26 February 2021

News Flash

‘डाव मांडून भांडून मोडू नको..’

गीत ना. घ. देशपांडे यांचे, संगीतकार राम फाटक व गायक सुधीर फडके या त्रयीचे लोकप्रिय गीत आठवले.

सुधीर फडके व राम फाटक

भावगीतात शब्द आणि भावना महत्त्वाच्या असतात. शब्दांच्या उच्चारातील नाद व स्वर ऐकणाऱ्यास भावनेकडे नेतो. जसा भाव, तसा ताल. तालाची लय भावानुरूप लवचिक असते. एखादे भावगीत लोकप्रिय होण्यात या सगळ्याचा एकत्रित सहभाग असतो. म्हणूनच अशी गाणी कित्येक  वर्षांनंतरही आपल्याला मोहिनी घालतात.

गीत ना. घ. देशपांडे यांचे, संगीतकार राम फाटक व गायक सुधीर फडके या त्रयीचे लोकप्रिय गीत आठवले.. ‘डाव मांडून भांडून मोडू नको..’ शब्द- स्वरांच्या भक्कम आधारे हलकीफुलकी स्वररचना अन् तालातल्या खेळकरपणाने सजलेले हे गीत आहे. सुधीर फडके यांचे गायन विशेष लक्ष देऊन ऐकण्यासारखे आहे. त्यांच्या स्वर, शब्द आणि उच्चाराचा संगम या गाण्यात चित्तवेधक झाला आहे.

सुधीर फडकेंची गाणी आवडणाऱ्या आणि सुगम संगीत गाणाऱ्या प्रत्येक गायकाला  हे गीत गाऊन पाहण्याचा मोह झाला आहे. या मोहात पडणे माझ्याकडूनही सहज झाले. या गीताचा आरंभीचा म्युझिक पीस तर आवडलाच; पण तो संपताक्षणी कधी एकदा गाण्याचा मुखडा गातो असे झाले होते. पुन्हा मुखडा गाताक्षणी श्रोत्यांकडून मिळणारे ‘वाह..! वाह..! अहाहा..!’ कोण विसरेल? मैफलीत आगळे वातावरण निर्माण करण्याची या गीतामध्ये क्षमता आहे. त्या हलक्याफुलक्या व आनंदी वातावरणात गाण्याचे चारही अंतरे मोठय़ा उत्साहात म्हणणे होते. ताला-सुरात खेळत ही चाल उत्तम गायली तर ‘वन्स मोअर’ ठरलेलाच. पुढे पुढे तर आधी तीन अंतरे म्हणायचे आणि ‘वन्स मोअर’ घेताना चौथा अंतरा म्हणायचा, अशी योजना मनात तयार असे. हे गाणे गाण्यासाठी मन आतुर होई. गायकाला आणि श्रोत्यांनाही आवडणारे हे गीत. जेव्हा मी मराठी गीतांच्या वाद्यवृंदातून गायला सुरुवात केली तेव्हा या गाण्याचे इंट्रो म्युझिक हे ‘स्वरांकन’  या वाद्यवृंदाचे ‘शीर्षक संगीत’ होते. हे संगीत सुरू होताच कलाकारांमध्ये व सभागृहात चैतन्य पसरे. कार्यक्रम सुरू करायला व आनंदी वातावरण निर्माण व्हायला हे म्युझिक उत्तम आहे असा विश्वास निर्माण झाला. आणि जेव्हा क्रमामध्ये हे गाणे येई तेव्हा आनंदाला बहर येत असे. भावगीतातले शब्द गाण्यात अशी जादू असते.

‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको।

आणले तू तुझे सर्व मी आणले

सर्व काही मनासारखे मांडले

तूच सारे तुझे दूर ओढू नको

ओढू नको, डाव मोडू नको।

सोडले मी तुझ्याभोवती सर्व हे

चंद्रज्योती रसाचे रूपेरी फुगे

फुंकरीने फुगा हाय फोडू नको

फोडू नको, डाव मोडू नको।

गोकुळीचा सखा तूच केले मला

कौतुकाने मला हार तू घातला

हार हासून घालून तोडू नको

तोडू नको, डाव मोडू नको।

काढले मी तुझे नाव तू देखिले

आणि माझे पुढे नाव तू रेखिले

तूच वाचून लाजून खोडू नको

खोडू नको, डाव मोडू नको।’

फक्त पाच शब्दांचा मुखडा आहे. सर्वसाधारणपणे धृवपदामध्ये पहिली ओळ असते व दुसरी ओळ असते. त्याला आपण ‘साइन लाइन’ आणि ‘क्रॉस लाइन’ असे म्हणतो. या गाण्यामध्ये तशी ‘क्रॉस लाइन’ नाही.  मुखडय़ातले तीन शब्द क्रॉस लाइनसारखे उपयोगात आणले आहेत. त्याला दुसरी ओळ म्हणायचे, इतकेच हे मुखडय़ामध्ये येते. इथे संगीतकार राम फाटक यांची प्रतिभा दिसते. संपूर्ण गीतामध्ये संगीतकाराच्या प्रतिभेला बहर आलेला आहे. म्युझिक पीसेसपासून तालातले ‘थांबे’ एकदम आकर्षक झाले आहेत. ‘खेमटा’ ताल आणि त्या तालातल्या पॅटर्नस्चा उत्तम उपयोग केलाय. त्यामुळे चाल सजली आहे. त्यात आणखीन दुधात साखर असल्याप्रमाणे बाबूजींचे गायन आहे. या गीतामधील बाबूजींचा प्रत्येक उच्चार बारकाईने ऐका. अगदी पहिला शब्द ‘डाव’ हा उच्चारताना तो ‘खेळ’ वाटला पाहिजे. तो ‘डाव’चा उच्चार हा ‘डावं-उजवं’मधल्या ‘डावं’प्रमाणे न व्हावा ही काळजी घ्यावी लागते. ‘डाव’ या शब्दातले ‘ड’ हे अक्षर गीतामध्ये अनेक वेळा आले आहे. ‘फ’ आणि ‘ख’ ही अक्षरेसुद्धा अनेक वेळा गाण्यात दिसतात. हे गाणे म्हणताना आणि ही अक्षरे उच्चारताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटी येणारा ‘नको’ या शब्दातला ‘को’ हा उच्चार नीट ऐकूनच करावा. अद्ययावत माइक सिस्टिममधल्या ‘एको’ या सोयीचा वापर करू नये, तर ‘एको’ आल्यासारखा तो उच्चारावा. पण त्यासाठी बाबूजींचा उच्चार शंभर वेळा तरी ऐकायला हवा. संगीतकाराने गाण्यातला प्रत्येक शब्द  तालातल्या लयीबरोबर बांधलाय आणि गायक सुधीर फडकेंनी स्वर-शब्दांचा महाल उभा केलाय. उत्तम सुरांमधले हे खेळकर असे आर्जव आहे. हे सुरेल आर्जव ‘खेमटा’ तालात बांधताना तबला व ढोलक असा दुहेरी उपयोग केलेला आहे. तालाच्या मात्रेवर तालाचे थांबणे व पुन्हा ताल सुरू होणे ही या गाण्यातील आकर्षक गोष्ट आहे.

संगीतकार राम फाटक मूळचे अहमदनगरचे. पुढील काळात ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवन गाण्यानेच भारलेले होते. भावगीत गायक जे. एल. रानडे यांच्याशी झालेली त्यांची भेट अतिशय महत्त्वाची ठरली. त्यांच्याकडून राम फाटकांना गाणे शिकायला मिळालेच, पण त्याचबरोबर संगीत नाटकांतूनही भूमिका मिळू लागल्या. ‘सं. विद्याहरण’ या नाटकात राम फाटक नायक होते. आकाशवाणी अधिकारी म्हणून त्या प्रांतातही त्यांचा संचार झाला. स्वत: रामभाऊ उत्तम गायक होते. ‘संगीतिका’ हा त्यांचा विशेष आवडीचा आविष्कार. नागपूर आकाशवाणीवर संगीतकार राम फाटक यांनी अनेक ऑपेरा सादर केले. हिराबाई बडोदेकर, जे. एल. रानडे, काणेबुवा यांच्या गायनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्या काळात हलक्याफुलक्या भावपदांची मोहिनी रामभाऊंच्या मनावर पडली. पुण्यात आल्यावर त्यांना विनायकबुवा पटवर्धन, भास्करराव गोडबोले यांची शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्यांना मा. कृष्णरावांच्या स्वररचना आवडायच्या आणि गजानन वाटवेंचे गाणेसुद्धा आवडे. पुणे आकाशवाणीमधील नोकरीत रामभाऊंनी ‘स्वरचित्र’ ही मासिक गीतांची कल्पना फुलवली. नवोदित गायक, कवी व संगीतकारांसाठी मंच निर्माण केला. पुणे आकाशवाणीच्या उषा आरगडे यांनी रामभाऊंच्या काही आठवणी सांगितल्या. त्या सांगतात.. ‘रामभाऊ नेहमी गाण्यात तल्लीन असायचे. त्यांच्या मनात चोवीस तास संगीत हा एकमेव विषय असे. त्यांच्या डोक्यात सतत संगीतविषयक अनेक कल्पना येत. नंतर त्या कल्पना प्रत्यक्षात येत असत. त्यांच्यासोबत पं. अरविंद गजेंद्रगडकर व मधुकर गोळवलकर असायचे. कवी सुधीर मोघेसुद्धा रामभाऊंना भेटण्यासाठी आकाशवाणीवर येत असत. संगीत विषयात काहीतरी वेगळे करावे असा विचार सतत रामभाऊंच्या मनात असे.

पं. भीमसेन जोशी व सुधीर फडके या श्रेष्ठ गायकांनी गायलेली काही गाणी राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली आहेत, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.

‘डाव मांडून भांडून मोडू नको..’ हे गीत ना. घ. देशपांडे यांचे. नागोराव घनश्याम देशपांडे हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचे बालपण सेंदूरजनला गेले. पुढल्या प्रवासात खामगांव, मेहेकर, नागपूर येथे त्यांचे वास्तव्य होते. खामगांव हायस्कूलमध्ये शिकत असताना बालकवी, गोविंदाग्रज, केशवसुत, यशवंत, गिरीश, माधव ज्यूलियन, अनिल यांच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या आणि त्यांचे मन कवितेकडे ओढले गेले. नागपूरला शिकत असताना ग्रे, टेनिसन, कोलरिज, इलियट यांच्या इंग्रजी कविता त्यांच्या वाचनात आल्या. या वाचनाचा परिणाम म्हणून त्यांची कवितेची शैली विकसित होत गेली असे ते मानत. ना. घ. देशपांडे यांनी १९२९ पासून कवितालेखनास प्रारंभ केला. त्यांच्या मते, ‘कविता ही अनंतरुपिणी आहे. अमकाच एक प्रकार म्हणजे कविता नाही. व्याख्येच्या चौकटीत कवितेला बंदिस्त करणे योग्य नाही. इतकेच काय, यमक व अनुप्रास आपोआप येतात, मुद्दाम करावे लागत नाहीत, असे ते म्हणत.

‘डाव मांडून भांडून मोडू नको’ हा प्रेमाचा संवाद आहे. त्यात संसाराचा डाव आहे. गाण्यातील शब्दांमध्ये स्त्रियांच्या मनाचे पैलू दिसतात. हा संवाद पूर्णत: नायकाकडूनच आहे. तो तिला सारे काही प्रेमाने सांगतो आहे. मनासारखा मांडलेला संसाराचा डाव मोडू नको, हे तो लटक्या प्रेमाने सांगतो आहे. भांडण होऊ शकते या भीतीने आधीच तो ‘भांडू नको’ असे सांगतोय. हा संवाद एकपात्री असला तरी दोघांचा वाटतो. खरं म्हणजे तिचे मौन या शब्दात बोलके झाले आहे. अर्थात् नायकाच्या आर्जवातला लडिवाळपणा शब्दात, स्वरात व उच्चारात दिसतो.

गीतातील नायकाची भावना आपल्या समर्थ गायनाने गायक बाबूजी आपल्या हृदयात उतरवतात. भावनांचा अभ्यास व उच्चारशास्त्र यांचे बाबूजी हे ‘विद्यापीठ’ आहे. त्यांच्या गायनशैलीचा अभ्यास हा प्रबंधाचा विषय आहे. त्यांच्या आवाजात आपल्यासमोर गाण्यातील भावनांचे हुबेहूब चित्र उभे करण्याची जादू आहे. संगीतकार राम फाटक यांच्याकडे  बाबूजींनी आणखीही काही भावगीते गायली आहेत. बाबूजींचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होता. आणि भावनेने ओथंबलेल्या आवाजामुळे त्यांचे प्रत्येक गाणे ‘आपले स्वत:चे’ असे झाले. संगीताच्या शब्दकोशात ‘सुधीर फडके’ या शब्दांचा अर्थ ‘भारतीय संगीतातील संस्कृती सांभाळून गायलेले संस्कारक्षम गाणे’ असाच आहे.

विनायक  जोशी vinayakpjoshi@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 2:08 am

Web Title: composer ram phatak lyricist n g deshpande singer sudhir phadke
Next Stories
1 ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार..’
2 ‘कुणी बाई गुणगुणले..’
3 ‘हसले मनी चांदणे..’
Just Now!
X