आयुष्यात काय मिळवले आणि काय मिळवायचे शिल्लक राहिले याचा फारसा विचार करायला उसंत मिळेल, असे माझे जीवन स्थिर नव्हते. आयुष्याची सुरुवात केली तेव्हा मी शाळेत जावे किंवा न जावे याबद्दल माझ्या आई-वडिलांना निश्चित मते नव्हती. हायस्कूल शिक्षण संपले तेव्हा मी कॉलेज शिक्षण घ्यावे, असा कुणाचा आग्रह नव्हता, ते घेऊ नये असा कुणाचा हट्टही नव्हता. कॉलेजात कोणती ‘साइड’ घ्यावी याबद्दल कोणताही दबाव नव्हता. पीएच.डी. पूर्ण केल्यावर, कोणत्या शहरात, कोणत्या विद्यापीठात नोकरी करावी याबद्दल कोणाच्या काही खास अपेक्षा नव्हत्या. आयुष्यात अमुक काही केलेच पाहिजे आणि अमुक केले न पाहिजे, असे विचाराचे पिंजरे नव्हते. विद्यापीठातील नोकरी सोडून मी तेजगड या आदिवासी खेडय़ात जायचे ठरवले तेव्हा कुणाचा विरोध नव्हता, कुणाचे प्रोत्साहनही नव्हते. भारतीय भाषांचा एक महाकाय प्रकल्प हातात घेतला तेव्हा तो घ्यावा असा कुणाचा आग्रह, लकडा नव्हता. तो हाती घेण्यास कोणाचा विरोधही नव्हता. आयुष्याच्या शेवटी, ज्या शहरात तीन-चार दशके घालवली त्या शहरातून स्वत:ला अचानक विस्थापित करून एका नव्याच राज्यात, नव्या शहरात वस्ती करावी असा सल्ला कुणी दिला नव्हता, ती करू नये असा सल्लाही कुणी दिला नव्हता.

आयुष्याची दिशा स्वत:च ठरवण्याची मुभा मिळू शकेल इतपत व्यक्तिस्वातंत्र्यवादी होत असलेल्या काळात मी जन्मलो. मध्य युगातील एखाद्या बंदिस्त समाजात जन्मलो असतो तर कसा जगू शकलो असतो याची कल्पना करवत नाही. माझा जन्म झाला तेव्हा देश नुकताच स्वतंत्र झाला होता. पारतंत्र्यात जन्म झाला असता तर कितपत सहजपणाने जगू शकलो असतो? मी गांधी-हत्येनंतर दोन-तीन वर्षांत जन्मलो. श्री अरविंदांचा मृत्यू त्या वर्षी झाला. मी सहा-सात वर्षांचा होतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला. माझ्या कोवळ्या वर्षांत देशात स्वातंत्र्य नांदावे म्हणून आयुष्यभर कष्ट झेलत राहिलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचा आवाज आसपास घुमत होता. त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या मातीतच हसत-बागडत माझे बालपणातील दिवस गेले. त्यामुळे स्वातंत्र्य हा माझ्या जगण्याचा केंद्रवर्ती स्वभाव बनला.

ज्या ज्या वेळी स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे वाटले तेव्हा तेव्हा तो थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे असे वाटणे स्वाभाविकच होते. सुदैवाने माझ्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे उन्हाळे-पावसाळे येत राहतात हे बालपणापासून उमगले होते. संचय करणे हे तेव्हापासूनच हास्यास्पद आणि वेळ वाया घालवणारे आहे हे समजले होते. घरात आणि देशात ‘शॉर्ट-सप्लाय इकॉनॉमी’ ही रोजची बाब असल्याने, त्याचा किंचितही विपरीत परिणाम न करून घेता आयुष्य जगण्याची कला अवगत झाली होती. माझे दोन-तीन पिढय़ांचे पूर्वज, गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन वसलेले. त्यामुळे येथील जातिव्यवस्थेचा व माझ्या आई-वडिलांचा सरळ संबंध नव्हता. मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, जैन हे सारे आणि साऱ्या जाती एकाच पातळीवर आहेत असे सांगणारे व तसे वागणारे माझ्या बालपणात आजूबाजूस होते. ते विचार माझ्या वागण्याचा अपरिहार्य भाग केव्हा बनला ते मला आठवतही नाही. स्वतंत्र देशातील, सर्वसमावेशक समाजातील, व्यक्तिस्वातंत्र्यवादी अशा लाखो-करोडोमधला मी एक, फारशी ऐहिक अपेक्षा नसलेला आणि खास कोणत्या महत्त्वाकांक्षा नसलेला. सुदैवाने, माझ्या जवळच्या कुटुंबातील कोणी या कल्पनेला तडा जाईल असे कोणते दबाव माझ्यावर आणले नाहीत. प्रेमविवाह करणे म्हणजे कोणतीही मोठ्ठी बाजी मारली असे मला वाटत नसे. ते झाले आणि पत्नी अन्य जातीतील, अन्य धर्मातील होती यात मला आणि तिलाही काही खास वेगळेपण वाटले नाही. हुंडा न देणे-घेणे हे तिला किंवा मला ‘काही झाले’ असे वाटले नाही. लग्नविधीला १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च असू नये यात मला कोणती खास बाब वाटली नाही. स्वत:ला आवडेल तेवढे शिक्षण घेत राहावे हे मला नैसर्गिक वाटले. त्यामुळे मी मनात येईल तेव्हा कॉलेजमधून ड्रॉप आऊट होणे, पुन्हा मनात येईल तेव्हा कॉलेजला प्रवेश घेणे असे प्रकार मनाला फारसा त्रास न होऊ  देता करत राहिलो. पीएच.डी. प्रबंध संपवल्यानंतर, पुन्हा एकदा एम.ए. प्रवेश घेणे मला अयोग्य वाटले नाही. मी ते तसे केले.

या साऱ्या वातावरणांत स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे हे स्वाभाविक होते. इतरांची जबाबदारी घेता आली तर आनंद वाटणे हेही. तो स्वभाव बनत गेला. माझा थिसीस श्री अरविंदांच्या साहित्यावर होता. तत्त्वज्ञानात रस होता. कॉलेजमध्ये गणित आणि साहित्य विषय शकलो, त्यात आवड होती. पत्नीचा रसायनशास्त्र विषय. त्यामुळे सायन्स समजून घेण्याची संधी मिळाली. जन्म-शिक्षण महाराष्ट्रात, विद्यापीठातील नोकरी गुजरातमध्ये त्या या दोन्ही भाषांतील साहित्य वाचायची संधी मिळाली. ज्या विद्यापीठात मी प्राध्यापक बनलो ते प्रगतिशील विचारांचे आणि कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे होते. तेथून अनेक वेळा परदेशात जायला प्रोत्साहन मिळत राहायचे. त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, ऑस्ट्रिया, आर्यलड, हंगेरी, सिंगापूर, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत जाऊन तेथले शिक्षण, तेथला समाज व संस्कृती यांचा परिचय होत गेला. संशोधन करणे, लेख-पुस्तके प्रकाशित करणे हे त्या विद्यापीठात प्राध्यापकांचे अपेक्षित काम मानले जायचे. तशा प्रकारे केलेल्या कामाच्या फारशा फुशारक्या मारायच्या नसतात हाही तेथील अलिखित नियम असायचा. त्यामुळे वरिष्ठ व्यक्तींचे लांगूलचालन करणे अथवा स्वत:विषयी बढाया मारत फिरणे असल्या फालतू कामात वेळ वाया जायचा नाही. आणि, योग्य वेळी, योग्य प्रतीचे संशोधन करत राहणे जमायचे. आपापल्या क्षेत्रांत नावाजलेली बरीच मंडळी तेथे होती. जेव्हा जेव्हा माझ्या कामासाठी पुरस्कार वगैरे मिळायचे तेव्हा ती बातमी मिळाल्यावर एक कप कॉफी पिऊन, ते अ‍ॅवॉर्ड विसरून, पुढच्या कामाला लागण्याची सवय अंगवळणी पडत गेली. शिस्तबद्ध रीतीने आणि जमेल तेवढय़ा उत्कृष्ट पद्धतीने कोणतेही काम करणे, त्याचे संपूर्ण नियोजन बऱ्याच आधी करणे, ते डेमोक्रॅटिकली अमलात आणणे, काम पूर्ण झाल्यावर त्याविषयी बढाया ना मारणे, या सवयी अंगवळणी पडल्या. ती जीवनातील एक मोठी उपलब्धी.

माझ्या प्राध्यापकीच्या पंधरा वर्षांत, देशातील अन्य भाषांतील अनेक मान्यवर साहित्यिकांशी संबंध येत राहिला, त्यांच्याबरोबर सहवासाचे प्रसंग येत राहिले. परदेशांतील अनेक नावाजलेल्या अभ्यासकांशी परिचय होत राहिला. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे, गुजरात व मध्य प्रदेशातील शेकडो आदिवासी गावांत फिरून तेथील आदिवासींच्या जीवनाची व संस्कृतीची ओळख होत राहिली. एकाच वेळेस जगभरातील मान्यवर आणि आदिवासी खेडय़ांतील संस्कृती यांची ओळख होणे, त्यांच्याबरोबरचे मैत्री गहिरी होत राहणे हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे समाधान.

विद्यापीठ सोडून तेजगडला गेलो, तेथे आदिवासींच्यात काम सुरू केले. त्यांच्या प्राचीन आणि देखण्या संस्कृतीमधील मला घेता येतील अशा उत्कृष्ट गोष्टी शिकत गेलो. तो अनुभव, जीवनातला सर्वात महत्त्वाचा अनुभव होता. हे करत असताना, विजय तेंडुलकर, अरुण कोलटकर, यू. आर. अनंतमूर्ती, भालचंद्र नेमाडे, भूपेन खखर, गुलाम मोहमद शेख या प्रतिभावान साहित्यिकांशी, कलाकारांशी जवळीक वाढली. दिलीप चित्रे आणि महाश्वेता देवी यांचे तेजगडला जाणे-येणे सुरू झाले. महाश्वेता देवींबरोबर मी हजारो किलोमीटर प्रवास केला. देशातील भटक्या-विमुक्तांचे पाडे, वस्त्या पाहिल्या. तेथल्या स्त्री-पुरुषांशी संवाद करत राहिलो, त्यांच्या अधिकारासाठी सरकारबरोबर बोलणी करत राहिलो, एक देशव्यापी संघटन आणि संघर्ष उभा करत राहिलो. तो सारा अनुभव अतुलनीय होता. त्या साऱ्या कामादरम्यान पंतप्रधानांपासून ते पाथरवटापर्यंत संवाद करणे होते, त्यातून त्या दोन्हीकडे समदृष्टीने पाहायला शिकलो.

कामाचे नियोजन कसे करावे, त्यासाठीची जरुरी संसाधने कशी उभी करावीत हे मी बडोदा विद्यापीठात असताना शिकलो होतो. देशभरातल्या आदिवासी व भटक्या-विमुक्तांचे आणि माझे मैत्रीचे संबंध मी त्यांच्याबरोबर केलेल्या कामादरम्यान निर्माण झाले होते. त्यामुळे जेव्हा देशातील शेकडो भाषांचा सव्‍‌र्हे करण्याचा विचार डोक्यात आला तेव्हा फारशा अडचणी भासल्या नाहीत. देशभरच्या प्रत्येक प्रांतात जाऊन तेथे टीम्स बांधण्याचे काम कसल्याही प्रकारची निराशा न येता करता आले.

अंग मोडून अभ्यासाचे काम करायची सवय माझ्या शिवाजी विद्यापीठातील संशोधन काळात अंगी मुरली होती, ती या सव्‍‌र्हेचे ५० खंड प्रकाशित करण्याच्या कामात उपयोगी ठरली. गुजरातमधल्या माझ्या पस्तीस वर्षांच्या दीर्घ वास्तवात आणि तेथल्या आदिवासी खेडय़ांमधले जे प्रचंड काम उभे करण्याचा प्रयत्न केला होता त्यानिमित्ताने, मला गुजरातचे वास्तव वा मानसिकता फार आतून, जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे तेथे निर्माण होत असणारी फॅसिझमची वृत्ती इतरांपेक्षा बरीचशी आधी समजायला लागली. तेथे उभ्या होत असलेल्या आभासी ‘वास्तवाचे’ अंतरंग काय आहे ते मला जवळून पाहता आले. समानतेला, स्वातंत्र्याला आणि सामाजिक-सहिष्णुतेला दडपून, त्यांची पायमल्ली करून एका व्यक्तीचे माजवले जाणारे अवास्तव स्तोम मी अनुभवत होतो. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील विचारवंतांच्या होत राहिलेल्या हत्यांना थोपवण्यासाठी, त्यामागील फॅसिस्ट मनोभूमिकेला अटकाव घालण्यासाठी ‘दक्षिणायन’सारखी प्रक्रिया सुरू करणे मला जरुरीचे वाटू लागले. ती प्रक्रिया मी सुरू केली, त्याला उत्स्फूर्त आणि भरदार प्रतिसाद मिळाला. पण त्या प्रक्रियेच्या अंगाने मी बडोदा सोडून धारवाडला येऊन राहायचे ठरवले. आयुष्याच्या सातव्या दशकात, माझ्या बालपणीच्या सुंदर गावात सहजपणे मिळालेले विचारस्वातंत्र्य, बंधुभाव, समानता घेऊन आयुष्याचा प्रवास वेगवेगळ्या देशांत, शहरांत, गावांत सुरू आहे. त्या साऱ्या प्रवासात कल्पनेच्या बाहेर अफाट मित्र-मैत्रिणींचा सहभाग लाभला, देशातील शेकडो भाषा बोलणारे भाषिक समाज जवळून पाहता आले, जगातील निम्म्यापेक्षा जास्त देशांना भेटी देता आल्या, लाखो आदिवासी आणि भटक्या-विमुक्तांच्या बरोबर त्यांची सुख-दु:खे वाटून घेण्याचे क्षण आले. हे सारे सहजासहजी कोणास मिळत असेल असे वाटत नाही. ते मला सहजासहजी मिळाले. ते मिळवण्यासाठी जरुरी असणारे परिश्रम करण्याची धडपड, त्या कामासाठीही संसाधने उभी करण्याची हिंमत, कामाचे नियोजन पूर्णपणे करण्याची सवय हे सारे आयुष्यातील अनुभवातून मिळाले, हे समाधान.

पण, जर सत्तराव्या वर्षी मला कुणी विचारले की, ‘तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी प्राप्ती कोणती?’, तर मी म्हणेन की, एका स्वतंत्र देशात जन्माला येणे ही; आणि ‘तुमच्या मनातील कोणती इच्छा अजून अपूर्ण आहे?’, तर माझे उत्तर असेल, ‘स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव पूर्णत: समजणारा समाज आपण पूर्णार्थाने निर्माण करू शकलो नाही, त्यासाठीचे माझे प्रयत्न पुरेसे नव्हते.’ मला वाटते, माझ्या आयुष्याचा परिपूर्ण हिशेब या दोन वाक्यांनी पुरा होऊ  शकतो. बाकी सारे, ‘इदं न मम्’

– गणेश देवी

ganesh_devy@yahoo.com