गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर छोटय़ा धावसंख्येचा बचाव करण्याचा भारतीय महिला संघाने आटोकाट प्रयत्न केला. परंतु इंग्लंडच्या संघाने ९१ धावांचे छोटेखानी लक्ष्य गाठत बाद फेरीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने वाटचाल केली. सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघाला बाद फेरीसाठी गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची भरवशाची चार्लट एडवर्ड्स केवळ ४ धावा करून तंबूत परतली. एकता बिश्तने तिला बाद केले. टॅमी ब्युमाऊंट आणि सारा टेलर यांनी ३२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. हरमनप्रीत कौरने ब्युमाऊंट आणि साराला एकाच षटकात बाद करत इंग्लंडला धक्का दिला. हिदर नाइट आणि नताली शिव्हर यांनी २० धावांची भागीदारी केली. एकता बिश्तने एकाच षटकात नाइट आणि लीडिया ग्रीनवेला बाद करत इंग्लंडला ५ बाद ६२ अशा अडचणीत टाकले. पुढच्या षटकात शिव्हरला बाद करत एकताने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात डॅनिएला व्हाट बाद झाली. अशाच प्रयत्नात जेनी गन धावबाद झाली आणि इंग्लंडची ८ बाद ८७ अशी घसरगुंडी उडाली. अचूक टप्प्यावरील निर्धाव चेंडूच्या आक्रमणामुळे भारतीय संघाने इंग्लंडला दडपणाखाली आणले. १८ चेंडूंत ५ धावा असे आव्हान मग १२ चेंडूंत ३ धावा असे झाले. १९व्या षटकात वेदा कृष्णमूर्तीने पाच निर्धाव चेंडू टाकत सामन्यातला थरार वाढवला. मात्र शेवटच्या चेंडूवर तिच्या हातून चेंडू फुलटॉस सुटला आणि अन्या श्रुसबोलेने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हिदर नाइट सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, धरमशालाच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर भारतीय संघाला केवळ ९० धावांची मजल मारता आली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने सातत्याने विकेट्स गमावल्या. हरमनप्रीत कौरने २६ तर कर्णधार मिताली राजने २० धावा केल्या. इंग्लंडतर्फे हिदर नाइटने १५ धावांत ३ बळी घेतले. अन्या श्रुसबोलेने २ तर नताली शिव्हरने एक बळी घेत तिला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ८ बाद ९० (हरमनप्रीत कौर २६, मिताली राज २०; हिदर नाइट ३/१५, अन्या श्रुसबोले २/१२) पराभूत विरुद्ध इंग्लंड : १९ षटकांत ८ बाद ९२ (टॅमी ब्युमाऊंट २०, नताली शिव्हर १९; एकता बिश्त ४/२१)
सामनावीर : हिदर नाइट.