तीन वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात आर्यलडचा सामना करायचा आहे. या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला विजय आवश्यक आहे. दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धचा पराभव बाजूला सारत दक्षिण आफ्रिकेला टक्कर देण्यासाठी आर्यलडचा संघ आतुर आहे.
चेन्नईच्या याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सराव सामने खेळले आहेत. त्यामुळे इथल्या खेळपट्टीची त्यांना माहिती आहे. त्रिशा चेट्टी आणि डेन व्हॅन निइकर्क या सलामीच्या जोडीकडून दक्षिण आफ्रिकेला अपेक्षा आहेत. कर्णधार मिगनन डी प्रूझकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. मधल्या फळीने उपयुक्त योगदान दिलेले नाही ही आफ्रिकेसाठी चिंतेची गोष्ट आहे. गोलंदाजीत शबनिम इस्माइलवर धुरा आहे. मॅरिझान काप आणि चेला टायरन या जोडगोळीकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
आर्यलडसाठी इसोबेल जॉयस, क्लेर शिलँग्टन, कॅथ डाल्टन आणि सेसिलिआ जॉयस या चौकडीवर मोठी जबाबदारी आहे. चेन्नईच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर सेसिलिआ जॉयस, गॅबी लुइस आणि सिआरा मेटकाल्फ या त्रिकुटाला कामगिरी उंचावण्याची संधी आहे.