जेवणाच्या शेवटी दही वा ताक प्यायचे म्हणता ते ठीक, पण गरमागरम ‘कडक-मीठा’ चहाच्या कपाने दिवसाची सुरुवात करणारी मंडळी भरपूर असतात. शिवाय हल्लीच्या जाहिरातीसुद्धा शास्त्रीय सत्ये सांगून, आपले उत्पादन कसे आणि का आरोग्यस्नेही आहे, हे पटवीत असतातच. पहा ना, चहात फ्लेवीनॉईडस आणि अ‍ॅण्टी-ऑक्सिडंटस् असतात, हे चहा पिणाऱ्या पूर्वीच्या कित्येक पिढय़ांना माहीत तरी असेल का? पण आता.. आमच्या चहा पिण्याला एक शास्त्रीय आधार आणि म्हणून चहाबाजपणाला जणू आरोग्यदायी असण्याची बैठक लाभली आहे.

जाहिरात जे सांगतेय ते खरं आहे. पण ती फ्लेवीनॉईडस आणि ते अ‍ॅण्टी-ऑक्सिडंटस् पिणाऱ्याला लाभदायी व्हावेत, मुळात ते त्याच्या चहाच्या कपात असावेत, यासाठी चहा कोणता घ्यावा, कसा करावा, कधी प्यावा आणि तसाच का? हे माहीत असायला हवे. त्यामुळे त्या दैनंदिन सवयीतून काय मिळते आणि काय गमावले जाते, याचे योग्य आकलन आपल्या सर्वाना होईल.

आधी पाहू मळ्यातली चहाची पाने आपल्या घरी चहा पावडर म्हणून येईपर्यंत, काय काय प्रक्रिया होतात आणि त्यामुळे चहाचे प्रकार कसे ठरतात. चहाच्या झुडपावरील कोणती पाने चहा करण्यासाठी वापरली जातात – अगदी कोवळी टिक्शी, मध्यम जून आणि खूप जून. तसेच ती कोणत्या मोसमात खुडलीत, कशा भौगोलिक वातावरणात वाढलीत, जसे दार्जिलिंग, आसाम, उटी, केरळ किंवा इतरत्र, यावर त्याचा दर्जा, चव व गुणधर्म ठरतात.

मुळात चहा तीन प्रकारचे असतात. ग्रीन (नॉन फर्मेन्टेड), ऊलाँग (पार्शली फर्मेन्टेड) आणि ब्लॅक (फर्मेन्टेड). म्हणजेच ही नावे सांगतात प्रक्रियेचे स्वरूप. त्याउलट सीटीसी म्हणजे कट-ट्विस्ट-कर्ल/क्रश-टीअर-कर्लचे लघु रूप तर बीओपी म्हणजे बर्मा ऑरेंज पेको. ही आणि अशी इतर नावे ब्लॅक चहाच्या विविध उप-प्रकारांची असतात.

अशा नावावरून चहा ही ब्रिटिश कॉलनीवाल्या देशांना त्यांनी दिलेली देणगी आहे, हे पण ध्यानात येते. मात्र चहा करण्याची आणि घेण्याची ब्रिटिश पद्धत आपण स्वीकारली नाही. तर चाय नावाचे दूध साखरमिश्रित व पत्ती उकलेले एक वेगळेच पेय तयार केले. या पेयामुळे काय लाभ-हानी होते, ते पुढील

(११ ऑगस्टच्या) लेखात.

vasudeo55p@gmail.com

haturang@expressindia.com