूर्वीचं अण्णा आणि बायाचं सहजीवन आपल्यापर्यंत पोचतं ते बायानं लिहिलेल्या ‘माझे पुराण’ या आत्मचरित्रातून. पुराण म्हणलं की ते कालबाह्य़ असणार असा आपला समज असतो. वास्तविक पुराण म्हणजे ‘पुरा आणि नवम्’ जे जुने असूनही नवे वाटते ते पुराण. बाया आणि अण्णांनी तर काळाच्या पुढे जाऊन आपलं सहजीवन कसं फुलवलं आणि उत्तर आयुष्यातही त्यातील ओलावा नि प्रेम कसं ताजंतवानं ठेवलं याची ही सफल
संपूर्ण कहाणी.
chitale.mrinalini@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:20 am

Web Title: biography of anandibai karve
टॅग : Biography
Next Stories
1 दुवा पिढय़ांमधला
2 सॅण्डविच पिढी
3 मी आहे आई आणि..
Just Now!
X