28 September 2020

News Flash

संगीताचे जादूई विश्व!

मागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला.

गाण्यात सगळीच मुलं मस्त रमून जातात

मुलांच्या अध्ययनात येणारी एक गंभीर समस्या म्हणजे ‘अध्ययन अक्षमता.’ इंग्रजीमध्ये त्याला ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ असे म्हणतात. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतात. थोडक्यात कला ही या व अशा सर्वच मुलांना सामावून घेते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.

संगीत ही एक अशी जादू आहे जी आपल्याला आनंद देऊन जाते, आपल्या प्रत्येक भावनेमध्ये साथ देते. तुम्ही उदास असाल तरीही आणि धम्माल मस्तीच्या मुडमध्ये असाल तरीही आणि प्रेमात असाल तरीही. सगळ्याच भावभावना व्यक्त करणारं संगीत सर्वव्यापी आहे. त्याला जशी भावनेची मर्यादा नाही तशी माणसामाणसातील भेदभावांचीही नाही. देश, संस्कृती, जात, धर्म सर्वाच्या पलीकडे हे संगीत आपल्याला नेऊन पोहोचवतच, पण त्याही पलीकडे तुमच्यातल्या शारीरिक कमतरतेलाही व्यापून उरतं.

मागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला. दु:खी दिसत होता. मी त्याला विचारताच म्हणाला, ‘‘अहो माझ्या मुलीची शाळा बदलायची आहे. ती वाचन बरी करते, पण लिहिताना चुकते अन् मग माझ्या हातचा मार खाते.’’  माझ्या लगेचच लक्षात आलं की या मुलीला वाचनात नाही तरी लिहिताना अडथळा येतोय. म्हणजे हिला ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ असू शकते. मुलांच्या अध्ययनात येणारीही  एक गंभीर समस्या अलीकडे प्रकर्षांने लक्षात यायला लागली आहे. याला मराठीत ‘अध्ययन अक्षमता’ असे म्हणतात व इंग्रजीमध्ये ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ (एल.डी.) म्हणतात. थोडक्यात समजवायचे तर ‘एल.डी.’ चे तीन प्रकार असतात. १) डिस्लेक्सिया (वाचनात अडथळा)२) डिस्ग्राफिया (लिखाणात अडथळा) ३) डिस्कॅलक्युलिया (गणितात अडथळा) म्हणजेच या मुलांची बौद्धिक हुशारी जरी चांगली असली तरी या मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळणं कठीण जातं. तुम्ही सर्वानी जर ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल. हो, पण अशा मुलांना गुरू मात्र चांगलाच मिळायला हवा. या चित्रपटात शिक्षक असणाऱ्या आमिर खानने त्या मुलाची समस्या अचूक ओळखून, ती समजून त्याला जरी अध्ययनात अडथळा असला तरी चित्रकलेची आवड आहे हे शोधून काढले व ती जोपासायला मदत केली. त्यामुळे त्या मुलाचा आत्मविश्वास तर वाढलाच पण त्याचं हरवलेलं हसू, आनंद परत मिळाला. सगळीच मुलं अभ्यासातच चमकली पाहिजेत, असं नाही हे त्या चित्रपटातून पोहोचवलं गेलय. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतील, नाही येतातच! अन् अगदी हेच मला त्या फळवाल्याच्या मुलीबद्दल जाणवलं. मग मी त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली.

ती मुलगी शिकत होती एका महानगरपालिकेच्या शाळेत. माझा अनुभव म्हणून सांगते, काही शाळा वगळल्या तर बऱ्याच शाळांमध्ये या ‘अध्ययन अक्षमतेची’ म्हणजेच ‘एल.डी.’ ची माहिती असेल कदाचित. पण तिथे तितकीशी जागरूकता व उपाय मात्र होताना दिसत नाहीत. आणि जर असं असेल तर त्याकरिता शाळेतल्या शिक्षकांना त्याचं (एल.डी.) विशेष प्रशिक्षण देणे जरुरी आहे व अशा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात जरी अडथळा असला तरी या मुलांची बौद्धिक पातळी बऱ्याच वेळा सरासरी बुद्धीपेक्षा जास्तच आढळते व त्यांच्यात काही विशेष कला गुण नक्कीच असतात. अन् माझ्या मनात अगदी हेच आलं की आपण या महानगरपालिकेमधल्या सर्वच मुलांना ‘संगीताद्वारे समुपदेशन’ केलं तर त्यांना त्यांच्या अभ्यासातही नक्कीच फायदा होईल. काही दिवसांतच योगायोगाने मला एक उत्कृष्ट संधी चालून आली. ‘व्हच्र्युअल क्लास’ घेण्याची. व्हच्र्युअल क्लास म्हणजे मी एका स्टुडिओत बसून सॅटेलाइट द्वारे एकाचवेळेस या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास सव्वाचारशे शाळांमधल्या मुलांशी संवाद साधत होते. ‘संगीताद्वारे समुपदेशन’ ही माझी इच्छा पूर्ण होत होती. वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांचे स्क्रीन माझ्यासमोर होते व त्या मुलांशी माझा परस्परसंवाद चालू होता आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा माझ्यापर्यंत लगेच पोहोचत होत्या. त्यात दैनंदिन आयुष्यात संगीताचे महत्त्व व वापर, त्याचबरोबर अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, एकमेकांशी तुलना न करणे इत्यादी सांगण्यात आले. मुलांनीसुद्धा गाणी म्हटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला फार मज्जा आली. बरं यामध्ये वर्गीकरण नव्हतं. यात सरसकट अगदी पाचवीपासून दहावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी होते. पण त्यापैकी ज्यांना अध्ययन अक्षमता असेल किंवा असते त्यांना बहुतांश वेळा संगीत हा विषय आवडतच असतो. मग अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व त्या मुलाचा/ मुलीचा कल पाहून एखादे कोणतेही वाद्य अथवा गाण्याचा क्लास लावला तर असं आढळून येतं की कालांतराने त्यांच्या अध्ययनात देखील प्रगती होऊ लागते. त्याचा फायदा असा होतो की त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच व ती खूश राहू लागतात.

तशीच आणखी एक समस्या म्हणजे ‘ऑटिझम.’ ‘ऑटिझम’ला ‘आत्ममग्नता’ असे म्हणतात. अशीच दोन मुलं आमच्या ‘स्वरमानस’मध्ये यायची. त्यांना गाणं ऐकण्याची व गायची प्रचंड आवड होती. इतर वेळेस आपल्या आई-वडिलांचंही विशेष न ऐकणारी ही मुलं आमच्या क्लासमध्ये बऱ्यापैकी शांतपणे गाणं ऐकायची. त्यातली जी मुलगी होती ती माझ्या नजरेला नजर न मिळवता खाली मान घालून गात असे. मध्येच ओरडतही असे (विशेषत: तिची आई काही बोलली तर) व तिच्या बोलण्यातही अस्पष्टता होती. पण गाणं ही एकच गोष्ट तिला खूपआवडे, त्यामुळे या गाण्याच्या क्लासची मात्र ती आतुरतेने वाट पाहायची.  इतकी की गाण्याच्या क्लासच्या दिवशी, वेळेच्या आधीच ती तिच्या आईच्या मागे भूणभूण लावायची. कालांतराने तिच्यात या संगीतामुळे आमूलाग्र बदल झाला. ती गाणं खाली मान न घालता, थेट माझ्याकडे अधूनमधून बघत गाणं म्हणायला लागली व तिच्या उच्चारातही बदल होऊ लागला. ती जेव्हा मन लावून गाणं म्हणायची तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून आम्हा सर्वच शिक्षकांना खूप समाधान वाटे. तर थोडक्यात असं की संगीत या व अशा सर्वच मुलांना सामावून घेतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.

माझे हे सर्व अनुभव गाणं गाणाऱ्यांपैकीचेच आहेत. पण या मुलांपैकी काहीजणांना तबलाही उत्कृष्ट वाजवता येऊ शकेल किंवा पेटीही. किंबहुना अनेक वाद्यांपैकी कुठलंही वाद्य जे त्यांना भावतं ते! कारण आपण सर्वच जाणतो, जेव्हा सृष्टी आपल्याला एखादी गोष्ट कमी देते तेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणात ही देते. म्हणजेच निसर्ग आपल्याकडून फक्त हिरावून घेत नसतो तर आपल्याला अनेक गोष्टी भरभरून देत पण असतो!

निसर्गावरून आठवलं की आम्ही रत्नागिरी, जव्हार, अगदी पार नागपूर जवळ एक उमरेड नावाचं छोटंसं गाव आहे. तिथपर्यंत गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत, लहान मुलांकरिता.  उमरेडमध्ये खाणीत करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. तिथे कायमस्वरुपी घरे फार कमी. जिकडे काम मिळेल तिथेच तात्पुरते झोपडं बांधून ही लोकं रहातात. ज्या मानाने अंग मेहनत त्या मानाने पैसे फारच कमी. त्यामुळे केव्हा तरी अन्न. कमी असेल तर वेळेअभावी उंदीरही मारून खातात. इतकी वाईट परिस्थिती. अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते  त्यांचा अभ्यास घेतात.  आमची ‘स्वरमानस’ची टीम तिकडे शिकवायला गेली होती. एवढी गरिबी असून मुलं मात्र चुणचुणीत, हसरी, ज्ञान मिळवण्यासाठी आतूर होती. गाणं शिकवायला घेतलं. आम्ही एक ओळ म्हटली की लगेच आमच्या पाठोपाठ ती मुलं अचूक गात होती. अगदी आमच्यासारखेच हुबेहूब हावभाव करत, एका सुरात गाणं म्हणत. आश्चर्यच वाटत होते.

नदीचा प्रवाह, ओढय़ाचा खळखळाट, वाऱ्याची शीळ पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाची रिमझिम, पानांची सळसळ या सर्वातच संगीत भरलेलं असतं. त्यामुळेच कदाचित या गावच्या मुलांना संगीत खूप जवळचं वाटून चटकन आत्मसात होत असावं. त्यांच्याबरोबरच अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता.

संगीत एखादी जादूची कांडी फिरावी तसं लहान मुलांचं अन् मोठय़ांचं आयुष्य समृद्ध करत असतं, हेच प्रत्ययाला येत होतं. येत रहातं..

मानसी केळकर-तांबे  swarmaanas@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 12:38 am

Web Title: music helps children with learning disabilities
Next Stories
1 संगीत एक भावनिक भेट 
2 आत्मानंद अन् विकासही
3 छोटय़ांच्या मोठय़ा गोष्टी!
Just Now!
X