22 January 2019

News Flash

कणखर रमाबाई

रमाबाई ही शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या ‘त्रिदल’ कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

रमाबाई ही शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या ‘त्रिदल’ कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे. रमाबाईंनी बापूंची मूल्ये स्वीकारली आहेत. स्वत:च्या डोळ्यांतील अश्रू त्यांना दिसू दिले नाहीत. रमाबाई बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. संसारासाठी खस्ता खाताहेत. रमाबाईंनी स्वत:ला कायम टिकवून धरले आहे. दु:खांनी, संकटांनी, वार्धक्याने जर्जर झालेल्या रमाबाई भानावर राहण्याचा निकराने प्रयत्न करतात आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण जाणवते.

रमाबाई ही शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या ‘त्रिदल’ कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे. मुक्तिबोधांनी ‘क्षिप्रा’ (१९५४), ‘सरहद्द’ (१९६२) आणि ‘जन हे वोळतु जेथे’ (१९६९) या कादंबऱ्यांतून विश्वास वीरकर ऊर्फ बिशू वीरकर याच्या आयुष्याची कथा सांगितली आहे. रमाबाई ही बिशूची आई आहे. या कादंबरीत्रयीचा आरंभ बिशूच्या जन्मापासून होतो.

एका पावसाळी रात्री बारा वाजता आपल्या तिसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी ऐकल्यावर बापू रमाबाईंना बघायला बाळंतिणीच्या खोलीत शिरतात. बापू कंदिलाच्या प्रकाशात त्याला पाहतात तेव्हा बाळ रडत असते. बापू म्हणतात, ‘‘ऐकलंस का? पोराला आपलं घर नापसंत दिसतंय!’’ त्यावर रमाबाई म्हणतात, ‘‘भलतंच.’’ पण त्या क्षणी बिशूला बोलता आलं असतं, तर तो म्हणाला असता, ‘मला नाहीच आवडलं तुमचं हे घर.’ उज्जनच्या पडक्या गल्लीतल्या चिटणीसांच्या जुन्या वाडय़ातले दोन खोल्यांचे ते घर. कळकट, मोडक्या सामानाने भरलेले. रात्री चिरगुटे एकाला एक जोडून केलेल्या चौघडय़ांवर आई, मधू, सुमा आणि बिशू झोपतात. फक्त बापूंच्या बिछान्याला तेवढी कापूस गोळा झालेली गादी असते. बिशूला झोप लागत नाही. तेव्हा आईवडिलांचे बोलणे त्याच्या कानावर पडते. बापू रमाबाईंना म्हणत असतात, ‘‘वाईट वाटून घेऊ नकोस.’’

त्यावर त्या म्हणतात, ‘‘कुठं वाईट वाटून घेतेय? पण तुम्ही एवढं खपता तरी पुरं पडत नाही. पोराबाळांसाठी खस्ता खाता, पण तुमच्यासाठी कपभर दूध नाही मिळत!’’

‘‘खरंच, तुझी काय चूक? माझ्यासारख्या कफल्लकाच्या पदरी तुला कशाला बांधली अण्णांनी? नुसतं एका अंगणात लहानपणी खेळत होतो म्हणून, वयाच्या आठव्या वर्षीच नको होती जन्माची गाठ बांधायला ..आज तुझ्यासारख्या साक्षात लक्ष्मीला..’’

‘‘काय बोलायचं हे? माझी तपश्चर्या मोठी म्हणून तुम्ही मला मिळालात ..पण तुमची सेवा करायचं पुण्य नाही बांधून आणलं मी मेलीनं!’’

बापू तहसिलीत कारकून आहेत. गोऱ्यापान, गोल चेहऱ्याच्या या सुस्वभावी नारायणावर रमा लहानपणीच जीव लावून बसलेली असते. आजोबांनी त्याच्याशी लग्न लावून दिले खरे, पण बापूंना व्यवहारज्ञान नाही. खाली मान घालून कचेरीत काम करावे आणि देवावर भरवसा ठेवून सरळमार्गी असावे, समाधानाने राहावे; घरात कधी धान्य नसते, पोरांचे कपडे फाटलेले असतात, सुमाचे लग्न करायचे असते. बापूंना या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, पण त्यांना आपली स्थिती सावरण्याचे दुसरे मार्ग ठाऊक नाहीत. उलट बापूंनी वरिष्ठांकडे शब्द टाकल्याने त्यांच्या हाताखाली कारकून म्हणून लागलेल्या कुळकर्णीने वसुली करून आणलेल्या सहाशे रुपयांच्या रकमेवर त्यांच्या सह्य घेतल्या आणि पैसे तिजोरीत जमा न करता स्वत:च्या खिशात टाकले. या विश्वासघाताने आणि अफरातफरीचा आळ आल्याने बापू खचतात. त्यांचा मित्र वामनराव ते पैसे भरतो, त्यामुळे त्यांना ओशाळवाणे होते. हळूहळू ते अंथरूण धरतात. बापूंचे निधन होते.

बापूंना रमाबाईंनी जन्मभर नुसती साथ दिलेली नाही, तिने त्यांना सांभाळले आहे. एके काळी गर्भश्रीमंत घरात वाढलेल्या आपल्या या पत्नीला खरे तर त्यांनी नीट ओळखलेले नसते. माहेरी नवऱ्यासह राहताना तिच्या आईने तिच्या वडिलांजवळ बापूंविषयी, ‘पोसा आता जल्मभर घरजावई’ असे म्हटले तेव्हा तिने दुसऱ्याच दिवशी माहेरचा वाडा सोडला नि वेगळा संसार थाटला. बापूंसह तिने बापूंची मूल्ये स्वीकारली. स्वत:च्या डोळ्यांतील अश्रू त्यांना दिसू दिले नाहीत. रमाबाई बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. संसारासाठी खस्ता खाताहेत. कष्ट करून त्यांचे हात भलेमोठे कामगारांच्या बायांसारखे झालेले आहेत. बापूंवर अफरातफर केल्याचे संकट कोसळल्याचे ऐकल्यावर त्या म्हणतात, ‘‘अगदी जिवाला लावून घेऊ नये! सारं काही नीट होईल. आजवर मुंगीला दुखवायचं झालं नाही. देवालाच आपली चाड आहे! आणि मी आहे ना!’’

एकदा त्या लहान बिशूला सांगतात, ‘‘बाळ, माणसानं कधीही कुणाला फसवू नये आणि फसवून घेऊ नये.’’ हे या कादंबरीतले पताकास्थान आहे. बापूंनी कुणाला फसवले नाही, पण पुढे त्यांची फसवणूक मात्र झाली. रमाबाई घराचा कणा आहेत. त्यांची सर्वाना शिकवण, त्यांचे धडे सर्वाना प्रमाण, बापूंनापण. मधूच्या मित्राकडून मधूला कळते, रमाकाकू किती ठिकाणची कामे करतात. पण त्या त्याबद्दल कधीही तक्रार करीत नाहीत. हा दोन महायुद्धांमधला काळ आहे. बापूंची तत्त्वे सरळमार्गाने जगणे. त्यांचे सारे जगच जुने झाले आहे. शंकरजींवर बापूंची श्रद्धा आहे. रमाबाईंचीही देवावर श्रद्धा आहे, पण भिस्त नाही. त्या स्वाभिमानी आहेत. करारी, कष्टाळू, परिस्थितीला खंबीरपणे, धर्याने तोंड देणाऱ्या आहेत. बिशूला त्यांनी इंदूरला बहिणीकडे शिकायला ठेवले, पण आपल्या परिस्थितीबद्दल बहिणीला अवाक्षरानेही कळवले नाही. बेचाळीसच्या आंदोलनाच्या वेळी शाळा बंद पडतात, तेव्हा त्या बिशूला उज्जनला परत यायला सांगतात. घराकडे जाताना बिशूला बाजूच्या बोळामधून एक जुनेर घातलेली कृश बाई एकदम समोर आली. निस्तेज मळकट मान, अनवाणी, पदराखाली काही तरी लपवलेले. ही सुमा आहे. तो जिना चढून वर जातो, खोलीत शिरतो. जमीन उखडलेली, न सारवलेली.. डोळे अंधाराला सरावल्यावर त्याला रमाबाई दिसल्या. अंगाची जुडी करून रकटय़ावर बसलेल्या. सगळे केस पांढरे झालेले. पण त्यांनी काही सांगितलेले नव्हते. त्या थकल्या आहेत. त्यांनी दोन दिवसांपासून काही खाल्लेले नाही. घरात धान्याचा कण नाही. शेजारीपाजारी सारे झाले. हे सारे बिशूला सुमाकडून कळते.

एके काळी संकटात सापडलेल्या बापूंनी वामनरावांची मदत स्वीकारलेली असते. पण आता अशाही परिस्थितीत त्या वामनरावांना काही सांगत नाहीत. कारण ह्यंना आवडलं नसतं ते.. बिशू तुझे वडील फार वेगळे होते.. अगदी लहानपणापासून तसेच.. प्रपंचासाठी करायचं ते केलं, पण संसारासाठी बारकसादेखील खोटेपणा केला नाही त्यांनी. धुतल्या तांदळासारख्या बापूंबद्दल रमाबाईंना अभिमान आहे. आणि शेवटी ते खोटे पडले. शब्द खोटा पडला म्हणून ते गेले. याचे त्यांना अपार दु:ख आहे.

अजून सुमाचे लग्न व्हायचे आहे. पण रमाबाई तिला वाटेल तिथं ढकलणार नाही. म्हणावं.. त्यांची पुण्याई कामाला येईल. बापूंचा आदर्श रमाबाईंनी बिशूमध्ये रुजवला आहे. त्यांचा थोरपणा पटवून दिला. बिशूला परिस्थितीपुढे खोटे बोलून, थापा देऊन जुळते घ्यायचे नाही. परिस्थिती नावाच्या न दिसणाऱ्या गूढ शत्रूशी तोंड देण्यासाठी त्याला आत्मा विकायचा नाही.

या तीनही कादंबऱ्यांतले वातावरण आणि परिस्थिती स्वातंत्र्यपूर्व काळातील. या काळात मध्यम वर्ग अधिक ढेपाळतो आहे. उरापाड जपलेली मूल्ये ढासळत आहेत. कुळकर्णीने बेदरकार रीतीने बापूंना फसवले आहे. सुमाने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, मधुकर, जगदीश, निशिकांत, मुजुमदार सारे मार्ग शोधताहेत. कल्पना, सत्य, खडतर प्रवास यातून जाताना काही स्वत:ला तगवताहेत, भाव्यांसारखे काही हरताहेत. सुमाने बिजवराशी लग्न करणे पत्करले आहे. पण रमाबाईंनी स्वत:ला टिकवून धरले आहे. दु:खांनी, संकटांनी, वार्धक्याने जर्जर झालेल्या रमाबाई भानावर राहण्याचा निकराने प्रयत्न करतात आणि तसाच त्यांचा बिशू. त्याला भरकटायचे नाही. जीवनाचे गूढ, गुंतागुंतीचे रूप त्याने जवळून पाहिले आहे आणि त्यानेच त्याला समज आली आहे. जे जे पाहिले, जाणले ते पडशीत ठेवून तो आता मार्गाला लागणार आहे. तो तेजपूरला पुढे जाणार आहे आणि रमाबाई नंतर त्याच्या सोबतीला जाणार आहे.

परस्परांशी कुठे ना कुठे तरी जुळणाऱ्या अनेक पात्रे असलेल्या या कादंबरीत रमाबाई ही व्यक्तिरेखा काळोखातही स्वत:चे अस्तित्व टिकवून धरणाऱ्या प्रकाशरेषेसारखी वेगळी उमटून दिसते एवढं मात्र नक्की!

प्रभा गणोरकर prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: article about ramabai character of novel tridal by author muktibodh