अफगाणिस्तानविरुद्ध अखेरचा साखळी सामना आज

शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवून ‘अ’गटातून वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे साखळीतील अखेरचा अफगाणिस्तानविरुद्धचा रविवारी जामठामध्ये होणारा सामना त्यांच्यासाठी औपराचारिक समजला जात असला तरी हा सामना जिंकून विजयी चौकार लगावण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज असेल. दुसरीकडे पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानला मुख्य फेरीत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत त्यांना एक तरी विजय  मिळवता येतो की बांगलादेशसारखी त्यांचीही पाटी कोरी राहते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

अफगाणिस्तानने स्पध्रेत केलेले शानदार प्रदर्शन लक्षात घेता वेस्ट इंडिज त्यांच्याविरुद्ध गाफील राहण्याची चूक करणार नाही. वेस्ट इंडिजच्या तुलनेत कागदावर अफगाणिस्तान कमकुवत वाटत असला तरी, या संघात जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. साखळी फेरीत अनुभवी झिम्बाब्वेला पराभूत करून आणि मुख्य फेरीमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या दिग्गज संघाला चिवट झुंज देऊन त्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. तिन्ही साखळी सामने गमावून यापूर्वी स्पध्रेबाहेर पडल्यामुळे अफगाणिस्तानसाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही. मात्र, जाताजाता वेस्ट इंडिजला दणका देऊन गोड शेवट करण्याचा अफगाणिस्तान संघाचा नक्कीच प्रयत्न राहील.

सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजने उपांत्य फेरी गाठल्याने हा सामना त्यांच्यासाठी फारसा महत्त्वाचा समजला जात नाही. एकीकडे शेवट गोड करून अफगाणिस्तान विश्वचषकाच्या आठवणी सोबत घेऊन जाण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे वेस्ट इंडिज आपल्या अंतिम साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीमध्ये दावेदारीसाठी दरारा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

वेस्ट इंडिजला आपल्या खेळात सातत्य दाखवता आलेले नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचल्याने या सामन्यात त्यांना प्रयोग करण्याची नामी संधी असेल.

वेस्ट इंडिज वि. अफगाणिस्तान(गट पहिला)

संघ

वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कालरेस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, मालरेन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर आणि इव्हिन लुईस.

अफगाणिस्तान : असगर स्टॅनिकझाई (कर्णधार), आमीर हम्झा, दालवत झारदान, गुलबदिन नबी, हमीद हसन, करिम सादिक, मोहम्मद नबी, मोहम्मद शेहझाद, नजीबुल्लाह झारदान, नूर अली झारदान, रशीद खान, समिउल्लाह शेनवारी, शफिकुल्लाह शफिक, शापूर झारदान आणि उस्मान घनी.