14 October 2019

News Flash

नाटक नावाचा खेळ

मुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.

मुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.

आभा भागवत यांच्या व्यक्तिमत्व विकासात चित्रकलेचं महत्त्व या  सहा लेखांच्या यशस्वी मालिकेनंतर आजपासून पुढचे तीन महिने नाटक या कलेचं मुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका. एरवी, जी कौशल्यं, जे गुण आत्मसात करण्यासाठी महागडे कोर्सेस, क्लासेस आहेत, शिबिरं, कार्यशाळा, व्याख्यानमाला आहेत ते गुण, कौशल्य हा नाटक नावाचा खेळ खेळताना सहजशक्य होतात. अजमावता येतात, अंगची होऊ  शकतात. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती याला त्याने प्रोत्साहन कसं काय मिळू शकतं हे सांगणारी ही मालिका दर पंधरवडय़ाने.

चिन्मय केळकर यांनी परफॉर्मिग आर्टस्मध्ये पदवी घेतली असून संवाद लेखक, नाटय़ दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा अनुभव आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘लोच्या झाला रे’सारख्या नाटकांमध्ये त्याचप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरील ‘सिगारेट’ आणि ‘अलविदा’ या नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘पोपट’ आणि इतर चित्रपटांसाठी तर ‘लज्जा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आदी मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखक म्हणून काम केले आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठामध्ये ‘स्पीच पॅटर्न’ आणि ‘रंगमंचावर प्रभावी संवादफेक’ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करतात.

मला माझ्या लहानपणीचं आठवतंय. आई-बाबा आणि कुणी कुणी मला वेगवेगळे, बरेचसे खेळ आणून दिले होते. दुकानातले, खोक्यांमध्ये पॅक केलेले. काही बुद्धीला चालना देणारे, काही हाताच्या विशिष्ट हालचालींना प्रेरणा ठरतील असे. बुद्धीच्याही वेगवेगळ्या कप्प्यांना आव्हान देणारे हे खेळ वयानुरूप माझ्या हातात पडत गेले; मी ते खेळत गेलो. आजही, तीस-पस्तीस वर्षांनंतर प्राथमिक शाळेत जाऊ  लागलेल्या मुलांसाठी अनेक खेळांची आधुनिक वेष्टनातली अनेक खोकी मॉलमधल्या दुकानांतून दिसतात. काही तर, या खेळांचेच स्वतंत्र मॉल्स आहेत. आता या तयार खेळांमधलं वैविध्य आणि तांत्रिक सफाई बरीच वाढलीय. शिवाय नवे खेळही तयार झाले आहेत. मात्र, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, आणि अभिव्यक्ती याला प्रोत्साहन देणारे किंवा हे करण्यासाठी उद्युक्त करणारे खेळ अजूनही त्या मनानं कमीच आहेत.

मग असा खेळ तरी कुठला? तर.. मला आठवतंय, कळतंय तो.. गोष्ट सांगण्याचा खेळ. कुणीतरी सांगत असलेली गोष्ट ऐकणे किंवा कुणालातरी गोष्ट सांगणे. या गोष्ट सांगण्याच्या खेळात काही पात्रं येतात, रंग येतात, आवाज येतात, वर्णनं येतात, भावभावना येतात. त्या रंगवल्या जातात; कल्पनेनं फुलवल्या जातात. हवा देऊन फुगा फुगवावा तसं मलाच माहिती असलेल्या काही गोष्टी फुग्यांसारख्या मोठय़ा होत जातात. मला त्याची गंमत वाटते. हा खेळ आठवला की माझे आजोबा आठवतात. त्यांच्याकडून मी हा खेळ शिकलो. गोष्ट सांगता सांगता डोळ्यासमोर गोष्टीतलं सगळं जग उभं राहायचं. कधीकधी गोष्ट नेहमीचीच, आधी सांगून झालेली असली तर ती नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं, किंवा मनाची पात्रं घालून त्यातल्या अधिक वेगळ्या गमतीसकट सांगायचे आजोबा. त्यात हळूहळू अभिनय करून, संवादांची पेरणी करून, आवाज काढून, प्रसंग उभा करायचे. मग तीच नेहमीची गोष्ट अधिक मजेशीर आणि नवी वाटायची.

त्या गोष्टी ऐकता ऐकताच मी माझ्या काही गोष्टी तयार केल्या. या गोष्टींमध्ये माझ्याच आजूबाजूची माणसं असायची. किंवा मला जे होऊन बघायला आवडेल अशी माणसं. मग, त्यांच्याभोवतीचं सगळं जग, घरातल्याच काही गोष्टी वापरून तयार व्हायचं. पट्टीची तलवार, उशीला पट्टा किंवा दोरी बांधून हातात घ्यायची ढाल, दोरीच्या मिशा, चादरी-उशा वापरून घरासारखा आकार इत्यादी जी गोष्ट जशी आहे तशी ती न वापरता वेगळीच वापरायची असा एक छंदही लागला.

त्याच काळात मला आणखी एक जिवंत खेळ ओळखीचा झाला जो की या गोष्ट सांगण्याच्या खेळाचाच पुढचा भाग होता; तो म्हणजे नाटक. पुण्यात त्यावेळी (ही) बरीच नाटकं व्हायची. मला पुसटसं आठवतं की मी जे नाटक पाह्य़लं (किंवा खरंतर पाह्य़लं नाही) ते एक मोठय़ांचं नाटक होतं. माझ्या आई-बाबांबरोबर. सगळंच्या सगळं पाह्य़लं नाही आणि कळलंही नसणार, पण तरी जे काही पाह्य़लं त्यानं मी भारावून गेलो होतो असं आई-बाबा सांगतात. मग काही बालनाटय़ही पाहिली. आणि नंतर घरी आणखी एक खेळ सुरू झाला. नाटक नावाचा खेळ. जवळच्या, समवयस्क मित्रांना घेऊन मी त्यांना ‘‘आपण नाटक, नाटक खेळूया’’ असं सांगितल्याचं आठवतंय. हा खेळ खेळताना मला जितकं भारी वाटायचं तितकं बाकीच्यांना वाटायचं नाही बहुधा. कारण ते लवकरच कंटाळून जायचे. त्यांच्यापैकी काहींनी नाटक पाहिलंच नव्हतं. त्याबद्दल ऐकलंही नव्हतं. माझा उत्साह मात्र उतू जायचा. खरंतर, आम्ही जेव्हा घर घर, ऑफिस ऑफिस असे खेळ खेळायचो तेव्हा तेही एक प्रकारचं नाटकच होतं. पण मी नाटक पाहायला लागल्यावर, नाटक असा वेगळा खेळ खेळता येईल असं मला वाटलं तसं इतर कुणाला वाटलं नाही हे मात्र नक्की.

पुढे याच खेळानं माझं सगळं जगच व्यापलं तेव्हा मला कळलं की नाटकाच्या प्रयोगाला ‘खेळ’ असंच म्हणतात. मज्जा वाटली. आपण अगदी योग्य खेळ खेळत होतो असं वाटलं. पण मग हा खेळ सगळ्यांनाच का माहिती नसतो? काहींना तर या खेळानं नुकसान होईल असंच वाटतं ते का? या खेळात किती काय काय गमती आहेत आणि त्या काही कुठल्या परग्रहावरच्या नाहीत. आपल्यातल्याच आहेत. एरवी, जी कौशल्यं, जे गुण आत्मसात करण्यासाठी महागडे कोर्सेस, क्लासेस आहेत, शिबिरं, कार्यशाळा, व्याख्यानमाला आहेत ते गुण, कौशल्य हा नाटक नावाचा खेळ खेळताना सहज शक्य होतात. आजमावता येतात, अंगची होऊ  शकतात. तर हा खेळ पालक, शिक्षक, मोठे लोक आधीपासूनच का खेळायला देत नाहीत? असे भाबडे प्रश्न मला पडायला लागले. हळूहळू मोठा होत गेलो तशी त्याची काही उत्तरंही मिळायला लागली. पण त्या उत्तरांनी दिग्मूढ व्हायला झालं.

आजही मी स्वत:ला कल्पनेत घेऊन जाऊन कुणीतरी दुसराच असतो. मात्र या आजूबाजूला, पाहण्यात आलेल्या जागा, प्रसंग, माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती यांनी माझं मनोविश्व भारून गेलेलं असतं. आणि त्यातून एक प्रतीजग उभं करून त्यात रमायला मला आवडतं. आजूबाजूच्या रंगीबेरंगी जगाची सरमिसळ करून पाह्य़लाही आवडतं. माझ्यातलीच वेगवेगळी माणसं, माझ्या आजूबाजूची माणसं निरखायला आवडतात. आणि या सगळ्याला पूरक असं वाचायलाही आवडतं.

चित्रं, शिल्प पाहावी, संगीत ऐकत शांत बसून मनातली सगळी उलथापालथ बघत राहावी असं वाटतं. या सगळ्यातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवांतून आपल्या आजच्या जगण्याचे संदर्भ तपासून घेता येतात. माझ्यापेक्षा वेगळी आयुष्यं जगणाऱ्या माणसांशी जोडून घेता येतं. आणि त्यामुळे सकारात्मकतेकरता वेगळे, कृत्रिम प्रयत्न करावे लागत नाहीत. नकारात्मकता स्वीकारता येते. जगण्याची मजा लुटता येते. नाटक नावाच्या खेळानं हा ठेवा मला दिला आहे.

व्यक्त होण्याची अनेक माध्यमं आहेत. नाटक हे त्यापैकी एक. माझ्या दबलेल्या, दडलेल्या, चेपल्या गेलेल्या भावभावना यांना मोकळं व्हायला, व्यक्त व्हायला, किमानपक्षी समजून घ्यायला आणि स्वीकारायला तरी नाटक मदत करतं. नाटक लिहिणं, नाटक दिग्दर्शित करणं, नाटकात अभिनय करणं आणि ते काहीच केलं नाही तरी नाटकाला फक्त एक प्रेक्षक म्हणून जाऊन नाटकाच्या सर्व अंगांचा रसास्वाद घेता येणं या इतकं आनंद देणारं दुसरं काही नाही. देवाणघेवाण ही मुख्य गरज असलेल्या नाटक या कलेचा माणसाशी सामाजिक प्राणी या नात्यानं किती जवळचा संबंध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

गेल्या काही वर्षांत असं वाटायला लागलं, जाणवायला लागलं की आता हे कल्पनेचे खेळ त्याला एक कोंदण घालून, त्याला खेळण्याचं रूप देऊन प्रत्येक लहान मुलाच्या हाती द्यायला पाहिजे. आजूबाजूला तसे प्रयत्न करणारे नाहीतच असं नाही. पण ते प्रमाण मी लहान असताना जितकं होतं तितकं राहिलेलं नाही. दुसरं त्या खेळाकडे खेळ म्हणून खिलाडू वृत्तीनं पाहण्यापेक्षा व्यवसायाचा, अर्थार्जनाचा भाग म्हणून बघण्याचंच प्रमाण वाढतंय. चित्रपट किंवा दूरचित्रवाणी माध्यमातून संधी मिळवण्यासाठीची पायरी म्हणून किंवा शिक्षण घेताना सांस्कृतिक काम केल्याचा दावा करण्याकरता इतकाच मर्यादित विचार केला जातो. अर्थातच त्यामुळे मी वर उल्लेख केलाय तसा आनंद नाटक देत असेल यावरचा विश्वासच उडतो. किंवा मग जिथे नाटकाचं शिक्षण दिलं जातं तिथे शिक्षण म्हणून त्यावर काही पक्क्या, ठोस चौकटी घातल्या जातात. त्या असणारच; पण मुळात या खेळाची गंमत योग्य त्या वयात न अनुभवल्यामुळे एकदम ते व्यवसायाचं रूप धारण करून मानगुटीवर बसतं. आणि मग त्यावेळी नाटय़-शिक्षण हे इतर कुठल्याही शिक्षणाप्रमाणेच ओझं होऊन मानगुटीवर बसतं. त्याचा निखळ आनंद घेता येत नाहीच.

नाटक नावाचा हा खेळ लहान मुलांकरता, विशेषत: पूर्वप्राथमिक गटातल्या दोस्तांकरता किती आवश्यक आणि गरजेचा आहे; तो खेळून बघितल्यानं नेमकं काय होऊ  शकतं, तो कसा, कुठल्या स्वरूपात खेळायला देता येईल याबद्दल विचार करण्याची, ते विचार तुम्हा सगळ्यांशी वाटून घेण्याची, तुमचाही प्रतिसाद आणि प्रतिक्रियांमधून त्यातलं तथ्य तपासण्याची ही एक उत्तम संधी आहे असं वाटलं आणि काळाची गरजही. म्हणून हा लेखन प्रपंच. नव्या पिढीकडे व्यक्त होण्यासाठी आधुनिक आणि अति सुलभ अशी माध्यमं आहेत आणि कमीत कमी शब्दांत तिथे व्यक्त होता येतं. दृश्य माध्यमातल्या नव्या शोधांनी आणि अभिनव कल्पनांनी आजचं जग भारलेलं असताना नाटक नेमकं कुठे आहे. नवीन पिढीसाठी त्याचं स्थान काय आणि कसं आहे? लहान मुलांसाठी नाटक म्हणजे काय असू शकतं, नाटकातले कुठले घटक त्यांच्यासमोर कळत-नकळत कसे येऊ  शकतात, नाटक म्हणजे फक्त करणाऱ्यांचीच नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकांचीही कशी जबाबदारी आहे आणि नाटकामुळे व्यक्तिमत्त्व आणि पर्यायानं समाज घडण्यात नेमकं काय आणि कसं योगदान असू शकतं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे ही लेखमाला.

चिन्मय केळकर ckelkar@gmail.com

First Published on April 8, 2017 1:23 am

Web Title: chinmay kelkar article about benefits of drama for childhood development